कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगानं वाढताना दिसतोय. त्यात महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना कोरोनानं गाठलंय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोव्हिड झाला आहे.
ज्या नेत्यांना कोरोनाची लागण झालीय, त्यांनी ट्विटरवरून आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवरून याबाबत माहिती दिलीय.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये माहिती दिली की, महाराष्ट्रातील 10 मंत्री आणि 20 हून अधिक आमदारांना कोरोनाची लागण झालीय.
मात्र, नेमक्या कोणत्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झालीय, हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र, काही मंत्र्यांनी स्वत:हून सोशल मीडियाच्या माध्यमातून लागण झाल्याची माहिती दिली.
बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे."
"माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी," असं थोरातांनी म्हटलंय.
पंकजा मुंडे
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय.
पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून सांगितलं की, "कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि कोरोना दोन्ही आहेत."सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंतीही पंकजा मुंडे यांनी केलीय.
सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाची लागण झालीय.
सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरून माहिती दिली की, "कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे."
यावेळी सुप्रिया सुळेंनी काळजी करण्याचं कारण नसल्याचंही सांगितलं.
मात्र, त्याचवेळी त्या म्हणाल्या की, "आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या."
राधाकृष्ण विखे पाटील
भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झालीय. त्यांनीच याबाबत माहिती दिली.
विखे पाटलांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले असून, त्यांनी कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांची माफीही मागितलीय.
यशोमती ठाकूर
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांना कोणतीच लक्षणं नाहीत.संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय.
के. सी. पडवी
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
वर्षा गायकवाड
महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झालीय.वर्षा गायकवाड यांना सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी स्वत:ला विलगीकरण करून घेतलं असून, सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
प्राजक्त तनपुरे
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झालीय.प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
यासह अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झालीय.
इंद्रनील नाईक, चंद्रकांत निंबा पाटील (मुक्ताईनगरचे आमदार), समीर मेघे आणि माधुरी मिसाळ या आमदारांनाही कोरोनाची लागण झालीय.