मुंबईत प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील रुग्णावर करण्यात आला होता.
करोनाचा संसर्ग झाल्याने ५२ वर्षीय रुग्णाला २० एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आलं आहे. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. थेरेपीची मंजुरी मिळाल्यावर नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रथमच प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील प्रसार माध्यामांना दिली होती.