Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इन आँखो की मस्ती के.....

इन आँखो की मस्ती के.....
, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (11:56 IST)
रेखाच्या आतली अभिनयाची उर्जा ओळखण्याचे आणि तिला वाव देण्याचे काम केले ह्रषिकेश मुखर्जी यांनी. खूबसूरतमध्ये तिने रंगवलेली अवखळ तरूणी गाजली. अवखळपणातून परिपक्व स्त्रीकडे वाटचाल करणारी ही भूमिका म्हणजे रेखाच्या आयुष्याचं प्रतिबिंब. 
 
यानंतर रेखा खूप बदलली. बॉलीवूडमध्ये रेखा प्रसिद्धीच्या झोतात असताना दुसरीकडे तिचे वैयक्तिक आयु्ष्य मात्र, गाढ अंधार होता. आपले एकटेपण तिने अमिताभमध्ये विरघळवून टाकण्याचा प्रयत्न केला. पण अमिताभने कुटुंबाला प्राधान्य दिले आणि तोच तिच्या आयुष्यातून निघून गेला. दोघांनी अनेक चित्रपट एकत्रित केले. मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, खून पसीना असे हिट चित्रपट दिले. सिलसिला हा त्यांच्यातील शेवटचा चित्रपट. यानंतर ही जोडी कधीही एकत्र आली नाही.
 
सौम्य बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या अमिताभ बच्चन या पुस्तकासंदर्भात त्यांना रेखाशी बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा सुरवातीला ती काहीही बोलली नाही. पण नंतर जेव्हा तिने बोलणे सुरू केले ते अगदी धबधब्यासारखे. तिच्या डोळ्यातील चमकच काही वेगळे सागंत होती. 
 
अशीच एक घटना आहे. काही वर्षांपूर्वी एका श्रद्धांजली कार्यक्रात लता मंगेशकर सिलसिला चित्रपटातील 'ये कहॉं आ गये हम' हे गाणे गात होत्या. त्यावेळी अमिताभ या गाण्यातील संवाद म्हणत होते, ' बेचैन हालात इधर भी है और उधर भी, तनहाई की एक रात इधर भी है और उधर भी.....' या संवादावेळी सर्व कॅमेरे रेखाच्या चेहर्‍यावर होते. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावर जे भाव होते, त्यातूनच तिचे अमिताभवरील प्रेम किती गहिरे आहे, याची कल्पना येते.
 
अमिताभनंतर तिचे खासगी जीवन संकुचित होत गेले. नंतर रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवालशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येतून अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा रोख अर्थातच रेखावर होता. पुढे विनोद मेहराबरोबर नाव जोडलं गेलं. त्याचाही अचानक मृ्त्यू झाला. त्यावेळीही रेखाकडे बोटे दाखविण्यात आली. या सगळ्या गदारोळात ती एकटीच होती.
 
त्यानंतर मग ती फक्त काम करत राहिली. एकेक चित्रपट येत गेले. तिचे कौतुक होत गेले. आपला खरा चेहरा आत दडवून ती फिल्मी चेहरा समोर ठेवून ते कौतुक ती स्वीकारू लागली. आजही चित्रपट येताहेत जाताहेत. ती मात्र आजही तशीच आहे. जशी ती त्यावेळीही होती. भलेही आयुष्याची साठी का उलटेना. रेखा आजही चालतेय. जगाशी समांतर अंतर राखून.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Birthday Special : 'रेखा'बद्दल 25 रोचक तथ्य