Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 
मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९०४ विमानांमधील १ लाख ९ हजार ११८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५६० प्रवासी आले असून ३०५ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
 
दिनांक १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २७३ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी  २५८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २७३ प्रवाशांपैकी २५८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  १३ जण मुंबईत तर २ पुणे येथे भरती आहेत.
 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे -
वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते. 
बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे. 
या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. 
याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे.
या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Women’s T20 World Cup 2020: ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता