Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

Ashtpradhanmandal
, सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (07:22 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व खूप मोठे होते. शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजे होते. महाराजांनी गरीब-दुबळ्यांना मदत केली तसेच प्रजेवर खूप माया केली महाराजांचे कुटुंबावर, प्रजेवर खूप प्रेम होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व जून १६७४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. तसेच महाराजांनी मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना खूप व्यापक आणि प्रभावी होती. त्यांच्या या कार्यामुळे निर्विकार झालेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सार्वभौम आणि सर्वसत्ताधारी राजे होते. ते उत्तम न्याय करायचे. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धत स्वीकारली. महाराजांनी स्वराज्यातील राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी स्थापन केलेल्या या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीकडे सुपूर्त केली. 
 
अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेक विधीत समावेश करून त्याला धार्मिक स्वरुप देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांच्या सिहासनाच्या सभोवती हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान त्यांच्या आठ दिशेला उभे राहिले होते. तर चला माहित करून घेवू या छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री. 
 
अष्टप्रधान मंत्रीमंडळ
१. पंतप्रधान पेशवा : मोरोपंत त्रिंबक पिंगळे 
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हे छत्रपतींच्या राज्याभिषेकवेळी हाती सुवर्णकलश घेवून पूर्व दिशेला उभे राहिले होते. छत्रपतींनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. सर्व राज्यकारभरावर मोरोपंत पिंगळे हे लक्ष ठेवून असत. छत्रपतींच्या गैरहजेरित राजाचा प्रतिनिधि या नात्याने हे सर्व कारभार पाहत असत. यावरून या मुख्य पदाचे महत्व लक्षात येते. 
 
२. पंत अमात्य मुजुमदार : रामचंद्र नीळकंठ 
रामचंद्र नीळकंठ हे मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री होते. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी हे दही-दुधाने भरलेला तांब्याचा कलश घेवून पश्चिम दिशेला उभे होते. रामचंद्र नीळकंठ हे स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमा खर्च व त्या त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेवून तो व्यवस्थित तपासून घेणे हे आमात्यांचे काम होते व तो लिहून, तपासून महाराजांसमोर सादर करायचे. 
 
३. पंत सचिव सुरनीस : अण्णाजीपंत दत्तो 
हे सुद्धा एक महत्वाचे मंत्री होते. सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहार यावर हे लक्ष ठेवायचे. छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या वेळी यांनी उपदिशांच्या ठायी क्रमाने आग्नेयला छत्र घेतलेले सचिव अण्णाजीपंत दत्तो हे होते. छत्रपतींकडून वेगवेगळ्या सुभेदारांना व अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे पाठवली जात असत. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी यांना त्यावर लक्ष ठेवावे लागत असे. तसेच स्वराज्याचे दफ्तर आणि जमीन महसूल व्यवहारांवर हे लक्ष ठेवत असत. 
 
४. मंत्री वाकनीस : दत्ताजीपंत त्रिंबक 
हे छत्रपतींच्या खाजगी कामाकडे लक्ष ठेवत असत. रोजनीशी, भोजनव्यवस्था, वैयक्तिक संरक्षण यांवर यांचे लक्ष असायचे. तसेच खाजगी कौटुंबिक आमंत्रण करण्याचे काम दत्ताजीपंत त्रिंबक हे करीत असत. 
 
५. सेनापती सरनौबत : नेतोजी पालकर 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर यांची हुकूमत चालत असे हे खूप महत्वाचे होते.
 
६. पंत सुमंत डबीर : रामचंद्र त्रिंबक 
हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. पराष्ट्रांना खलिते पाठवणे तसेच पर राष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे व परराष्ट्र संबंधित माहिती नियमितपणे महाराजांना देणे व सल्ला देणे तसेच पराष्ट्रांतून हेरांच्या मदतीने माहिती काढण्याचे हे जबाबदारीचे काम रामचंद्र त्रिंबक यांच्याकडे होते. 
 
७. न्यायाधीश काझी-उल-ऊझत : निराजीपंत रावजी
हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. स्वराज्याच्या दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून तसेच न्यायनिवाडा करून निराजीपंत रावजी हे रयतेला न्याय दयायचे. 
 
८. पंडितराव दानाध्यक्ष सद्र-मुहतसिव : मोरेश्वर पंडित 
छत्रपतींच्या धर्मखात्याचे हे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान तसेच ब्राह्मणांचा सन्मान करणे व यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल सल्ला देणे. शास्त्रार्थ पाहणे इत्यादी काम मोरेश्वर पंडित पाहत असत.  
 
“प्रधान अमात्य सचीव मंत्री, सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री, 
सेनापती त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी मंत्र्यांची नेमणुक करतांना अत्यंत दक्षता घेतली होती. राज्यभिषेकाच्या वेळी अष्टप्रधानांची नेमणुक पूर्ण झाली होती. तसेच छत्रपतींनी आपल्या या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. 'सर्वात महत्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तुत्वावर ठरवण्यात यावी असे सांगितले होते. व्यक्तीचे गुणदोष बघून नेमणुक केली गेली होती अशा प्रकारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. 
-धनश्री नाईक 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापती बद्द्ल जाणून घ्या जे एकटेच हत्तीसोबत लढले