बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आज (दि. 11) 75 वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस किंवा त्यानंतर येणारी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय अमिताभ बच्चन यांनी घेतला आहे. त्यामागचे कोणतेही कारण बच्चन यांनी दिलेले नाही. त्याबाबत काही अंदाज करता येऊ शकतात. बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे दीर्घ आजारानंतर मार्च महिन्यात निधन झाले होते. त्यामुळेच बच्चन यांनी घरी दिवाळी किंवा कोणताही आनंदोत्सव वर्षभर तरी साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कृष्णराज राय यांचे निधन झाले होते, तेंव्हा सर्व बच्चन कुटुंबिय राय यांच्या घरी सांत्वनासाठी सर्वप्रथम उपस्थित होते. स्वतः बच्चन हे अगदी कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत, ही गोष्ट अख्ख्या बॉलिवूडला माहित आहे. कोणत्याही समारंभासाठी बच्चन कुटुंब एकत्रपणे उपस्थित असते. बच्चन यांनी आपली ही आत्मियता केवळ कुटुंबापुरतीच मर्यादित ठेवलेली आहे, असे नाही.
बॉलिवूडमधील अगदी नवख्या, नवोदित कलाकारांचे कौतुक करायलाही ते मागे नसतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नेहमी अशा पोस्ट पडत असतात. त्यामुळेच बच्चन यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या सर्वाधिक म्हणजे 30 दशलक्ष इतकी आहे. त्यांच्यापाठोपाठ शाहरुखचे 28 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.