Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
, मंगळवार, 7 एप्रिल 2020 (12:17 IST)
दिपाली जगताप
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 महिन्यांच्या गरोदर मातेचाही समावेश आहे.
 
मुंबईच्या नालासोपारा येथील या 30 वर्षांच्या महिलेचा मुंबईच्याच नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
 
त्यामुळे कोरोना व्हायरसचा गरोदर स्त्रियांना धोका किती, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या मेढेकर या 8 महिन्यांच्या गरोदर यांनी त्यांच्या मनातली हीच घालमेल बीबीसी मराठीकडे बोलून दाखवली होती.
 
"मी आणि माझं बाळ सुखरूप राहावं यासाठी मी सतत देवाकडे प्रार्थना करत आहे. पुढच्या 20 दिवसात माझी डिलिव्हरी होणार आहे. मी आई होईन. एका बाळाला जन्म देईन. पण कोरोनामुळे या महत्त्वाच्या दिवसात मी मानसिक तणावाखाली आहे. बाहेरून कुणीही घरात आलं की भीती वाटते," असं त्या म्हणाल्या होत्या.
 
"गरोदर असून इच्छा होते तो पदार्थ खाता येत नाही. अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण बाहेरही जाता येत नाही आणि घरीही बनवता येत नाहीत. ड्रायफ्रूट्स, फळ, पनीर, तूप असे आरोग्यदायी पदार्थ विकत घ्यायलाही अडचण येत आहे. दुकानं बंद असतात तर कधी त्यांच्याकडे पुरेसा साठा नसतो. गरोदरपणात आपल्यासोबत असं होत असल्यामुळे खूप वाईट वाटत आहे," विद्या सांगत होत्या.
 
"मी हायपर डायबेटीसची रुग्ण आहे. सोनोग्राफी केंद्रं बंद आहेत. वाहतूक बंद आहे. त्यामुळे डॉक्टरांनी अधिक काळजी घेण्यास सांगितलं आहे. वेळेवर गाडी उपलब्ध झाली नाही तर अशीही धास्ती वाटत राहते," विद्या पुढे सांगतात.
 
वयोवृद्ध, गरोदर महिला यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं आहे, त्यामुळे गरोदर महिलांनी प्रचंड काळजी घेण्याची गरज असल्याचं स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात.
 
'बाळाला पाहण्यासाठी येऊ नका'
जागतिक आरोग्य संकट आणि देशात लॉकडाऊन असताना या परिस्थितीत आपल्या बाळाला कुठलाही संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याबद्दल पालक जागरूक आहेत.
 
वैदही साखरे यांनी 29 मार्चला एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वडील किरण साखरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला आई-बाबा झाल्याचा प्रचंड आनंद आहे. पण कोरोनाच्या या वातावरणात काळाजी अधिक आहे."
 
"आनंद मनसोक्त साजरा करता येत नाही. कारण संपूर्ण देश बंद आहे. पण आम्ही आई आणि बाळाची पूर्ण काळजी घेत आहोत. बाहेरच्या कुणालाही भेटू दिलं जात नाही. बाळाच्या संपर्कात कुणी येणार नाही, यासाठी नातेवाईकांना बाळाला पहायला येऊ नका म्हणून सांगितलं आहे."
 
रूग्णालयांमध्ये विशेष काळजी
सरकारी, खाजगी रूग्णालयांमध्ये गरोदर महिला आणि प्रसूतिगृहांची विशेष काळजी घेतली जात आहे. पण ज्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला असे सर्व रूग्ण उपचारासाठी येत आहेत, अशा दवाखान्यात जाताना गरोदर मातांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
 
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संगीत पिकळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "कोरोना विषाणू हा आमच्यासाठीही नवीन विषय आहे. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या आम्ही जी काही काळजी घेतोय ती इतरांचे अनुभव, आतापर्यंत समोर आलेली माहिती यानुसार घेत आहोत.
 
"गरोदर महिलांची दैनंदिन तपासणी सध्या बंद केली आहे. प्रत्येक महिन्यात होणारी अल्ट्रासाऊंड तपासणीही बंद केली आहे. गरोदर महिलेला काही त्रास होत असेल तरच त्यांनी घराबाहेर पडावं असं आम्ही सांगत आहोत."
 
"प्रसूतिगृह आणि इतर वॉर्डातले कर्मचारी वेगळे केले आहेत. सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांचे वॉर्ड आणि प्रसूतीगृह हे वेगवेगळ्या मजल्यावर कार्यरत असतील याची काळजी घेतली जात आहे. महिलांनी घाबरु नये असंच मी सांगेन. कारण 40 वर्षांपूर्वी काही दर महिन्याला तपासणी होत नव्हती. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे गरोदर मातांनी मानसिक त्रास करुन घेऊ नये."
 
'गरोदर महिलांसाठी रुग्णवाहिकांची सोय करावी'
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,"गरोदर माता आणि नवजात बाळ यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे गरोदर मातांनी लोकांशी आपला संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. घरातही शक्य तितकं वेगळं राहावं. गरोदर मातांसाठी आरोग्य विभागाने रुग्णवाहिकांची सोय करणं गरजेचं आहे. कारण वाहतूक बंद असल्याने जर आपात्कालीन परिस्थिती ओढावली तर अडचण निर्माण होऊ शकते."
 
यावर आरोग्य विभागाच्या गरोदर मातांसाठी लवकरच नवीन गाईडलाईन्स येणार आहेत, त्यात योग्य त्या बाबींचा अंतर्भाव करण्यात येईल, असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी बीबीसीला सांगितलं.
 
दरम्यान, कोरोना गरोदर मातेकडून बाळाला होऊ शकतो का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञांमध्येही संभ्रम असल्याचं दिसून आलं.
 
अर्चना पाटील यांच्या मते,"आत्तापर्यंत जी काही माहिती विविध संस्थांच्या माध्यमातून समोर आली आहे, त्यानुसारच आम्ही गरोदर मातांना सूचना देत आहोत. गरोदर मातेला कोरोनाची लागण झाली, तर बाळाला लागण झाल्याची सध्यातरी कोणतीही माहिती नाही. असं कुठलंही उदाहरण समोर आलेलं नाही. त्यामुळे गरोदर मातेकडून बाळाला कोरोना विषाणूची लागण होते, असं म्हणता येणार नाही."

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक आरोग्य दिन......