- नबीहा पारकर
भारतातील तसंच जगभरातील मुस्लीम नागरिक ईद-उल-फित्रच्या तयारीत आहेत.
मुस्लीम धर्मीयांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.
ईद-उल-फित्र म्हणजे काय?
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना.
ईद-उल-फित्र याचं शब्दशः भाषांतर करायचं झाल्यास उपवास सोडताना साजरा केला जाणारा सण असं करता येऊ शकेल.
ईद साजरी कशी करतात?
ईदच्या दिवशी मुस्लीम नवे कपडे घालून मशिदीत जातात. शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात.
ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही 'जकात' देऊन नमाज पठण करण्यास जाते.
नमाजानंतर परतताच मित्र-नातेवाईकांसोबत जेवणावर यथेच्छ ताव मारला जातो. एकमेकांना भेटवस्तू, पैसे दिले जातात. याला ईदी असं म्हटलं जातं. जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुटी असते.
एखाद्या व्यक्तीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्यांना 'ईद-मुबारक' म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.
रमजान म्हणजे काय?
रमजान हे एक अरेबिक नाव आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नवव्या महिन्याला रमजान महिना म्हणून ओळखलं जातं. मुस्लीम धर्मियांसाठी हा अत्यंत पवित्र महिना आहे.
मुस्लीम धर्मातील पाच मूळ तत्त्वांपैकी एक म्हणूनही रमजान महिना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला ही पाच मूळ तत्त्वं पाळावीच लागतात. अल्लाहने तसा आदेश दिला आहे, असंही म्हटलं जातं.
रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लीम धर्मीयांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो.
शिवाय, रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात. आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
रमजान काळातील दिनचर्या
रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवळ केलं जातं. यावेळी भरपेट आणि पौष्टिक जेवण केलं जातं. याला सहरी किंवा सहूर असं म्हणतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात. त्याला इफ्तार किंवा फितूर म्हटलं जातं.
रमजानच्या काळात दान करण्यालाही मुस्लीम धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
संयम, सदाचार यांचं पालन करून अल्लाहसोबतचे संबंध वृद्धींगत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
याशिवाय रमजान महिन्यात तरावीहसुद्धा केली जाते. रात्रीच्या वेळी मशिदीत करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला तरावीह असं संबोधतात. फक्त रमजान महिन्यातच तरावीह प्रार्थना केली जाते, हे विशेष.
रमजान आणि ईदचे दिवस कसे मोजले जातात?
इस्लामिक कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. ते लुनार कॅलेंडरप्रमाणे चालतं.
त्यामध्ये रमजान हा नववा महिना आहे, तर रमजान ईद शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते.
इस्लामिक कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्रोदयापासून हे दिवस मोजले जातात.
जगभरात इंडोनेशियापासून मोरोक्कोपर्यंत अत्यंत मोठ्या भौगोलिक प्रदेशात मुस्लीम देश पसरलेले आहेत. त्यामुळे या देशांमध्ये होणाऱ्या चंद्रोदयाच्या वेळेत फरक असू शकतो.
त्यामुळे ही वेळ ठरवण्यासाठी सौदी अरेबिया येथील मक्का हे स्थान गृहीत धरण्यात आलेलं आहे. येथे चंद्र दिसल्यापासून इस्लामिक कॅलेंडरमधील एक दिवस ग्राह्य धरला जातो, अशी माहिती लंडनमधील स्कूल ऑफ इस्लामिक स्टडीजमधील प्रा. मुहम्मद आब्देल हलीम सांगतात.
पाश्चिमात्य कॅलेंडरपेक्षा लुनार कॅलेंडरमध्ये 10 दिवस कमी असतात. त्यामुळे रमजान महिना दरवर्षीपेक्षा 10 दिवस लवकर येतो.
ईद यावर्षी कधी येणार आहे?
चंद्राच्या उदयाला धरून जे लोक ईद साजरी करतात त्यांच्यासाठी ईद 21 एप्रिलला किंवा 22 एप्रिलला येणार आहे. तुम्ही जगाच्या कोणत्या भागात आहात यावरही हे अवलंबून आहे.
तरीही मुस्लीम लोकांना ईदच्या आदल्या रात्रीपर्यंत वाट पहावी लागणार कारण चांद्र दिनदर्शिका कधी 29 किंवा 30 दिवसाची असते. चंद्राची पहिली कोर जगाच्या कुठल्या भागात दिसते यावर हे अवलंबून आहे.
मुस्लीम लोक जिथे कुठे असतील ते 29 व्या दिवशी चंद्रकोर बघण्यास सुरुवात करतील. जर त्यांना त्या दिवशी चंद्र दिसला तर दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्यास सुरुवात होईल. ईदच्या तारखा जगात कुठेही कधीच सारख्या नसतात. त्यांच्यात एक दोन दिवसांचा फरक असतो.
उदाहरणार्थ- सौदी अरेबियात सुन्नी लोक बहुसंख्येने असतात. इस्लामचं ते जन्मस्थान मानलं जातं. त्यांच्याकडे चंद्राचं निरीक्षण करणाऱ्या लोकांच्या मतांनुसार ईदची तारीख ठरवली जाते.
इतर देशातले मुस्लीम हीच पद्धत पाळतात. इराणमध्ये शिया मुस्लीम बहुसंख्येने राहतात. ते सरकारी आदेशानुसार जी तारीख असते ती ईदची तारीख म्हणून पाळतात.
रोजा कोण करू शकतो?
मुस्लीम धर्मीयांमध्ये निरोगी असलेल्या व्यक्तीनेच रमजान करावं, अशी सूचना आहे.
लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवासाने त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट आहे.