Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मिर फाईल्सवरुन राजकारण करु नये : संजय राऊत

काश्मिर फाईल्सवरुन राजकारण करु नये : संजय राऊत
, गुरूवार, 17 मार्च 2022 (15:23 IST)
काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर मोदी सरकारने बोलावे त्यांच्या घरवापसीबाबत सांगावे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काश्मिर फाईल्सवरुन राजकारण करु नये. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही केले ते कोणीच केले नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राजकारण करणं थांबवावे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे यासाठी विरोधक मागणी करत असल्याचा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले, त्यांना काश्मीर आता दिसत आहे. काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यावर त्यांना आता काश्मीर दिसत आहे. गेले ३२ वर्ष हे लोक कुठे होते. काश्मीर हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्या विषयाचे राजकारण न करता लोकांनी मोदींना यासाठी मतदान केले होते की, भाजपने असे सांगितले होते पाकव्याप्त काश्मीरला भारतात आणून अखंड हिंदुस्तान निर्माण करु अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली आहे.
 
काश्मीरच्या काही घटनांवर आधारित चित्रपट आला आहे. तो चित्रपट कोणाचा पॉलिटिकल अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने काश्मिरी पंडितांची बाजू घेऊन काश्मीरविषयी परखड भूमिका स्पष्ट केली होती. बाळासाहेब ठाकरे असे एकमेव नेते होते की, ज्यांनी सांगितले होते काश्मिरी पंडितांना स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र द्या, ते स्वतःचे रक्षण करतील. तेव्हा त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य केले म्हणून विरोध करणारे भाजपचे केंद्रातील नेते होते. बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते ज्यांनी अमरनाथ यात्रा उधळून देण्याची धमकी देणाऱ्या अतिरेक्यांना सांगितले जर अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तरी तुमची हजला जाणारी विमाने उडू देणार नाही. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली. त्यामुळे काश्मीर फाईल्सची कागदपत्रे फडफडवून दाखवू नका आम्हाला माहिती आहे. काश्मिरी पंडितांच्या मुलांना मेडिकलमध्ये ५ टक्के आरक्षण देणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यासाठी आम्ही सिनेमा नाही केला, राजकारण नाही केले. तेव्हा कोणत्या विषयाचे राजकारण करायचे आणि नाही याचे भान विरोधी पक्षाला नसेल तर लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'चंद्रमुखी'तील 'दौलत' आला समोर