Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमची कमाई किती? तुम्ही 'खान' आडनाव का लावता? या प्रश्नांना उत्तर देताना शाहरुखने म्हटलं...

तुमची कमाई किती? तुम्ही 'खान' आडनाव का लावता? या प्रश्नांना उत्तर देताना शाहरुखने म्हटलं...
, गुरूवार, 5 जानेवारी 2023 (17:10 IST)
शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. 25 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
 
कधी 'पठाण' सिनेमाच्या टिझरमुळे, तर कधी या सिनेमातल्या ‘बेशरम रंग’ गाण्यावरून झालेल्या वादामुळे तो सतत चर्चेत आहे.
 
शाहरुखचा 4 वर्षांनंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा आहे आणि अशात शाहरुख त्याच्या चाहत्यांना भेटण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची एकही संधी सोडत नाहीये.
 
बुधवारी (4 जानेवारी) रात्री शाहरूखने ट्विटरवर त्याच्या काही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यातले काही प्रश्न आणि त्यांची उत्तर रंजक आहेत. यात शाहरूखनं त्याचं आडनाव आणि त्याच्या कमाईबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
 
या वृत्तात आपण जाणून घेणार आहोत की, शाहरुखनं त्याच्या पाकिस्तान कनेक्शन आणि पठाण असल्याबद्दल नेमकं काय म्हटलं होतं. तसंच त्याची आधीची आणि आताची कमाई किती आहे.
 
शाहरूख त्याच्या नावात ‘खान’ का लिहितो?
शाहरूख खाननं ट्विटरवर #AskSRK हॅशटॅगवापरून त्याच्या चाहत्यांना तो त्यांच्याशी बोलू इच्छित असल्याचं म्हटलं होतं.
 
जेव्हा एका युजरने शाहरुखला रजनीकांत यांच्याबाबत विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं – बॉसमॅन @Zagga_ji नावाच्या एका युजरने गंमतीमध्ये शाहरुखला ट्वीट करत लिहिलं - सर तुमचा रिप्लाय मिळावा म्हणून मी 2 लग्न केलीयेत. आता त्या दोन्ही पत्नी गरोदर आहेत. आतातरी दिप्लाय द्या.
 
त्यावर रिप्लाय देत शाहरुखने म्हटलं – आता तर त्या दोन पत्नीच तुला रिप्लाय देतील बेटा.
 
दर्शन शाह नावाच्या एका व्यक्तीने शाहरुखकडे ऋषभ पंतसाठी प्रार्थना करण्याची मागणी केली. त्यावर रिप्लाय देत शाहरुखने म्हटलं – 'इंशाल्लाह, ऋषभ पंत लवकर ठीक होईल, तो एक योद्धा आहे.' @akki_lovers नावाच्या एका युजरने लिहिलं – पठाण सिनेमा आतापासूनच एक संकट वाटत आहे. त्यावर शाहरूख म्हणतो – “बेटा, मोठ्यांशी असं नाही बोलत.” अमन अहमदने शाहरूखला एक प्रश्न विचारला – एक महिन्याची कमाई किती शाहरुखने उत्तर दिलं - उदंड प्रेम कमावतो... दररोज. प्रियांशू गुप्ताने म्हटलं - ऋतिक आजकाल त्याची बॉडी दाखवत आहे. तुम्हाला आव्हान देत आहे. तुम्ही काय सांगाल?
 
शाहरूख म्हणतो - मी ऋतिककडूनच प्रेरणा घेतली आहे.
 
साहिलने विचारलं - सर, प्रेम एकदा होतं. लग्न एकदा होतं. मग परीक्षा सारखी-सारखी का होते? शाहरूखने उत्तर दिलं – ज्या गोष्टींमध्ये मज्जा येत नाही ती परत-परत होत राहाते. हीच जिंदगी आहे भावा. इरफान नावाच्या एका युजरने विचारलं – पठाण सिनेमात सलमान खानची एन्ट्री कधी होईल? त्यावर शाहरुख उत्तरला - पठाण एक इंटरॅक्टिव्ह सिनेमा आहे. तेव्हा तुम्हाला सिनेमात भाई (सलमान खान)ची गरज भासेल तेव्हा तुम्ही तिकीटामागे असलेला QR कोड स्कॅन करा. तो लगेच सिनेमात अवतरेल. @Lunatic1090 नावाच्या एका युजरने लिहिलं – सर तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तर काश्मिरी आहे. मग तुम्ही तुमच्या आडनावात खान का लावता?
 
शाहरूखने त्यावर उत्तर दिलं - संपूर्ण जग माझं कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावामुळे तुमचं नाव नाही होत. तर ते कामामुळे होतं. कृपया, छोट्या गोष्टींमध्ये नका पडू. शाहरूख खानचा एक सिनेमा चांगलाच चालला होता. त्याच नाव होतं - माय नेम इज खान
 
शाहरुखचं कुटुंब नेमकं मूळचं कुठलं आहे?
शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 ला झाला. त्याच्या वडिलांचं नाव ताज मोहम्मद खान तर आईचं नाव लतिफ फातिमा आहे. सुरुवातीचे पाच वर्षं तो त्याच्या आजीकडेच राहिला.
 
त्या दरम्यान तो बंगळूरू आणि मंगळुरूमध्ये राहिला. आई लतिफ फातिमा याचं मूळ हैदराबाद तर वडिलांचं मूळ पेशावर आहे. त्यांची वडिलांची आई मूळची काश्मीरची होती.
 
शाहरूख 1978-79 दरम्यान पेशावरलासुद्धा गेला होता.
 
शाहरुखला पेशावरला येऊन खूप आनंद झाला होता, असं त्यांची चुलत बहिण नूरजहाँ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. कारण त्यावेळी तो पहिल्यांदा त्याच्या वडिलांच्या कुटुंबियांना भेटला होता. भारतात फक्त त्याच्या आईकडचे कुटुंबीय राहतात.
 
काही वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तानच्या क्रिकेटर्सच्या एका कार्यक्रमात शाहरुखने म्हटलं होतं.
 
“माझे वडील पेशावरचे होते. मीसुद्धा पठाण आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे मी कदाचित वाटत नसावा. पण मीसुद्धा पठाणच आहे. फक्त माझी उंची थोडी कमी आहे. कुठलाही वाद उपस्थित करण्यासाठी मी हे बोलत नाहीये. पण जेव्हा तुम्ही जिंकता (पाकिस्तानी क्रिकेटर्स) तेव्हा वाटतं की माझ्या वडिलांकडचे लोक जिंकले आणि तेव्हा इंडिया जिंकते तेव्हा माझ्या आईकडचे लोक जिंकल्याचं वाटतं.”
 
शाहरुख 15 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्याचे वडील वकिल आणि स्वातंत्र्यसैनिक होते. वयाच्या 14-15व्या वर्षी ते स्वतंत्र्यता आंदोलनादरम्यान जेलमध्येसुद्धा गेले होते. त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविरोधात निवडणूकसुद्धा लढवली होती. पण ते हारले होते. त्यांनी अनेक उद्योगधंद्यांमध्ये त्यांचं नशीब आजमावलं, पण त्यांना त्यात यश आलं नाही.
 
शाहरुखची आधीची आणि आताची कमाई किती?
नॅशनल स्कूल ऑफ ड्रमाशी शाहरुखचं जवळंचं नातं आहे. त्याचे वडिल 1974 पर्यंत एनएसडीमध्ये मेस चालवत होते. तेव्हा शाहरूख त्याच्या वडिलांबरोबर तिथं जायचा. त्यावेळी त्याने रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिकरी, रघुवीर यादव, राज बब्बर सारख्या कलाकारांचा अभिनय तिथं पाहिला. इब्राहिम अलकाजींबरोबर तो सतत वावरायचा आणि त्यांच्या बरोबर तो 'सूरज का सातवां घोडा' सारख्या नाटकांची तालिम पाहायचा. तिथूनच त्याच्यात अभनिय आणि सिनेमाबाबत रुची निर्माण झाली.
 
दिल्लीतल्या सेंट कोलंबस स्कूलमध्ये शिकताना शाहरुखला खेळाची विशेष आवड होती. नंतर दिल्लीतल्या हंसराज कॉलेजमधून त्याने अर्थशास्त्रात बीएची पदवी घेतली. पुढे मग जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात मास कम्यूनिकेशनसाठी प्रवेश घेतला, पण हे शिक्षण काही त्याला पूर्ण करता आलं नाही. बेरी जॉन यांची नाटकं आणि ‘दिल दरिया और फ़ौज़ी’सारख्या सिरीयल पासून शाहरुखचा फिल्मी प्रवास सुरू झाला. जो आता कुठे पोहोचलाय हे आपण जाणतोच. शाहरुखला त्याची पहिली 50 रुपयांची कमाई पंकज उधास यांच्या एका कॉन्सर्टमध्ये मिळाली होती. आता तो कोट्यवधी रुपये कमावतो. फोर्ब्स मासिकानं दिलेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये शाहरुखची कमाई 124 कोटी रुपये होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुपमा फेम अभिनेता लग्नबंधनात