Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरस हवेतून पसरतो, शास्त्रज्ञांनी सांगितली 10 शास्त्रीय कारणं

कोरोना व्हायरस हवेतून पसरतो, शास्त्रज्ञांनी सांगितली 10 शास्त्रीय कारणं
, सोमवार, 3 मे 2021 (19:09 IST)
कोरोनाच्या साथीला कारणीभूत असणारा SARS-CoV-2 विषाणू हवेतून पसरतो, असं सांगणारे प्रबळ पुरावे असल्याचं लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
 
कोरोनाचा हा विषाणू ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे बाधित व्यक्ती खोकलली किंवा शिंकली किंवा बाधित पृष्ठभागाला स्पर्श केल्यास कोरोनाची लागण होते, असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र, लॅन्सेटचा हा रिपोर्ट या समजाला तडा देणारा आणि म्हणूनच महत्त्वाचा आहे.
 
यूके, यूएस आणि कॅनडातल्या सहा तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालानुसार केवळ खोकला किंवा शिंकेद्वारे नाही तर बाधित व्यक्ती बोलली, ओरडली, गाणं म्हटलं किंवा तिच्या श्वासोच्छावासाद्वारेसुद्धा हा विषाणू पसरू शकतो, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याने तो वेगाने पसरतोय आणि मास्क वापरा, शारीरिक अंतर पाळा, हात सतत धुवा, सार्वजनिक आरोग्यासंबंधी हे जे उपाय सांगितले गेले त्यातून विषाणू प्रसाराला फारसा आळा घालता आलेला नाही, असं या रिपोर्टचं म्हणणं आहे.
कोरोनाचा Sars_CoV_2 हा विषाणू हवेतून पसरतो, हे सांगण्यासाठी या 6 तज्ज्ञांनी 10 शास्त्रीय कारणंही दिली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.
 
1. या रिपोर्टमध्ये तज्ज्ञ म्हणतात, विषाणूचे सुपरस्प्रेडिंग इव्हेंट्स Sars_CoV_2 विषाणूला वेगाने पसरवतात. जागतिक साथीचे हे सुरुवातीचे वाहक असू शकतात. मानवी वर्तन, खोल्यांचा आकार, व्हेंटिलेशन (हवा खेळती असणे), वेगवेगळे कार्यक्रम, केअर होम्स, मांस विक्री बाजार अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या अभ्यासातून एक पॅटर्न दिसतो. ज्यावरून हे लक्षात येतं की या विषाणूचा प्रसार ड्रॉपलेट्सऐवजी हवेतून म्हणजेच एअरोसोलच्या माध्यमातून होणं, अधिक सुलभ आहे.
 
2. क्वारंटाईन हॉटेल्समध्ये शेजारी-शेजारी असलेल्या खोल्यांमध्ये संसर्ग पसरल्याचं दिसलं. खरंतर बाधित व्यक्ती आपल्याच खोलीत क्वारंटाईन असताना आणि सगळी खबरदारी घेतली जात असताना शेजारच्या खोलीतल्या व्यक्तीला बाधा होता कामा नये. मात्र, क्वारंटाईन हॉटेल्समध्ये शेजारच्या खोलीतही विषाणू पसरल्याचं दिसलं. हे केवळ हवेतूनच शक्य आहे.
 
3. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लक्षणं नसलेल्या (असिम्प्टोमॅटिक) किंवा लक्षणं सुरू होण्यापूर्वी (प्रीसिम्प्टोमॅटिक) बाधित व्यक्तींच्या माध्यमातून (यात खोकलणे आणि शिंकणे याचा समावेश नाही.) एक तृतीयांश ते 59 टक्के संसर्ग पसरतो आणि जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यामागे हे एक मोठं कारण आहे.
 
4. विषाणूचा प्रसार आउटडोअर म्हणजेच मोकळ्या जागेपेक्षा इनडोअर म्हणजे बंद खोलीत अधिक होतो. बंद खोलीत हवा खेळती असेल तर ट्रान्समिशनची शक्यता कमी असते. विषाणू हवेतून पसरणारा असेल तरच अशाप्रकारचं ट्रान्समिशन शक्य आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
 
5. एकमेकांचा जवळून संबंध येणार नाही आणि पृष्ठभागावर पडलेल्या विषाणूमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा संस्थांमध्येसुद्धा संसर्ग पसरल्याचं दिसून आलं आहे. यासाठी एकच कारण असू शकतं आणि ते म्हणून विषाणू हवेतून पसरला असावा, असा दावाही ते करतात.
6. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हवेत Sars_CoV_2 विषाणू आढळून आला आहे. काही प्रयोगांमध्ये बाधित व्यक्ती असलेल्या खोलीतल्या किंवा कारमधल्या हवेत विषाणू आढळून आला आहे. किमान 3 तास हा विषाणू तरंगत असल्याचं प्रयोगावरून सिद्ध होतं.
 
7. कोव्हिड-19 रुग्ण असलेल्या हॉस्पिटल्सचे एअर फिल्टर्स आणि डक्ट्समध्ये कोरोना विषाणू आढळले आहेत. हवेतून पसरल्याशिवाय अशा ठिकाणी विषाणू आढळू शकत नाही.
 
8. काही प्रयोग प्राण्यांवरही करण्यात आले. यात एका पिंजऱ्यात बाधित प्राणी आणि दुसऱ्या पिंजऱ्यात कोरोनाची लागण नसलेला प्राणी ठेवण्यात आला. दोन्ही पिंजरे केवळ एअर डक्टने जोडले. या प्रयोगात दुसऱ्या पिंजऱ्यातल्या प्राण्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं दिसलं. यासाठी हवेतून प्रसार हे एकमेव कारण असू शकतं, असा तर्क तज्ज्ञ देतात.
 
9. आजवर झालेल्या कुठल्याही प्रयोगातून कोरोनाचा Sars_CoV_2 हा विषाणू हवेतून पसरत नाही, असं ठामपणे सिद्ध झालेलं नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
10. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स किंवा इतर कुठल्या माध्यमातून हा विषाणू पसरतो, याचेही पुरेसे प्रमाण नसल्याचं तज्ज्ञांनी या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
या रिपोर्टचा शेवट करताना तज्ज्ञांनी म्हटलं आहे, "एकंदरित आम्ही हे सूचवू इच्छितो की सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत त्याची गुणवत्ता आणि प्रमाण याकडे दुर्लक्ष करून केवळ हवेत Sars_CoV_2 असल्याचे थेट पुरावे मिळाले नाही, यावरून हा विषाणू हवेतून पसरत नाही, असा समज करणे शास्त्रीय चूक ठरेल.
 
"हा विषाणू हवेतून पसरतो, याचे भक्कम पुरावे सातत्याने मिळत आहेत. इतर मार्गांनीही हा विषाणू पसरू शकत असला तरी तो प्रामुख्याने हवेतून पसरतो, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने त्यानुसार पुढची पावलं उचलायला हवी.'

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना: लोकांच्या भल्यासाठी केंद्राने लॉकडाऊनबाबत गंभीरतेने विचार करावा - सर्वोच्च न्यायालय