Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला, जामिन अर्जावरील सुनावणी बुधवारी

आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला, जामिन अर्जावरील सुनावणी बुधवारी
, सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (20:12 IST)
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून त्याच्या जामिनावरील अर्जाची सुनावणी बुधवारपर्यंत (13 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे.
 
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर 7 आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं.
 
आर्यन खानकडून याविरोधात विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
आर्यन खान बरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही रविवारी (3 ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आलं.
 
पुढील चौकशीसाठी दोन दिवसांच्या NCB कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची कोठडी दिली.
 
आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली.
 
आरोपी आणि ड्रग्सच्या रॅकेटमधील संबंध शोधण्यासाठी कस्टडी हवी आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
 
आर्यन खानच्या बॅगमध्ये तसेच फोनमध्ये काहीच सापडलं नाही तेव्हा आर्यन खानला जामिन देण्यात यावा अशी मागणी आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदेंनी केली. त्यांनी न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती.
 
नुपूर सतिजा, इश्मित सिंह चढ्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनाही सोमवारी (4 ऑक्टोबर) कोर्टात हजर केलं गेलं.
 
काय झालं होतं?
मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली तसेच त्याची जे. जे. मेडिकल महाविद्यालयात चाचणी करण्यात आली.
 
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री धाड टाकली होती. या प्रकरण आर्यन खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती NCB मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली .
 
आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावे आहेत, असं विभागाने सांगितलं.
 
या सर्वांचा संबंध मुंबईतील क्रूझवर होत असलेल्या कथित रेव्ह पार्टीशी आहे. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं होतं.
 
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल, असं मत NCB प्रमुख एस. एन. प्रधान यांनी म्हटलं होतं.
"आम्ही या प्रकरणात अतिशय निःपक्षपातीपणे काम करत आहोत. या प्रकरणात बॉलीवूड अथवा धनाढ्य लोकांचाही संबंध असल्याची माहिती मिळतेय, पण तरीही आमचं काम आम्ही निःपक्षपातीपणे करू. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला कामाची अंमलबजावणी करावी लागेल," असं प्रधान म्हणाले.
 
मध्यरात्री केली कारवाई
मुंबईच्या अंमली पदार्थ नियंत्रण पथकानं शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत 10 जणांना एनसीबीनं ताब्यात घेतल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तामध्ये म्हटलं होतं.
 
मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.
 
ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली होती.
 
पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं होतं.
दरम्यान, या प्रकरणी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
 
NCB ने मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टीवर केलेल्या कारवाईवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही प्रतिक्रिया दिली.
 
गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्ज कारवाईचे पुढे काय झाले? या छोट्या कारवाया त्या घटनेवर पडदा टाकण्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्यन खानच्या याचिकेवर वकिलांनी हे युक्तिवाद दिले, तरीही जामीन मिळाला नाही