Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओमिक्रॉन : कोरोनाची घरातच चाचणी करणारं टेस्ट किट किती आवश्यक?

ओमिक्रॉन : कोरोनाची घरातच चाचणी करणारं टेस्ट किट किती आवश्यक?
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (22:41 IST)
सध्या भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दिवसागणिक रुग्णांची आकडे वाढत जात आहेत. अशावेळी कुणी कोरोनाची चाचणी करायला हवी आणि कुणी नको, याबाबतची नियमावली केंद्र सरकारनं जारी केलीय.
 
जर तुम्हाला कोरोनाची लक्षणं नसतील आणि कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानं केवळ तुम्ही चाचणी करू इच्छित असाल, तर तुम्हाला चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर तुम्हाला इतर कुठला आजार असेल किंवा 60 वर्षांहून अधिक वय असेल, तर तुम्ही चाचणी करू शकता.
 
भारत सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, होम आयसोलेशन म्हणजे घरातल्या घरात अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याच्या वेळेस किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासादरम्यान कोव्हिड चाचणीची आवश्यकता नाहीय.
दुसरीकडे, आकडे असे सांगतायेत की, दररोज वाढणाऱ्या केसेसमध्ये घरात टेस्ट किट आणून चाचणी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेय.
 
कोव्हिड टेस्ट किट कंपनी मायलॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक हंसमुख रावल यांनी बीबीसीला सांगितलं की, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घरातल्या घरात कोव्हिडची चाचणी करण्याची सोय असलेल्या टेस्ट किटची विक्री तब्बल 400 ते 500 टक्क्यांनी वाढलीय.
घरातल्या घरात चाचणी करता येण्यासारख्या या टेस्ट किटला ICMR ने गेल्यावर्षी म्हणजे 2021 च्या मे महिन्यात परवानगी दिली होती. तेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं उच्चांक गाठला होता.
 
आता बाजारात एकूण सात प्रकारच्या टेस्ट किट उपलब्ध आहेत.
 
टेस्ट किटद्वारे नेमकी चाचणी कशी केली जाते?
या टेस्ट किटच्या योग्य वापरासंबंधी सरकारनंही सूचना जारी केल्यात. मात्र, अनेक जाणकार या किटच्या वापरातील अडचणींबाबत इशारे देत आहेत.
 
घरातल्या घरात बसून या किटद्वारे कोरोनाची चाचणी करण्यासाठी हे गरजेचं आहे की, गूगल प्ले स्टोअरवरून किंवा अॅपल स्टोअरवरून होम टेस्टिंगची माहिती देणारं मोबाईल अॅप डाऊनलोड करणं. त्यानंतर त्यात आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.
 
चाचणीच्या किटमध्ये स्वॅब स्टिक, एक सॉल्युशन, एक टेस्ट कार्ड आणि चाचणी कशी करायची याबाबतची मॅन्युअल या गोष्टी असतात.
स्वॅब स्टिकने आधी सॅम्पल घ्या, मग सॅम्पलला सॉल्युशनमध्ये ठेवा. त्यानंतर टेस्ट कार्डवर त्याचा एक थेंब टाका.
 
15 मिनिटात जर टेस्ट कार्डवर दोन लाल रेषा (सी आणि टी) दिसल्या, तर टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह मानला जातो आणि एकच लाल रेष (सी) दिसली, तर टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह मानला जातो.
 
घरात चाचणी करणाऱ्या सर्व लोकांच्या चाचणीचा फोटो मोबाईल फोनद्वारे अॅपमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. मात्र, अनेक लोक टेस्टच्या रिझल्टची माहिती सरकारला न देताच टेस्ट किटचा वापर करतायेत.
 
याच कारणामुळे जाणकारांना वाटतंय की, तिसऱ्या लाटेत रोज समोर येणारी रुग्णसंख्या खरी नाहीय.
 
मात्र, मायलॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक हंसमुख रावल म्हणतात की, "जर RTPCR टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतरही भारत सरकार मानतं की, तुम्ही अलगीकरण कक्षात राहाल. टेस्ट किट बनवणाऱ्या कंपन्याही असंच मानून चालले की, लोक नियमांचं पूर्णपणे पालन करतील आणि आपला रिपोर्ट साईटवर अपलोड करतील. आम्ही पॅकेटमध्येही लिहितो आणि इतर प्रसिद्धी माध्यमांद्वारेही लोकांना सांगत असतो."
 
अडचण कुठे येते?
दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर यांनी टेस्ट किटच्या वापरातील अडचणी समजावून सांगितल्या.
 
डॉ. किशोर म्हणतात, "टेस्ट किटच्या चाचण्या RTPCR सारख्या गोल्ड स्टँडर्ड नाहीत. घरात चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यावर लोकांचा ताण वाढतो. त्याचा कुठलाच 'क्लिनिकल फायदा' मिळत नाही. तसंच, प्रत्येकवळी बरोबर रिपोर्ट येईल, याचीही काही खात्री नसते.
 
अनेकजण घरातल्या घरात टेस्ट करत आहेत आणि पॉझिटिव्ह आल्यानंतरही आपला रिपोर्ट अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांचं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारनं इतक्या मेहनतीनं जे सर्व्हिलन्स सिस्टम उभं केलंय, ते कमकुवत होईल. अशाने आपण कोरोनाच्या जुन्या स्थितीत पोहोचू."
त्याचवेळी डॉ. किशोर असंही म्हणतात की, अशा टेस्ट किट लोकांना सशक्त नक्कीच बनवतात की, आपणच आपली चाचणी करू शकतो. मात्र, बीपी मशीन असो वा थर्मामीटर, अशा साधनांनी लोकांना मदतच केलीय.
 
घरात चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह आल्यास RTPCR टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यास आजाराचं गांभिर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये किंवा घरातच अलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला जातो.
 
मात्र, काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की, टेस्ट किट स्वस्त दरात उपलब्ध असल्यानं लोक घरच्या घरी चाचणी करतात आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती होऊ पाहतात. यामुळे हॉस्पिटल्सवर दबाव वाढत आहे.
 
चांगला वापर
काही डॉक्टरांनी या टेस्ट किटला चांगलं मानतात. डॉक्टर सुनीला गर्ग या सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्या आहेत.
 
डॉ. गर्ग म्हणतात की, "आता लोकांना चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. अनेकदा चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या गडबडीत लोकांना कोरोनाची लागण होते. या टेस्ट किटनं हा प्रकारच मोडीत काढलाय.
 
आरोग्य व्यवस्थेवरील ओझंही थोडं हलकं झालंय. तसंच, कोरोना रिपोर्टसाठी वाटही पाहावी लागत नाहीय. किटची किंमत कमी असल्यानं दोनदा टेस्ट करण्याचसही अडचण येत नाही. सहा तासांच्या अतंरानं दोनदा चाचणी करता येते."
 
मात्र, डॉ. सुनीला यांना वाटतं की, या टेस्ट किटद्वारे चाचणी केल्यानंतर लोक रिझल्ट अपलोड करत नसल्यानं खरे आकडे गोळा करण्यास अडचण होतेय.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "यासाठी लोकांनी आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. सरकारच सर्वकाही करू शकत नाही. कोव्हिड एक आजार आहे, मात्र लोक आजही तो कलंक मानतात आणि लपवतात.
 
हे काही बरोबर नाही. काही जबाबदाऱ्या किट विकणाऱ्या दुकानांवरही टाकल्या जाऊ शकतात. जेणेकरून ते लोकांना जागृत करतील की कशाप्रकारे चाचणीचा रिपोर्ट सहजपणे अपलोड करू शकतात."
 
पॉझिटिव्ह आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या मुद्द्यावर त्या म्हणतात की, यासाठी केवळ घरात चाचणी घेणाऱ्या किटचंच कारण नाहीय, कोरोनाच्या उपचारांवर सहजपणे विमा उपलब्ध होण्याचंही कारण यामागे आहे. त्यामुळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती जास्त आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती कमी आहे.
 
सुनीला गर्ग पुढे सांगतात की, "कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा धोका, या पार्श्वभूमीवर तीन पटीने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसतेय. अशावेळी पॉझिटिव्ह केसेसची RTPCR चाचणीचे आदेश दिल्यास पूर्ण यंत्रणाच कोलमडू शकते. अजूनही भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीची क्षमता नाहीय. त्यामुळे सरकारनं चाचणी आणि अलगीकरणासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत."
 
जाणकारांच्या मते, कोरोनाची घरातल्या घरात चाचणी करणं वाईट नाहीय, मात्र त्याचा वापर नीट केला पाहिजे आणि उगचाच घाबरण्याचंही कारण नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA 3rd Test: भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब