उदयपूरपासून ८० किमी वर असलेलल्या झाडौल भागातील आवरगढ पहाडांवर असलेले शिवमंदिर हे अनेक कारणांनी देशात प्रसिद्ध आहे. कमलनाथ महादेव या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर खुद्द रावणाने स्थापल्याचे सांगितले जाते. येथेच रावणाने त्याचे मस्तक शिवाला अर्पण केले होते असाही दावा केला जातो. त्यामुळे या मंदिरात महादेवाच्या अगोदर रावणाची पूजा केली जाते.
अशी कथा सांगतात की रावण हा महान शिवभक्त होता व शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने कैलासावर कठोर उपासना केली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. रावणाने महादेवाला तुम्ही माझ्यासोबत लंकेला चला अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा महादेव लिंगस्वरूपात लंकेस जाण्यास तयार झाले. मात्र प्रवासात हे लिंग रावणाने जमिनीवर ठेवायचे नाही अशी अट त्यांनी घातली. रावण लिंग घेऊन निघाला मात्र या दीर्घ प्रवासामुळे तो दमला व विश्रांतीसाठी या स्थानी थांबला तेव्हा अनवधानाने हे लिंग त्याच्याकडून जमिनीवर ठेवले गेले. हे लिंग जमिनीवरून उचलले जाईना तेव्हा रावणाने पुन्हा शिवतपस्या सुरू केली.
या तपस्येत तो दररोज शिवाला १०० कमळे वाहात असे. त्याची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेवाला रावण देवांपेक्षा वरचढ होणार अशी भीती वाटली व त्याने पूजेतील एक कमळ कमी केले. पूजा करताना रावणाने कमळे वाहायला सुरवात केली तेव्हा ती ९९ होती. हे पाहून रावणाने स्वतःचे मस्तक कापून शिवाला वाहिले. या भक्तीवर शिव प्रसन्न झाले व त्यांनी रावणाच्या नाभीमध्ये अमृतकुंभ स्थापन केला. यामुळेच रावणाला सहज मृत्यू येऊ शकत नव्हता. या मंदिरात जाण्यापूर्वी पायथ्याशी शनिमंदिर आहे व तेथून दोन किमी पायी चढण चढावी लागते. श्रीरामाने वनवासातील कांही काळ येथे घालविला होता असाही समज आहे.
या भाग म्हणजे झाला राजाची जहागीर आहे. राणा प्रतापाच्या आजोबांनी बांधलेला एक किल्लाही येथे आहे. १५७६ च्या हल्दी घाटाच्या लढाईत राणा प्रताप युद्ध करत असताना जखमी होणार्या सैनिकांवर या किल्ल्यातच उपचार केले जात.१५७७ साली येथेच राणा प्रतापाने होलिका पूजन केले व तेव्हापासून या भागात सर्वप्रथम झाडौल येथे होलिका पूजन केले जाते व नंतर आसपासच्या भागात ही पूजा होते.