सध्या राज्यामधील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतोना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले. राज्यात सोमवारी ३ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के असून सध्या मृत्यूदर २.४९ टक्के एवढा आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार २६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच ३६ हजार २०१ रुग्ण सक्रीय आहेत.