कोरोना विषाणूचा अत्यंत धोकादायक व्हेरियंट मानला जाणारा ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये या व्हेरियंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय 72 वर्षे आहे. गुरुवारी त्यांचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉनव्हेरियंटची लागण झाल्याची पुष्टी केली.
कोरोनाच्या मूळ व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये 50 हून अधिक म्युटंट झाले आहेत. त्याचे स्पाइक प्रोटीनमध्ये देखील लक्षणीय बदल झाले आहे. अशा स्थितीत डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ते अधिक घातक ठरू शकते, असे मानले जाते, जे भारतातील दुसऱ्या लाटेला कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. असे मानले जाते की ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या लसींनाही मात देऊ शकते. परंतु
याची पुष्टी करण्यासाठी अद्याप जास्त डेटा उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने याचे वर्णन व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून केले आहे
देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटची एकूण 3 प्रकरणे आढळून आली आहेत. यापूर्वी कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी एक रुग्ण आधीच दुबईला परतला आहे, तर दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दुसऱ्या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही.