पांडुरंग साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने होते.
त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आईच्या शिक्षणाचा खूप प्रभाव पडला. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. प्रताप हायस्कूलमध्ये वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. वसतिगृहात राहूनच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा धडा शिकवला. अमळनेर येथे तत्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्वज्ञानाचे शिक्षण घेतले.
1928 मध्ये त्यांनी 'विद्यार्थी' हे मासिक सुरू केले. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. तो खादीचे कपडे वापरायचा. 1930 मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग उपक्रमात भाग घेतला. त्यांनी काँग्रेसनावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (1936 ) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. 1942 च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.
1930 मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात. 11 जून, इ.स. 1950 रोजी त्यांनी आत्महत्या केली.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.