यंदाचा ईद उन्हाळ्यात कसा काय आला, याचा विचार तुमच्या मनात आला का? किंवा याआधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल.त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.
चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडर यामध्ये काय फरक?
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.
जगभरामध्ये सर्वत्र Solar म्हणजे सौर कॅलेंडरचा वापर केला जातो. हिंदू धर्मिय Lunisolar कॅलेंडरचा वापर करतात.
हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे 12 महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ 29.5 दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ 354 दिवस असतात.
सौर कॅलेंडरमध्ये मात्र 365 दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा (365-354) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईदचा सण 11 दिवसांनी मागे येतो
भारतीय कालगणनेतला बदल?
आता भारतात हिंदू धर्मिय साजरे करत असलेले सण ठराविक ऋतूतच कसे येतात असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.
यांचं कारण हिंदू धर्मियांनी Lunisolar कॅलेंडरचा स्वीकार केल्याचं खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "हिंदू कालगणनेने चांद्र आणि सूर्य कॅलेंडरचा मेळ घातला आहे. एक सौरवर्ष 365 दिवसांचं असतं. चांद्र वर्ष आणि सौरवर्षातला 11 दिवसांचा फरक दर तीन वर्षांनी कॅलेंडरमध्ये अधिक महिन्याने भरून काढला जातो.
म्हणजेच थोडक्यात असे अनुशेषाच्या 11 दिवसांचे 33 दिवस साठले की अधिक महिना येतो. फक्त चांद्र कॅलेंडरचा वापर केल्यास सौर कॅलेंडरपेक्षा 11 दिवसांचा सतत फरक पडत जाईल."
"ज्यावेळेस एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो तेव्हा त्यातल्या पहिल्या महिन्यास अधिकमास आणि दुसऱ्याला निजमास म्हटलं जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो", असं सोमण सांगतात.
रमजान महिन्यात काय केलं जातं?
रमजान ईद कधी साजरी केला जातो याबद्दल सोमण म्हणाले, "मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना आहे. या महिन्याच्या अमावस्येनंतर चांद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरा केला जातो.
यानंतर शव्वाल महिना सुरू होतो. रमजान महिन्याच्या काळामध्ये प्रेषितांच्या साहाय्याने पवित्र कुराण स्वर्गातून पृथ्वीवर आले असं मानलं जातं. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर ईद- उल-फित्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात."
रमजान ईदबद्दल सांगताना मुंब्रा येथील इस्लाम धर्माचे अभ्यास सैफ आसरे सांगतात, "हा महिना इस्लाम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
रमजान महिन्याची सुरुवात चंद्र दर्शनाने झाली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोजे (उपवास) केले जातात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्गाचे) दार उघडले जाते आणि जहान्नुमचे (नरकाचे) बंद केले जाते."
"रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात असं आसरे सांगतात. ते म्हणाले, रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं.
दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज आयोजित केली जाते. शब-ए-कद्रही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते कारण या रात्री दिव्य कुराणाचे अवतरण सुरू झाले.
या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न किंवा धान्य गरीब कुटुंबाना दिलं जातं. प्रत्येक व्यक्तीमागे 2.5 किलो धान्याचा दानधर्मही केला जातो."
रोजा कोण करू शकतो?
मुस्लीम धर्मीयांमध्ये निरोगी असलेल्या व्यक्तीनेच रमजान करावं, अशी सूचना आहे.
लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवासाने त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट आहे.
ईदची वेळ ठरवण्यात का अडचणी येतात?
ईदचा दिवस चांद्र कॅलेंडरचा 10वा महिना 'शव्वाल'च्या पहिल्या तारखेला येतो. पण ईदचा मुळ दिवस कोणता असावा यावर इस्लाममध्ये चर्चा होत आली आहे.
अनेक देशातले मुस्लीम लोक स्वत: चंद्र पाहण्याऐवजी त्या देशात चंद्र पाहण्यास जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहतात.
तर काही ठिकाणी सौर कॅलेंडरचाही आधार घेतला जातो. तर इतर ठिकाणी खगोलशास्त्राचीही मदत घेतली जाते.
सुन्नी बहुल मुस्लीम देशांत सौदी अरेबियानं ठरवलेल्या वेळी ईद साजरी करतात. तर शिया बहुल मुस्लीम देशात इराणने ठरवलेली ईदची वेळ साजरी करतात.
त्यामुळेच जगभरातले मुस्लीम एकाच दिवशी ईद साजरी करत नाहीत. ईद साजरी करण्यात एक ते दोन दिवसांचा फरक आढळतो.
'रमजान' की 'रमदान'?
भारतामध्ये गेली अनेक वर्षं रमजान असंच म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांत या महिन्याला आता रमदान असं म्हटलं जात आहे. हा फरक का आहे याचा शोध घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला.
इंडियन काउन्सिल फॉर वर्ल्ड अफेअर्समध्ये काम करणारे सीनियर रिसर्च फेलो डॉक्टर फज्जुर्रहमान यांचं म्हणणं आहे की, हा केवळ उच्चारांचा फरक आहे.
अरबी भाषेत 'ज्वाद' या अक्षराच्या स्वराचा ध्वनी (हिंदीत 'ज'च्या खाली जो नुक्ता असतो त्याला ज्वाद अक्षर म्हणतात) इंग्रजीच्या 'झेड' ऐवजी 'डीएच' असा होता. त्यामुळं अरबी भाषेत रमदान म्हणतात तर उर्दूमध्ये रमजान असं म्हणतात.
भारत आणि सौदी अरेबियामध्ये वाढणाऱ्या सांस्कृतिक संबंधांचा हा परिणाम असल्याचं ते सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की, 'भारतातून अनेक जण सौदी अरेबियात जातात तिथून परतल्यावर साहजिकच त्यांचं राहणीमान, वेशभूषा इत्यादी गोष्टींचं ते अनुकरन करतात.'
रहमान यांच्याप्रमाणेच इतर तज्ज्ञांचं देखील हेच मत आहे. अजमेर शरीफ येथे राहणारे गद्दीनशीन सैय्यद सरवर चिश्ती सांगतात, "हा केवळ उच्चाराचा फरक आहे."
त्यांचं म्हणणं आहे, "पूर्वी भारतात रमजान म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांपासून रमदान हा शब्द वापरला जात आहे."
"भारत आणि सौदी अरेबियाचे वाढते सांस्कृतिक संबंध आणि भारतीय मदरशांमध्ये सौदी अरेबियाच्या वाढत्या प्रभावामुळे रमदान हा शब्दप्रयोग स्वीकारला गेला," असं चिश्ती सांगतात.
केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येसुद्धा हा वाद निर्माण झाला आहे.
पाकिस्तानचे एक प्रसिद्ध कार्टुनिस्ट साबिर यांनी यावर एक छान कार्टून काढलं आहे. त्यांनी काढलेल्या चित्रात अरबी वेशभूषा असलेली एक व्यक्ती आपल्या पोपटाला शिकवताना दिसत आहे. तो आपल्या पोपटाला सांगतो, 'अरे बाबा रमदान म्हण, रमजान नाही.'
Published By- Priya Dixit