India vs New zealand : हिमाचल प्रदेशातील धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर आज होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कोणत्या संघाचा विजय रथ थांबवणार हे ठरवणार आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांनी विश्वचषकात प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत आणि स्पर्धेत ते अपराजित आहेत, मात्र रविवारी एका संघाला स्पर्धेत प्रथमच पराभव पत्करावा लागणार आहे. दोन्ही संघ पाचव्या विजयासाठी धर्मशाला येथे पोहोचले आहेत. टीम इंडियाने धर्मशालामध्ये आतापर्यंत पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. धरमशाला स्टेडियमवर भारताचे नशीब विजयाच्या बाबतीत फिफ्टी-फिफ्टी झाले आहेत.
रविवारी टीम इंडिया जिंकली तर विजयाचा आकडा तीन होईल. येथे न्यूझीलंड संघाचे मनोबलही उंचावले आहे. फलंदाज आणि गोलंदाज लयीत आहेत. या संघातील अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात ज्यामुळे भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीबाबत भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे. त्याचवेळी मिचेल सँटनरही फिरकीचे जाळे विणत आहे. मात्र, धर्मशाला येथे भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबर 2016 रोजी सामना झाला होता. यामध्ये भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 190 धावांवर आटोपला. या सामन्यात विराट कोहलीने 85 धावांची नाबाद खेळी केली.
सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये पॅराग्लायडिंगवर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे रविवारी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी धर्मशाळेतील इंद्रनाग येथील पॅराग्लायडिंग साइट आणि बीर-बिलिंग व्हॅलीमध्ये पॅराग्लायडिंग उड्डाणांवर बंदी असेल.