पेरुतील नैने आणि इटाया या नद्यांच्या संगमावर वसलेले इक्विटोस अमेझॉन खोर्यातील सगळ्यात प्रमुख बंदर आहेच, शिवाय देशातील सगळ्यात मोठे जंगलांचे शहर म्हणूनही त्याची ओळख आहे. या शहराच्या एका बाजूस घनदाट वर्षावने आहेत, तर दुसरीकडे सर्वत्र पाणीच पाणी आहे. त्यामुळे इक्विटोसला पोहोचण्यासाठी हवाई मार्ग किंवा मग होड्यांची मदत घ्यावी लागते. कारण तिथे रस्ता शोधूनही सापडणार नाही. होडीच्या प्रवासासाठी एक आठवडा लागतो व तो तुम्हाला अमेझॉनच्या प्रचंड उकाडा असलेल्या वातावरणातून करावा लागतो. या अनोख्या शहराची एकूण लोकसंख्या सव्वाचार लाख आहे. युरोपीय मिशनरी तिथे येऊन राहण्याआधी ही जागा हजारो वर्षांपासून स्थानिक व पिढीजात शिकारीचा व्यवसाय असलेल्या लोकांचे निवासस्थान होते. तेव्हा हे लोक नदीकिनारी छोट्या वस्त्या करून राहतात. काहींच्या ते, 18 व्या शतकाध्ये ख्रिश्ती मिशनरींनी हे शहर स्थापन केले होते. दुसरीकडे काहीजण मात्र एक शतकापूर्वी या शहराचे अस्तित्व नव्हते असे सांगतात. त्यामागे असा तर्क दिला जातो की, 19 व्या शतकात रबराचा शोध लागला व त्यानंतरच रबराच्या माध्यमातून पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू झाली. युरोपीय पुरुषांनी स्थानिक महिलांशी विवाह करत तिथे बस्तान मांडले. त्यांच्यातील अनेकजण पुढे रबराचे मोठे उद्योजक झाले. या शहरात भलेही एकही रस्ता नसेल, पण तिथे मोटारसायकल व मोटोकोरोसची कमतरता नाही.