Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवभारत अध्याय अठ्ठाविसावा

शिवभारत अध्याय अठ्ठाविसावा
, मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (13:01 IST)
पंडित म्हणाले :-
तो भोसलेकुलभूषण राजा शिवाजी राजगडा गेला असतां पन्हाळगडाची काय गति झाली तें, हे महाबुद्धिमाना ( परमानंदा ), सांग. ॥१॥
कवींद्र म्हणाला :-
स्वतः शाएस्तेखान ह्या प्रांतांत आहे; तिकडे शिद्दी जोहर आहे. तेव्हां आम्ही दोन्हीकडे कसे लढूं शकूं ? ॥२॥
म्हणून आज पन्हाळगड आदिलशहाच्या स्वाधीन कर आणि तूं नीघ. इकडे दुसरें काम उपस्थित झालें आहे. ॥३॥
अल्लीशहापासून त्या गडाचा मोबदला आपण एका क्षणांत खात्रीनें घेऊं; आमचें भाषण खोटें होणार नाहीं. ॥४॥
असें आपल्या दूताच्या तोंडून शिवाजीनें त्र्यंबक भास्करास कळविलें असतां त्यानें त्याचा आपल्या मनांत विचार करून स्वतः युद्धोत्सुक असूनसुद्धां धन्याची आज्ञा प्रमाण मानून ( शिरसा वंद्य करून ) तो गड ( पन्हाळा ) नम्रपणें अल्लीशहास देऊन टाकला. ॥५॥६॥
नंतर जोहरास भेटून त्यानें त्यास कुशल विचारलें, शिवाजीचा स्नेह जोडण्याच्या इच्छेनें त्यानेंहि त्याचा अत्यंत सत्कार केला. ॥७॥
आपणास साह्य करणार्‍या पुष्कळ सैन्यासह जवळ येऊन, मस्तक लववून त्यानें आपल्या धन्याकडे पाहिलें. ॥८॥
पंडित म्हणाले :-
“ याला तूं मारूं नकोस; ही माझी मसलत मान्य करः; ह्या जोहराचा नाश करण्याचें दुसरेंच निमित्त आहे. ” ॥९॥
असें बुद्धिमान शिवाजी राजा पन्हाळगडास असतां त्याच्याजवळ येऊन त्यास देवी भवानीनें पूर्वींच सांगितलें होतें. ॥१०॥
तेव्हां तो कोणत्या निमित्तानें व कसा नाश ( मृत्यु ) पावला तें सर्व, हे कवींद्रा, आम्हास सांग; कारण तूं कुशल आहेस. ॥११॥
देव जसे नित्य अमृतपान करीत असतांहि तृप्त होत नाहींत, तशी भागीरथीच्या तीरीं आपली वाणी सारखी उत्सुकतेनें ऐकूनहि आमची तृप्ति होत नाहीं. ॥१२॥
कवींद्र म्हणाला :-
महाबाहु शिवाजी राजास, भवानी देवीने आज्ञा केल्यावरून तो स्वतः मोंगलाच्या सेनेचा पराभव करण्यासाठीं शिद्द्याचा बलाढ्य सेनाव्यूह एकदम भेदून ( कोंडी फोडून ) निघून गेला असतां व पन्हाळगड सुदैवानें हाती आला असतां, अति महामूर्ख व रागीट अल्लीशहाच्या मनांत भलतेंच येऊन तो पुष्कळ काळपर्यंत जोहरावरच रागावला. ॥१३॥१४॥१५॥
“ हे दुष्टबुद्धी, त्वां लोभ्यांनें त्याच्यापासून पुष्कळ धन घेऊन तो निघून जाणार हें माहीत अस्तांहि त्याच्याकडे कानाडोळा केलास ! ॥१६॥
तूं त्यास कोंडले असतां त्या राजानें निघून जाणें तुझ्या अनुमतीशिवाय दुष्कर होतें असें मला वाटतें. ॥१७॥
म्हणून तूं ये आणि त्या राजानें दिलेलें धन दे; नाहीं तर माझ्या हातून तुझा मृत्यु ( नाश ) होईल. ” ॥१८॥
असें आदिलशहानें त्यास पत्र पाठविलें; तथापि तो बलिश्रेष्ठ सिद्धी त्याला भ्याला नाहीं. ॥१९॥
जेव्हां हा आदिलशहाशीं लढूं शकला नाहीं, तेव्हां लगेच दुर्गाप्रमाणें दुर्गम अशा कर्णूलाचा त्यानें आश्रय केला. ॥२०॥
नंतर त्या आदिलशहानें कळूं न देतां कांहींतरी युक्तीनें जोहरास मद्याबरोबर विष देवविलें ! ॥२१॥
उपकार करणार्‍या जोहरास ज्यानें अपकार केला, त्या आदिलशहाचा हा केवढा मोठा मूर्खपणा ! ॥२२॥
देवीच्या प्रसादानें तो अमानुषगति व अजिंक्य राजा भोसला वेढा देऊन बसलेल्या मोठ्या शत्रुसेनेच्या हातावर तुरी देऊन जर त्या गडावरून निघून गेला, तर त्याला त्या जोहराचा अपराध नाहीं असें आम्हांस वाटतें. ॥२३॥२४॥
पण हें विषयांतर राहूं दे. प्रथम आरंभलेलें, श्रेष्ठ, चंद्रदर्शनानें उचंबळणार्‍या अमृतसागरासारखें ( गोड ), सविस्तर वर्णिलें जाणारें शिवरायाचें चरित्र आपण सर्व पंडितांनीं ऐकून आपल्या हृदयांत सांठवावें. ॥२५॥२६॥
वेढा देऊन बसलेल्या शिद्द्याच्या हातावर स्वपराक्रमानें तुरी देऊन बलवान् ( शिवाजी ) भोसला जों राजगडावर येतो, तोंच मोंगलाच्या बलाढ्य सैन्यांनीं अद्भुत युद्ध करून पराक्रमाणें लढणारा संग्रामदुर्ग काबीज केला. ॥२७॥२८॥
ती बातमी राजगडावर ऐकून, सर्व राजनीतिवेत्त्यांमध्यें श्रेष्ठ असा तो शिवाजी राजा सचिवांस असें बोलला :- ॥२९॥
शिवाजी म्हणाला :-
दुसर्‍या कार्यांत गुंतल्यामुळें मी दूर असतां चाकण नगरी संग्रामदुर्गासह हातची गेली. ॥३०॥
ती घेण्यास कठीण असली तरी तिच्यावर स्वतः चालून जाऊन ती किल्ल्यासह मीं आतांच घेऊं इच्छितों. ॥३१॥
परंतु दुसरें जें निकडिचें कार्य उपस्थित झालें आहे त्याच्या प्रयत्नास आपण सर्वच यापुढें लागूं. ॥३२॥
ज्यास साह्यकर्ता नाहीं अशा कोणत्याही मनुष्याच्या हातून या जगांत शत्रुसेनेचा पराभव होणें अशक्य आहे. ॥३३॥
म्हणून शहाण्या राजानें शत्रूंचा नाश करणारें सैन्य मोठ्या यत्नानें सतत बाळगलें पाहिजे. ॥३४॥
ज्याच्याजवळ पुष्कळ द्रव्य नाहीं अशा मोथ्या राजाससुद्धां त्या प्रकारचीं सैन्यें बाळगतां येत नाहींत. ॥३५॥
पैशापासून पैसा अतिशय होतो; पैशापासून धर्महि वाढतो; पैशानें कामहि प्रपत होतो. म्हणून पैशाची प्रशंसा करतात. ॥३६॥
कुल, शील, वय, विद्या, पराक्रम, सत्यवादित्व, गुणज्ञता, गांभीर्य हीं पैशापासूनच उत्पन्न होतात. ॥३७॥
पैशानेंच लोकांना इहलोक व परलोक अगदीं निश्चितपणें प्राप्त होतात. द्रव्यहीन पुरुष जिवंत असूनही नसल्यासारखा असतो. ॥३८॥
ज्याच्याजवळ विपुल पैसा असतो, त्याला मित्र असतात; ज्याच्याजवळ पैसा असतो, तो पराक्रमी असतो; ज्याच्यापाशीं पैसा असतो, त्याला सर्वच साह्य करतात. ॥३९॥
म्हणून पृथुराजाप्रमाणें स्वसामर्थ्यानें ह्या पृथ्वीचें दूध काढून ( सर्व प्रांतांतून खंडणी वसून करून ) ज्याच्यावर हें जग अवलंबून आहे तो पैसा घेऊन येईन. ॥४०॥
त्यानंतरच, अगस्त्य ऋषींनीं समुद्राचा जसा सूड घेतला तसा तिकडे दिल्लीपतीच्या मामाचा चांगला सूड घेईन. ॥४१॥
ह्याप्रमाणें राजानें सभेंत बसून योग्य व राजनीतियुक्त भाषण केलें असतां त्यास विनयशाली सचिव म्हणाले :-
सचिव म्हणाले :- ॥४२॥
“ पैसा हा सामर्थ्यवान आहे ” असें जें आपण म्हणतां तें “ तसें नाहीं ” असें कोणता शहाणा मासून वितंडवादाचा अवलंब करून उलट म्हणेल ? ॥४३॥
समर्थाच्या सामर्थ्यामुळें पैशाच्या ठिकाणीं सामर्थ्य येईल, पण असमर्थाजवळ असलेला पैसा हा लाभकारक नसतो, तर तो केवळ अनर्थकारकच होय. ॥४४॥
सर्व लोकांजवळ जो पैसा आहे तो तुझाच आहे हें आम्ही जाणतों. म्हणून हे महातेजस्वी शिवाजी राजा, आपण मुलुखगिरीवर जावें. ॥४५॥
शिवाय सध्यां दिल्लीपतीचा मामा सेनापति शाएस्तेखान हा संग्रामदुर्ग जिंकून, निश्चिंत व गर्विष्ठ होत्साता पुढें चाल करून पुण्यास येऊन राहिला आहे. हे पराक्रमी राजा, तूं राजगडावर आहेस असें ऐकून मनांत अत्यंत भीति वाटून बहुधा त्यास वाटेनें तो आपली सेना सह्याद्रीवरून खालीं पाठवील. ॥४६॥४७॥४८॥
चालून येणारी ती ( सेना ) सह्याद्रीवरून ज्या ओगें खालीं उतरणार नाहीं अशी प्रथम तजवीज करावी. मग दुसर्‍याहि गोष्टी सर्व प्रकारें कराव्या. ॥४९॥
सचिवांचें असें समयोचित भाषण ऐकून त्या महाबुद्धिमान व पुण्यशील राजास तें चांगलें वाटलें. ॥५०॥
पंडित म्हणाले :-
त्र्याहत्तर हजार घोडेस्वारांसह शाएस्तेखानानें पुण्यास आपलें ठाणें देऊन ( पुढें ) काय बरें केलें ? ॥५१॥
कवींद्र म्हणाला : -
समोर असलेल्या कारतलब नांवाच्या कार्याकर्त्या यवनास बोलावून त्यास तो एकांतांत असें म्हणाला. ॥५२॥
तुझा बाप अजबड ( उजबेग ) वंशांतील जसवंत हा प्रतापवान आहे. आणि तूं सुद्धां आपलें हें वय युद्धांतच घालवीत आहेस. ॥५३॥
बलाध्य गालिबास जिंकून सध्यां स्वबळानें प्रचंडपूर घेऊन तूं मला येथें दिलेंस. ॥५४॥
अजिंक्य असा तो सह्याद्रीचा अधिपति शिवाजी युद्धामध्यें कसें दुष्कर कर्म करतो हें तुलाहि माहीत आहे. ॥५५॥
सह्याद्रि पादाक्रांत केल्याशिवाय तो अजिंक्य व गर्विष्ठ सह्याद्रिपति ( शिवाजी ) आमच्या ताब्यांत मुळींच येणार नाहीं. ॥५६॥
म्हणून माझ्या आज्ञेनें तूं आज सेनेसह लगेच सह्र्याद्रि उतरण्याचा जोरानें विचार कर. ॥५७॥
हे वीरा, आजपासून मी तुझ्या अधीन आहें. सह्याद्रि उतरून मला मोठें यश ( मिळवून ) दे. ॥५८॥
चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणें हीं तूं हस्तगत कर. ॥५९॥
महाबलवान व पराक्रमी ( मोठीं आयुधें असलेले ) कछप व चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, अजिंक्य रायबागीण, जसवंत कोकाटे, महाबाहु जाधव हे अत्यंत माननीय असे मी सैन्यासह पाठविलेले सेनानायक विरोचनामागून जसे असुर गेले तसे - तुज्यामागून येतील. ॥६०॥६१॥६२॥
सर्व सैन्यांचा म्होरक्या असा तूं अव्यग्रपणानें पुढें हो. अत्यंत प्रिय करणारा जो तूं त्या तुझी मी पाठ राखीन. ॥६३॥
ह्याप्रमाणें त्या सेनापतीची आज्ञा होतांक्षणींच हा प्रख्यात पराक्रमी वीर वीरांसह निघाला. ॥६४॥
नंतर लोहगडच्या दक्षिणोत्तर मार्गानें तो निर्भयपणें सह्याद्रि उतरूं लागला. ॥६५॥
नलिकायंत्रासारख्या त्या पाऊल वाटेनें जात असतां ती सेना पदोपदीं अतिशय कुंठित झाली. ॥६६॥
“ ह्या वाटेवरून अधोमुख होऊन आपण पडूं ” अशी खाली झालेले मोंगलसैन्यांतील लोक सह्याद्रीवरून खालीं उतरले. ॥६७॥
आपल्या सैन्यासह येणार्‍या त्या घमेंडखोर कारतबलास आपला शत्रु लवकर मुळींच दिसला नाहीं, तर अरण्यमात्र दिसलें. ॥६८॥
शत्रूंनीं भरलेल्या पण जणूं काय शून्य दिसणार्‍या अशा त्या झाडींत जेव्हां तो शिरला, तेव्हां मित्रसेनादि सरदारांनीं त्याची कड सोडली नाहीं. ॥६९॥
जेथें वारासुद्धां नव्हता अशा त्या महावनांत वस्ती करणा‍या कारतलबानें आपल्या रक्षणाचा ( सहजच ) उपाय चिंतिला नाहीं. ॥७०॥
पंडीत म्हणाले :-
त्या कीर्र रानांत शिरणार्‍या त्या शिवाजीच्या शत्रूंस “ आपण अंधकारमय लोक ( प्रदेश ) पाहिला ” असें वाटलें. ॥७१॥
प्रतिकूल ( उलट ) वार्‍याच्या मार्‍याखालीं सह्याद्रीवरून उतरणार्‍या त्या शत्रूंस शिवाजीनें तेव्हांच कां अडविलें नाहीं ? ॥७२॥
सह्याद्रीच्या तळास असलेला शिवाजीचा तो प्रदेश घेण्यास उत्सुक असलेल्या शत्रूंनीं तो तेव्हां कसा पादाक्रांत केला नाहीं ? ॥७३॥
कवींद्र म्हणाला :-
आरंभीच जर त्या शत्रूस शिवाजीनें अडविलें असतें तर सैन्यांसह तो त्या अरण्यसागरांत येऊन पडला नसता. ॥७४॥
असाच मनाचा निश्चय करून स्वतः समर्थ असतांहि त्या राजा ( शिवाजी )नें बाहुबलाचा गर्व वाहणार्‍या त्या कारतबलास तेथें अडविलें नाहीं. ॥७५॥
मग सह्याद्रीच्या खालीं पुष्कळ पुढें आल्लेया त्या शत्रूवर शिवाजीनें चाल करून त्यास कोंडलें. ॥७६॥
त्या क्षत्रिय वीरानें ( शिवाजीनें ) पूर्वींच नेमलेले पायदळाचे सज्ज नायक येऊन त्या दाट अरण्यांत दोन्ही बाजूंस ठिकठिकाणीं समीप राहिले असतांहि ते दिल्लीपतीच्या सैनिकांस समजले नाहींत. ॥७७॥७८॥
नंतर ‘ उंबरखिंड ’ नांवाच्या अरण्यांतील पाऊल वाटेवर कारतलब आपल्या सेनेसह आला. ॥७९॥
मग लगेच वाजूं लागलेल्या रमभेरींच्या निनादावरून “ शिवाजी जवळ आला ” असें समजलें. ॥८०॥
तो शिवाजीच्या नगर्‍यांचा आवाज ऐकून कारतबलानें शौर्य गाजविण्याचें आपल्या मनांत आणलें. ॥८१॥
तेव्हां “ तुंगारण्याचा ” अधिपति जो महाबाहु वीर मित्रसेन तो घोड्यावरून त्वरेनें उतरून, टेकडावर उभा राहून, आपल्या वीरांना घेऊन, वीरासन धारण करून, धनुष्य वांकवून त्यावर बाण लावून शत्रूंचा नाश करण्याच्या तयारीनें तें सज्ज केलें. त्याच्याप्रमाणेंच अमरसिंहादि दुसरेंहि योद्धें युद्धांत उभे राहिले. ॥८२॥८३॥८४॥
नंतर शत्रु ताबडतोब तोफांच्या गोळ्यांनीं तेथें पदोपदीं मारा करीत आहेत असें त्वरित जाणून तो प्रभाववान् यवन आपलें सैन्य जमवून उभा राहिला. ॥८५॥
तेव्हां त्या अरण्याच्या मध्यभागीं तरुण योध्द्यांच्या तेजाचें घरच अशा धैर्यवान् धनुर्धारी अमरसिंहानें न गोंधळतां त्या अरण्याच्या मध्यभागीं बाणांचा वर्षाव करून शत्रुराजाच्या सैन्याचा संहार करीत युद्धास पुष्कळ रंग आणला. ॥८६॥
रानोरान पळणार्‍या त्या यवनसेनेस “ बाबांनो कसेंहि करून घाबरूं नका, स्थिर रहा ” असें बोलून मित्रसेनानें आपल्या निरुपम धनुष्यावर लावलेल्या बाणांच्या वृष्टीनें शत्रुसेनेस त्वरित अडविलें. ॥८७॥
अमरसिंह व मित्रसेन यांनीं वेगानें सोडलेल्या बाणांनीं मारलेले कांहीं शत्रुयोद्धें अंगांतून वाहणार्‍या रक्ताची आंघोळ होऊन, मूर्च्छा येऊन पडले. ॥८८॥
अत्यंत भयंकर अशा ह्या किर्र रानांत रोषानें आलेलें शत्रूचें महासैन्य आपला प्रबल युद्धावेश सोडीत नाहीं; म्हणून ताबडतोब त्याचा सर्व मार्ग तुम्ही अडवा असें शिवाजी राजा आपल्या सेनापतीस बोलाला. ॥८९॥
मग शत्रूंच्या वधासाठीं त्वरित घोड्यावर चढून जगांत उत्कर्ष उत्पन्न करणारें धनुष्य हातानें ओढणारा तो शिवाजी पेटलेल्या अग्नीच्या ज्वालांच्या लोळांनीं खांडव वन भस्मसात् करविणार्‍या अर्जुनाहून किमपि कमी नाहीं असा सुरांना तसाच असुरांना दिसला. ॥९०॥
शिवाजीच्या वीरश्रेष्ठांनीं तीक्ष्ण व लांब तरवारींच्यायोगें पाडलेल्या शत्रूकडील घोड्यांच्या रक्ताच्या पुरानें अरण्याच्या मध्यभागास अरुणाहून फार अधिक लाली आणली. ॥९१॥
मित्रसेनाहि वीरांनीं गोंढळून न जाता पदोपदीं रक्षिलें असतांहि शत्रुयोध्द्यांच्या बाणांच्या माळांच्या पिंजर्‍यांत सांपडल्यामुळें त्या सैन्याची दुर्दशा होऊण दाणादाण उडाल्यामुळें तें थांबलें. ॥९२॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभारत अध्याय सत्ताविसावा