- अमृता कदम
एक बार जो मैनें कमिटमेन्ट कर दी...असा डायलॉग मारत टाळ्या-शिट्ट्या वसूल करणाऱ्या सलमान खाननं ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याची आपली कमिटमेन्ट रिअल लाइफमध्येही पाळली आहे.
सलमानचा किसी का भाई, किसी की जान हा सिनेमा आज (21 एप्रिल) ला प्रदर्शित होत आहे.
दोन वर्षांपूर्वी सलमानचा 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट ईदला, 13 मे रोजी प्रदर्शित झाला होता.
कोरोनामुळे 'राधे' डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झालेला. डीटीएच आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो पाहता आला होता. परदेशात जिथे थिएटर्स सुरू झाली होती तिथे 'राधे' रिलीज झालेला.
खरंतर सलमान खानचे चित्रपट हे सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही भरपूर कमाई करतात. कोरोनाच्या काळात नुकसान सोसलेल्या अनेक थिएटर मालकांना राधेकडूनच अपेक्षा होत्या.
सलमान खानलाही याची जाणीव होती. राधेच्या प्रसिद्धीच्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना सलमाननं म्हटलं होतं, "राधे या खरं तर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करायचा चित्रपट आहे. म्हणूनच आम्ही तो गेल्यावर्षी ईदला रिलीज करणार होतो. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.
थिएटर मालकांनी आम्हाला ओटीटीवर रिलीज करू नका, स्क्रीन सुरू होण्यासाठी थांबा अशी विनंती केली होती. म्हणून आम्ही प्रदर्शन थांबवलं. यावर्षी रिलीजची घोषणा केली आणि पुन्हा निर्बंध जाहीर झाले. आधी वाटलं ते पंधरा दिवसांसाठी असतील. थिएटर्स 30 टक्के किंवा 50 टक्के प्रेक्षकांची अट घालून उघडतील. पण असं झालं नाही. त्यामुळे आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट रिलीज करतोय."
सूर्यवंशी आणि 83 सारखे बिग बजेट चित्रपट थिएटर्स पूर्णपणे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबले असताना सलमानने मात्र 'राधे'च्या वेळी ईदचा मुहूर्त न चुकवण्याचा निर्णय घेतला
ईद सलमानसाठी इतकी खास का आहे? गेली काही वर्षं ईद म्हटलं की सलमानचे चित्रपट असं समीकरण का बनलं आहे?
'धार्मिक अंडरकरंट'
लेखक आणि चित्रपटांचे अभ्यासक अमोल उदगीरकर यांनी सांगितलं की, "गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड सुरू झाला आहे की सलमान खानचा सिनेमा ईदला रिलीज होतो, शाहरूख खान दिवाळीला सिनेमा रिलीज करतो आणि आमीरचा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होतो. हे मोठे सण आहेत. पण सलमाननं ईदला चित्रपट रिलीज करणं याला एक 'धार्मिक अंडरकरंट' आहे."
ते पुढे सांगतात, "सलमानचा खूप मोठा चाहता वर्ग मुस्लिम आहे. सलमानला त्याची जाणीव आहे. मी मूळचा परभणीचा आहे. तिथे अनेक मुस्लिम तरूणांच्या खोलीत सलमानचं जाळीदार गोल टोपी घातलेलं पोस्टर पहायला मिळतं. तो जे ब्रेसलेट घालतो (त्याला फिरोजा म्हणतात), तसं ब्रेसलेट अनेकांच्या हातात पहायला मिळतं. परभणी एक उदाहरण झालं, देशभरातल्या अशाच चाहत्यांसाठी सलमाननं ईदचा सण राखून ठेवला आहे."
यामागे चित्रपट वितरणाचंही गणित आहे. त्याबद्दल अमोल उदगीरकर सांगतात की, वितरणाच्या दृष्टीनं देशात अकरा सर्किट आहेत. बॉम्बे सर्किट, दिल्ली सर्किट, इस्टर्न सर्किट, इस्टर्न पंजाब सर्किट, निजाम सर्किट, सी. पी. बेरार सर्किट, सेंट्रल इंडिया सर्किट, राजस्थान सर्किट, मैसू सर्किट, तामिळनाडू सर्किट आणि आंध्र सर्किट. निजाम सर्किट म्हणजे पूर्वीच्या निजाम राजवटीचा भाग. हे सर्किट सलमानच्या चित्रपटांच्यादृष्टिनं अधिक महत्त्वाचं आहे. इथे सलमानचे चित्रपट चांगला व्यवसाय करतात. त्याचाही सलमानला फायदा होतो.
सलमानचा चित्रपट आणि ईद हे समीकरण इतकं घट्ट झालं आहे की, इतर कोणताही बिग बजेट चित्रपट यावेळी प्रदर्शित होत नाही. हा जणूकाही अलिखित नियम आहे.
बदलती प्रतिमा
'मैनें प्यार किया'पासून सलमानची कारकीर्द सुरू झाली. त्याने अनेक हिट चित्रपट दिले. पण ईदला सिनेमा रिलीज करायला कधीपासून सुरूवात झाली? आणि त्याचबरोबर सलमानची पडद्यावरची सोज्वळ, लव्हरबॉय 'प्रेम' ही प्रतिमा बदलत 'दबंग भाईजान' कशी होत गेली?
प्रसिद्ध ट्रेड अनालिस्ट आमोद मेहरा याबद्दल बोलताना म्हणतात, "2009 साली सलमानचा 'वॉन्टेड' ईदला प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सलमानचं करिअर डळमळीत होतं. जवळपास आठ-नऊ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर 'वॉन्टेड' हिट झाला होता. त्यामुळे ईद आपल्यासाठी लकी आहे, असा विचार करत सलमाननं ईदला चित्रपट प्रदर्शित करायला सुरूवात केली."
आमोद मेहरा पुढे म्हणतात, "त्यानंतरच तो 'भाईजान' झाला आणि त्यानं धार्मिक कार्ड वापरायला सुरूवात केली. त्याआधी तो सांगायचा की, माझी एक आई हिंदू आहे आणि एक ख्रिश्चन. पण 'वॉन्टेड'नंतर तो मुस्लिम ओळखही मिरवू लागला."
"खरंतर ईदला प्रदर्शित झालेला त्याचा प्रत्येकच चित्रपट ब्लॉकबस्टर नव्हता. पण त्यांना बंपर ओपनिंग मिळाली होती, हे खरं आहे," असंही आमोद मेहरा म्हणतात.
2009 ला सलमानचा 'वॉन्टेड' ईदला प्रदर्शित झाला. त्यानंतर दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान, सुलतान, ट्यूबलाइट, रेस 3 आणि भारत हे चित्रपट ईदलाच प्रदर्शित झाले. वॉटेन्डनं '100 करोड क्लब'ची सुरूवात केली. पण नंतर हा आकडा सुद्धा कमी पडायला लागला. 'दबंग'नं 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. 'एक था टायगर'नं 300 कोटींचा टप्पा गाठला. 'बजरंगी भाईजान' कळसाध्याय ठरला. जवळपास 900 कोटींचा गल्ला जमवणारा बजरंगी भाईजान सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.
'बजरंगी भाईजान' कमाईच्या दृष्टीने खास ठरलाच, पण तो एका अर्थाने सलमानच्या रिअल लाइफ प्रतिमेचं प्रतीकात्मक रुपही होतं असंही अनेकांना वाटतं. हिंदू आणि मुस्लिम धर्मांना सांधू पाहणारी त्याची रिअल आणि रील लाइफ रुपं 'बजरंगी भाईजान'मध्ये दिसली होती.
सलमानच्या या प्रतिमेबद्दल बोलताना अमोल उदगीरकर सांगतात, "की सलमानकडे कधीच कट्टर धार्मिक म्हणून पाहिलं गेलं नाही. कारण त्याने जपलेली स्वतःची धर्मनिरपेक्ष प्रतिमा.
"त्याच्या घरी दरवर्षी वाजतगाजत गणपती बसवला जातो. सलमान स्वतः त्याचं विसर्जन करतो. सलमानची आई हिंदू आहे. त्याने दत्तक घेतलेली बहीण अर्पिता हिंदू आहे. अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा ख्रिश्चन होती, तर सोहेल खानची पत्नी हिंदू आहे. नरेंद्र मोदींसोबत गुजरातमध्ये जाऊन पतंगही उडवतो."
ते पुढे सांगतात, "अनेकदा मुल्ला-मौलवींकडून सलमानच्या चित्रपटांना विरोध करण्याचीही भूमिका घेतली जाते. पण मुस्लिम समुदायाकडूनच त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. याला कारण सलमाननं गेल्या काही वर्षांत स्ट्रॅटेजिकली निर्माण केलेली आपली प्रतिमा."
आपल्या याच प्रतिमेला जपत सलमाननं ईदला 'राधे' प्रदर्शित केला. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं म्हटलं, "आम्ही चित्रपटातून 250 कोटी कमावतो, 300 कोटी कमावतो...यावेळी काही कमवत नाहीये, पण नुकसान सहन करून कमिटमेंट तर पाळली...चाहत्यांचं मनोरंजन होत आहे, बास आहे."