Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मिता पाटील : राजकीय नेत्याची मुलगी ते समांतर सिनेमातली सशक्त अभिनेत्री

smita patil
, गुरूवार, 15 जून 2023 (23:01 IST)
रेहान फजल
साल होतं 2015. 88 वर्षांचे शिवाजीराव गिरीधर पाटील भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये गेले. जाताना आपल्या लेकीच्या म्हणजेच स्मिताच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले.
 
पाटील कुटुंबीयांसाठी हा मोठा क्षण होता. कारण बरोबर 28 वर्षांपूर्वी त्यांच्या लेकीलाही भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरविण्यात आलं होतं.
 
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तुरुंगवास भोगणारे शिवाजीराव स्वातंत्र्यसैनिक होते.
 
स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षाचे सदस्य झाले. पण पुढे 1964 मध्ये काँग्रेसवासी झाले.
 
काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. तर त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील या प्रसिद्ध समाजसेविका होत्या.
 
दूरदर्शनवर वृत्तनिवेदका म्हणून कारकिर्दीची सुरुवात
स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 चा. मराठी माध्यमात शिक्षण पूर्ण करणाऱ्या स्मिता पाटलांनी मुंबई दूरदर्शनवर मराठीत वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
 
यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. स्मिता पाटील यांचं चरित्र 'स्मिता पाटील अ ब्रीफ इन्कॅन्डेसेन्स'मध्ये मैथिली राव लिहितात, "स्मिताची एक मैत्रीण, ज्योत्स्ना किरपेकर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका होत्या. तर त्यांचे पती दीपक किरपेकर फोटोग्राफर होते. ते बऱ्याचदा स्मिताचे फोटो काढायचे."
 
एकदा ते स्मिताचे फोटो घेऊन ज्योत्सनाला भेटायला दूरदर्शन केंद्रात गेले. गेटमधून आत जाण्यापूर्वी त्यांनी ते फोटो जमिनीवर ठेऊन नीट लावायला सुरुवात केली.
 
इतक्यात तिथे मुंबई दूरदर्शनचे संचालक पी व्ही कृष्णमूर्ती आले. ते फोटो पाहून त्यांनी विचारपूस केली. दीपकने त्यांना स्मिताबद्दल सांगितलं. यावर कृष्णमूर्तींनी स्मिताला भेटायचं आहे असं सांगितलं.
 
श्याम बेनेगल आणि देवानंद यांनीही स्मिताला दूरदर्शनवरच बघून भूमिका दिली.
 
मैथिली राव पुढे लिहितात, "दीपक स्मिताला घडलेला प्रसंग सांगितला, पण आपण काही दूरदर्शनमध्ये जाणार नाही असं स्मिताने सांगून टाकलं. दीपकने खूप समजावल्यावर स्मिता त्यांच्या स्कूटरवर बसून दूरदर्शनच्या कार्यालयात गेल्या. तिथे झालेल्या ऑडिशनमध्ये त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करण्यास सांगितलं. तेव्हा स्मितांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत 'अमर शोनार बांगला' गायलं."
 
"त्यांची निवड झाली आणि त्या आता दूरदर्शनवर वृत्तनिवेदन करू लागल्या. त्याकाळात दूरदर्शन संच कृष्णधवल असायचे."
 
"कपाळावर मोठी टिकली, लांबलचक मान आणि खर्जातल्या आवाजामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. त्याकाळी स्मिताकडे हातमागाच्या खूप साड्या असायच्या.""
 
"मजेची गोष्ट म्हणजे त्या बातमीपत्र वाचण्याच्या आधी काही मिनिटं जीन्सवरच साडी गुंडाळायच्या."
 
त्याकाळी ज्या लोकांना मराठी बोलता यायचं नाही पण मराठी उच्चार सुधारायचे असायचं ते लोक मराठी बातम्या ऐकायचे.
 
"श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांना पहिल्यांदा दूरदर्शनवरच पाहिलं आणि ही मुलगी आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून हवी असा विचार त्यांच्या मनात आला.'
 
"मनोज कुमार आणि देवानंद यांनाही त्यांच्या चित्रपटात स्मिता पाटील हव्या होत्या. नंतर देवानंद यांनी त्यांना त्यांच्या 'आनंद और आनंद' या चित्रपटात घेतलं. विनोद खन्ना तर स्मिता पाटील यांच्यावर इतके प्रभावित होते की, मुंबईत कुठेही असले तरी स्मिता पाटील यांचं बातमीपत्र ऐकायला ते वेळेत घरी पोहोचायचे."
 
श्याम बेनेगल यांच्या 'निशांत' चित्रपटासाठी स्मिताची निवड
स्मिता पाटील यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात अरुण कोपकर यांच्या डिप्लोमा चित्रपटातून केली. त्या काळात श्याम बेनेगल 'निशांत' चित्रपट तयार करत होते. चित्रपटासाठी त्यांना नवा चेहरा हवा होता.
 
त्यांचे साउंड रेकॉर्डिस्ट हितेंद्र घोष यांनी त्यांच्याकडे स्मिता पाटीलची शिफारस केली.
 
बेनेगल यांनी स्मिताची ऑडिशन घेतली. त्यांची निवड तर झाली पण त्यांना पहिली भूमिका मिळाली 'चरणदास चोर' या चित्रपटात 'राजकुमारी'ची.
 
छत्तीसगडमध्ये 'चरणदास चोर'च्या शूटिंगदरम्यान बेनेगल यांना स्मितामधील प्रतिभावंत अभिनेत्री दिसली. त्यांनी स्मिताला 'निशांत'मध्येही भूमिका देण्याचं ठरवलं.
 
कोणत्याही भूमिकेत स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन त्या भूमिकेशी एकरूप होणं ही स्मिताची खासियत होती. राजकोटजवळ 'मंथन' चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. दरम्यान त्या गावातील महिलांसोबत त्यांचेच कपडे घालून स्मिता गप्पा मारत बसल्या होत्या.
 
चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी तेथे आले होते. त्यांनी चित्रपटाच्या अभिनेत्री विषयी विचारलं.
 
त्यावर कोणीतरी गावातील महिलांजवळ बसलेल्या स्मिता पाटलांकडे बोट दाखवलं. त्या मुलांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एखादी अभिनेत्री गावकऱ्यांसोबत इतक्या सहजपणे कशी बसू शकते याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं.
 
छोट्या बजेटच्या समांतर चित्रपटांसह व्यावसायिक चित्रपट
स्मिता पाटील यांनी 'भूमिका', 'मंथन', 'अर्थ', 'मंडी', 'गमन' आणि 'निशांत' सारखे अनेक समांतर चित्रपट केले. त्याचबरोबर त्यांनी 'शक्ती' आणि 'नमकहलाल' सारख्या बिग बजेट फॉर्म्युला चित्रपटांमध्येही भूमिका केली.
 
'मंथन' चित्रपटात त्यांनी एका खेड्यातील स्त्रीची भूमिका केली होती. ही स्त्री दूध सहकारी संस्थेला विरोध करते पण नंतर तिचाच एक भाग बनते.
 
'भूमिका' चित्रपटात त्यांनी बंडखोर मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
 
केतन मेहताच्या 'भवानी भवई' या चित्रपटातही त्यांनी एका खमक्या आदिवासी महिलेची भूमिका साकारली होती.
 
जब्बार पटेल यांच्या 'उंबरठा' चित्रपटानंतर, त्याचाच हिंदी रिमेक असलेल्या 'सुबाह' या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती.
 
यात त्यांनी अशा सशक्त स्त्रीची भूमिका साकारली होती जी आपल्या पतीचे दुसऱ्या स्त्रीसोबत असलेले प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर पतीचं घर सोडते.
 
संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलणारी अभिनेत्री
त्यावेळी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्यांचा बोलबाला असायचा. पण स्मिता पाटलांनी संपूर्ण चित्रपट आपल्या जोरावर हिट करून दाखवला होता.
 
स्मिता यांच्या मैत्रिण आणि सुप्रसिद्ध पत्रकार कुमकुम चढ्ढा त्यांच्या 'द मॅरीगोल्ड स्टोरी' या पुस्तकात लिहितात, "स्मिता सुरुवातीपासून छोट्या बजेटचे समांतर चित्रपट करायची."
 
"पण लहान बजेट असलेल्या दिग्दर्शकांनी जेव्हा मोठ्या नावांना पसंती दिली तेव्हा स्मितानेही मोठ्या बजेटचे चित्रपट निवडले. स्मिताने मनोमन निर्धार केला की, यांना मोठं नाव हवंय तर मीही मोठी होऊन दाखवेन."
 
स्मिताने 'नमकहलाल' चित्रपटात पावसात भिजताना उन्मादक नृत्य केलं होतं. चित्रपटाचा शॉट पूर्ण झाल्यानंतर त्या रडू लागल्या. व्यावसायिक चित्रपटाचा भाग म्हणून त्यांना रडू आलं नव्हतं तर आजवर अभिनेत्री म्हणून त्यांना जगाला जे दाखवायचं होतं त्याच्या अगदी उलट हे गाणं होतं.
 
प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम
स्मिता पाटील यांनी मृणाल सेन यांच्या 'अकालेर सॉन्धाने ने' चित्रपटात हिंदी अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. केतन मेहताच्या 'भवानी भवाई' या गुजराती चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचेही कौतुक झालं होतं.
 
कुमकुम चढ्ढा लिहितात, "जैत रे जैत या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची चित्रपटाप्रती असलेली ओढ दिसून आली.
 
चित्रपटात काम करणारे सर्वजण रायगड जिल्ह्यातील ठाकरवाडी येथे थांबले होते."
 
स्मिता तिथेच राहिल्या, त्यांनी गावातील महिलांसोबत वेळ घालवला, जेवणं केली आणि त्यांच्यासोबत जवळच्या डोंगर तलावावर जाऊन आंघोळही केली.
 
चढ्ढा लिहितात, "चिदंबरम या मल्याळम चित्रपटात त्यांनी एका तामिळ महिलेची भूमिका केली होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक जी. अरविंदन यांनी स्मिताला भूमिकेची रिहर्सल न करता थेट शॉट देण्याची विनंती केली. तमिळ भाषा येत नसतानाही त्यांनी दिग्दर्शकाच्या विनंतीला होकार दिला."
 
स्मिता पाटील यांनी आपल्या 12 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत ते सर्व साध्य केलं जे प्रथितयश कलाकार त्यांच्या संपूर्ण जीवनात मिळवू शकले नाहीत.
 
शबाना आझमी यांच्याशी स्पर्धा
स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांनी महेश भट्ट यांच्या 'अर्थ' आणि श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
 
शबाना आझमी, स्मिताच्या आई-वडील आणि बहिणींच्या अगदी निकटवर्तीय असल्या तरी तो प्रेमळपणा स्मितासोबत कधी दाखवला नाही.
 
स्मिताच्या अभिनयामुळे मला त्रास होतो असं शबाना आझमी यांनी एके ठिकाणी कबूल केलं होतं. दोघी निकटवर्तीय नसल्या तरी एकमेकींप्रती त्यांच्या मनात आदरभाव होता.
 
स्मिताच्या अचानक जाण्याने शबाना यांना मोठा धक्का बसला होता.
 
माझ्यातील सर्वोत्तम कलाकृती बाहेर काढण्याची क्षमता केवळ स्मिताकडे होती, ही गोष्ट त्यांनी जाहीरपणे कबूल केली होती.
 
मैथिली राव लिहितात, "मंडी चित्रपटाच्या सेटवर स्मिताच्या जवळ जाण्याची संधी मिळाल्याचं शबाना यांनी सांगितलं होतं. शूटिंगच्या ठिकाण 2 तासाच्या अंतरावर असल्याने तिथवर पोहोचण्यासाठी दोघींनाही कार देण्यात आली होती. पण नंतर दोघींनीही आपापल्या कार सोडून युनिटच्या इतर सदस्यांसह बसमधून जायला सुरुवात केली."
 
"सर्व लोक वाटेत हसत, गाणी गात, अंताक्षरी खेळत प्रवास करायचे. त्याचवेळी शांत स्वभावाची स्मिता पाटील ही खरं तर 'टॉमबॉय' असल्याचं शबानाला कळलं. त्या पुरुषांसोबत व्हॉलीबॉल खेळायच्या, हे शबाना यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं."
 
'अर्थ' चित्रपटात शबाना आणि स्मिता आमनेसामने
'अर्थ' चित्रपटात महेश भट्ट यांनी स्मिता पाटील आणि शबाना आझमी या दोघींना घेऊन एक प्रकारे 'कास्टिंग कू' केलं होतं. महेश भट्ट यांचे सुरुवातीचे चित्रपट आत्मकथा पठडीतले असायचे.
 
'अर्थ'मध्ये त्यांनी त्यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याची आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर परवीन बाबीसोबतचं नातं, अशी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
 
मैथिली राव लिहितात, "जर तुमचा तुमच्या अभिनयावर विश्वास असेल, तरच तुम्ही 'परस्त्री' आणि संसार तोडणाऱ्या स्त्रीची भूमिका करू शकता. शबानाची भूमिका ही पीडित स्त्रीची होती, त्यामुळे संपूर्ण देशातील स्त्रिया स्वतःला त्या भूमिकेशी जोडून पाहणार. मात्र स्मिताबद्दल फारच कमी लोकांना सहानुभूती वाटणार होती."
 
भारतातील या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये स्पर्धा आहे याची जाणीव महेश भट्ट यांना होती. त्यामुळे त्या दोघींनीही एकमेकांपेक्षा चांगला अभिनय करावा यासाठी त्यांनी आंतरिकरित्या प्रोत्साहन दिलं होतं.
 
'अर्थ'मधील भूमिकेसाठी शबाना यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण महेश भट्ट म्हणाले होते की, जर या चित्रपटातून स्मिताला काढलं तर यात काहीच राहणार नाही. या चित्रपटातील या दोन्ही महिलांच्या अभिनयाचा मला अभिमान आहे.
 
राज बब्बर यांच्यावरील प्रेम
स्मिता पाटील त्यांचे सहकलाकार राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या. ते विवाहित होते, शिवाय त्यांच्या पदरी दोन मुलं होती. स्मिताने राज आणि नादिरा बब्बरचा संसार मोडल्याचे आरोप झाले.
 
'फेमिना' या इंग्रजी मासिकाच्या संपादक विमला पाटील यांनी स्मिताला एक खुलं पत्र लिहून राज बब्बरसोबतचं नातं संपवण्याची विनंती केली होती. स्मितावर खूप प्रेम करणाऱ्या त्यांच्या आई विद्या देखील बब्बरसोबतच्या नात्याच्या विरोधात होत्या, पण स्मिताने त्यांचंही ऐकलं नाही.
 
दोघांनी कलकत्ता (आता कोलकाता) येथील एका मंदिरात लग्न केलं.
 
आणि प्रतीक या त्यांच्या मुलाचा जन्म होईपर्यंत हे लग्न बाहेरच्या जगापासून लपवून ठेवलं. स्मिताच्या एका मैत्रिणीने त्यांना विचारलं होतं की, तुझ्या मनात आधीच विवाहित असलेल्या राज बब्बरसोबत संबंध ठेवण्याबाबत विचार कसा आला?
 
कुमकुम चढ्ढा लिहितात, 'मी देखील एकदा स्मिता पाटील यांना थोडं संकोचूनच हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांच्यात असलेल्या संवेदनशीलतेमुळे मी त्यांच्याकडे आकर्षिले गेले. त्यांचा हा गुण मला सिनेसृष्टीतील इतर कोणामध्येही दिसला नाही.'
 
अकाली मृत्यू
28 नोव्हेंबर 1986 रोजी प्रतीकचा जन्म झाला. त्यानंतर त्या घरी आल्या. पण त्यांची प्रकृती खालावू लागली, त्यांना ताप येऊ लागला.
 
पुन्हा दवाखान्यात जायला त्या तयार नव्हत्या. त्यावेळी राज बब्बर 'होप 86' या चॅरिटी शोमध्ये व्यस्त होते. शेवटी राज बब्बर यांनी त्यांना बळजबरीने जसलोक रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
 
मुलाच्या जन्मानंतर स्मिताची प्रकृती खालावू लागली असल्याचं त्यांच्या बहिणीला वाटतं. त्यांना जंतू संसर्ग झाला होता तर काहींचं म्हणणं होतं की त्यांना मेंदुज्वर झाला होता. शेवटी एक एक करून त्यांच्या सर्व अवयवांनी काम करणं बंद केलं आणि स्मिता पाटील यांचा 13 डिसेंबर 1986 रोजी मृत्यू झाला. त्यावेळी त्या अवघ्या 31 वयाच्या होत्या.
 
विनम्र स्वभावाची स्त्री
स्मिता पाटील या संवेदनशील, भावनिक आणि दयाळू स्वभावाच्या होत्या. त्यांची बहीण त्यांना 'मुक्त पक्षी' म्हणायची. त्यांना गाडी चालवण्याची खूप आवड होती. अनेकदा ड्रायव्हरला मागे बसवून त्या गाडी चालवायच्या.
 
अनिता सांगतात, "ती वेगात गाडी चालवायची. एकदा तर तिने लष्कराची जोंगा नामक गाडी चालवली होती. तिचा एक मित्र दिलशादने जोंगाची व्यवस्था केली. दोघांनी ती गाडी दिल्लीहून मुंबईला आणली होती."
 
"स्मिताने माझ्याकडून वचन घेतलं होतं की ती मुंबईला पोहोचेपर्यंत आईला हे सांगणार नाही. ती मुंबईत पोहचेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तिला मोटारसायकल चालवण्याचीही खूप आवड होती."
 
स्मिता पाटील यांचं दातृत्व
स्मिताला इतरांना मदत करण्याची आवड होती.
 
अनिता एक किस्सा सांगतात, "एकदा त्या स्टुडिओत जात होत्या. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिच्याकडे आली आणि म्हणाली की मी खूप अडचणीत आहे, मला मदत करा."
 
''त्या व्यक्तीला ओळखत नसतानाही स्मिताने तिच्या पर्समधले सर्व पैसे काढून त्या व्यक्तीला दिले. पुढे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेल्यावर तिच्या पर्समध्ये एकही रुपया नव्हता."
 
"तिला तिच्या ड्रायव्हरकडून पेट्रोलसाठी पैसे घ्यावे लागले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी मिळालेली रक्कम तिने एका सेवाभावी संस्थेला दान केली होती."
 
धोक्याची चाहूल
त्यांच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन यांनी 'लहरें' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, स्मिताला भविष्यातील गोष्टींची चाहूल लागायची. मी बंगळुरूमध्ये 'कुली' चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि तिथल्याच वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबलो होतो. स्मिताची आणि माझी सेटवरच थोडीफार ओळख झाली होती.
 
रात्री 1 च्या सुमारास तिचा फोन आला.
 
ती म्हणाली, "अमितजी अशा अवेळी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल माफ करा. पण तुम्ही ठीक आहात ना हे बघण्यासाठी मी कॉल केला होता. स्मिताने तेव्हा सांगितलं की मला तुमच्याविषयी खूप वाईट स्वप्न पडलं होतं. दुसऱ्याच दिवशी माझ्यासोबत एक वाईट घटना घडली आणि मी मरता मरता वाचलो. मी दोन तीन महिने आयसीयू मध्ये होतो जिथे ती मला बघायला यायची."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टाईल आयकॉन सनी लिओनी चा " ब्लू" अंदाज !