Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिल्ह्यात 51 हजार 770 लसीचे डोस उपलब्ध ; लस घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात 51 हजार 770 लसीचे डोस उपलब्ध ; लस घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (18:33 IST)
कोविड ची लस घेण्यासाठी नोंद करावयाच्या  संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून ही प्रणाली  आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेता येईल. जिल्हा ग्रामीण व शहरी भागातील शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयातही लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात 16 हजार 635 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 266 लाभार्यांशाना दुसराही डोस दिला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचे जिल्ह्यात 51 हजार 770 डोस उपलब्ध आहेत. या लसींचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.              
     या लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून देशभर सुरू झाला आहे . या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे, त्यांना कोविड-19 ची लस दिली जात आहे. याच बरोबर 45 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिक ज्यांना दुर्धर आजारासाठी उपचार सुरू आहेत आणि उपचाराखाली आजार नियंत्रणात आहेत, अशा नागरिकांनाही  लस दिली जात आहे. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर जसे की  पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी, महसूल किंवा पंचायत राज आदी मधील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी अद्याप  लस घेतली नाही, त्यांनाही  या टप्प्यामध्ये लस दिली जात आहे.
    लसीकरणासाठी नोंद करावयाच्या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नवीन मॉडिफाइड कोविन 2.O या नावाने सॉफ्टवेअर पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे लाभार्थ्यांना त्यांची लसीकरणाची नोंदणी करणे अत्यंत सुलभ झाले आहे. यामध्ये दोन प्रकारे नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. एक म्हणजे लाभार्थी स्वतःच्या मोबाईल अथवा कंप्युटर वरून इंटरनेटद्वारे cowin.gov.in या संकेत स्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. तसेच जवळच्या  लसीकरण केंद्रावर जाऊन कोणत्याही दिवशी लस घेऊ शकतात. याबाबत माहिती या वेबसाईडवर उपलब्ध आहे. लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार जवळच्या कोविड लसीकरण केंद्रावर आणि त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध सत्र, दिनांक याची  निवड करू शकतात. आणि त्या दिवशी 
 
निवडलेल्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी जाऊन लस घेऊ शकतात. नोंदणी करण्याच्या दुसऱ्या प्रकारामध्ये लाभार्थी ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेऊ शकतात. यात प्रत्यक्ष लसीकरण सत्राच्या ठिकाणी जाऊन तात्काळ नोंदणी करणे आणि लगेच लस घेणे आता शक्य झाले आहे.
   कोविड-19 लसीकरण सत्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करताना किंवा लस घेताना काही कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. यामध्ये ओळखपत्र यात पॅन कार्ड, मतदाता कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक यांच्यापैकी कोणतेही एक पण आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे कागदपत्र पुरेसे ठरतात. दुर्धर आजाराच्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठीही ओळखीसाठी सांगितलेल्या कागदपत्रांच्या सोबतच त्यांच्या आजाराबाबतचे नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. लाभार्थी आरोग्य कर्मचारी किंवा फ्रन्टलाइन वर्कर या गटातील असल्यास त्यांना या  ओळखपत्रांसोबतच त्यांच्या नोकरीच्या कार्यालयाचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
    या टप्प्यामध्ये लसीकरण सत्राच्या ठिकाणांची व्याप्ती देखील वाढविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील कोविड-19 लसीकरण सत्र सुरू करण्यात आले  आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही त्यांच्या नजीकच्या ठिकाणी लस घेणे शक्य झाले आहे.
   उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शासकीय आरोग्य संस्थांमधील सत्रांच्या ठिकाणांची संख्या वाढवण्यात आली आहे .  पूर्वी कार्यरत असलेल्या नऊ ठिकाणांव्यतिरिक्त नव्याने येथील शासकीय आयुर्वेदिक  महाविद्यालय , तीन ग्रामीण रुग्णालये, 37 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड-19 लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातील ठराविक दोन दिवशी हे सत्र सुरू असणार आहे. ज्याची माहिती सॉफ्टवेअर प्रणालीमुळे लाभार्थ्यांना मोबाईल वरून इंटरनेट द्वारे सहज कळू शकणार आहे. या शासकीय संस्थांमधून ही लस मोफत दिली जात आहे.शासकीय आरोग्य संस्थांसोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत अधिकृत खाजगी दवाखान्यांमधूनही लाभार्थ्यांना कोविड-19 ची लस घेता येणार आहे. खाजगी दवाखान्यातून लस घेताना लाभार्थ्यांना 250 रुपये प्रती डोस आकारले जाणार आहेत. खाजगी दवाखान्यातही  लस उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांना अधिकाधिक सोयीचे पर्याय निर्माण झालेले आहेत.
 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील लसीकरण सत्रांमधून आज पर्यंत 16 हजार 635 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. याच बरोबर 4266 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आज पर्यंत देऊन पूर्ण झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आज पर्यंत कोविशिल्ड लसीचे 34 हजार 350 डोस आणि कोव्हॅक्सिन लसीचे 17 हजार 420 डोस प्राप्त झाले आहेत. कोविड-19 ची लस अत्यंत सुरक्षित आहे. आज पर्यंत लस घेतलेल्या लाभार्थ्यां पैकी कोणालाही कसलाही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेला नाही. कोविड-19 महामारीचा धोका रोखण्यासाठी लस घेणे महत्वाचे ठरत आहे आणि आता ही लस नजीकच्या ठिकाणी आणि सोप्या पद्धतीने नोंदणीसह उपलब्ध झाली असल्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आणि जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता मित्र आपसात Netflix पासवर्ड शेअर करु शकणार नाही, कंपनीचा नवा नियम