Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री दत्त लीलामृताब्धिसार - प्रथमलहरी

श्री दत्त लीलामृताब्धिसार - प्रथमलहरी
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (14:05 IST)
॥श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीदत्तलीलामृताब्धिसार ॥
ॐ कार ज्याचा वाचक । जगद्धेतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ॥१॥
दत्त अज निराकार । स्वेच्छा मात्रें हो साकार । अव्ययात्मा भक्‍ताधार । भक्‍तिगम्य ॥२॥
अहंकार नाहीं ज्यास । कर्तृत्वादि कैचें त्यास । तत्व नेणें हें जो त्यास । खास बंध ॥३॥
बंधें नानायोनि दुःख । भोगी जेव्हां जाणें एक । भक्तिमार्ग तेव्हां चोख । सुख पावे ॥४॥
पावे ऐसें सौख्य धर्मे । भक्तिन्यस्त नित्यकर्मे । शमादिक विप्रा कर्में । भूपा शौर्यं ॥५॥
व्यापार वैश्या शूद्रा सेवा । भर्तृसेवा स्त्रियां भवा । वारी वश्य करी देवा । भावाधीना ॥६॥
भावाधीन देव खास । एकदर्थ इतिहास । प्रतिष्ठानीं करी वास । कौशिकाख्य ॥७॥
जातिमात्रें विप्र देह । नित्यसेवी वेश्यागेह । नेणे स्वस्त्री कृतोद्वाह । मोहग्रस्त ॥८॥
ग्रस्त झाला महारोगें । शून्य झालीं त्याचीं अंगें । त्याला वेश्या टाकी वेगें । दूर देशीं ॥९॥
स्मरे तेव्हां तो भार्येला । हळू हळू गेहीं आला । सती म्हणे दैवें आला । भला देव ॥१०॥
दुर्गंध ये जरी त्यास । त्याचा वीट नसे तीस । अहोरात्र सेवी त्रास । न मानी ती ॥११॥
नीती तिणें न लंघितां । क्षणोक्षणीं हाणीं लाता । तथापि ती त्याच्या चित्ता । शांत करी ॥१२॥
पूय-मूत्र-मळ क्षाळी । तरी देतो नित्य गाळी । निजोनी तो एके वेळीं । वेश्या पाहे ॥१३॥
स्नेहें बोले तो भार्येला । वेश्यागेहीं नेयीं मला । ऐसें ऐकतांही तिला । झाला हर्ष ॥१४॥
वेश्येसाठीं भूषा’ घेयी । धरी स्कंधीं धवा बायीं । विद्युत्तेजें हळू पायीं । जायी ध्वांतीं ॥१५॥
चोरभ्रमें मांडव्यर्षी । शुळीं दिल्हा विप्र त्यासी । लागे म्हणे तो मरसी । सूर्योदयीं ॥१६॥
न हो सूर्योदय ऐसी । सती बोले स्वकार्यासी । करोनी ये स्वगेहासी । तिसी भी तो ॥१७॥
ठः ठः ठरें ठरें ऐसें । स्तंभनची होय जैसें । साध्वीवाचें सूर्या असें । तैसें स्थैर्य ॥१८॥
वषड्‌वश्य करीं करीं । या मंत्रें जो वश्य करी । साहाय्य तो तिला हरी । करी वश्य ॥१९॥
न होतांची सूर्योदय । सर्वांलाही झालें भय । यज्ञलोपें देवां होय । एकादशी ॥२०॥
आम्हीं देतां सुवृष्टीसी । याजीना जो त्या मर्त्यासी । पीडा द्यावी परी यांसी । काळ नाहीं ॥२१॥
ऐसें बोलोनी ते देव । ब्रम्ह्यापांशीं घेती धांव । ब्रह्मा बोले लपे देव । साध्वीशापें ॥२२॥
तेजें तेजा शमवावें । अनसूयेपाशीं जावें । ऐसें बोलोनी ते भावें । तेथें आले ॥२३॥
अत्रि-अनसूयेतें ते । विनवूनी पैठनातें । नेती सती बोले तीतें । माते धन्य ॥२४॥
पतीवीणें कांहीं तूज । नावडे कीं हितगुज । पती सर्वेश गे तूज । मज जेवीं ॥२५॥
स्त्रियां वेगळें न कर्म । पती देतो अर्ध धर्म । सुशीलत्वें लाभे शर्म । पतिलोकीं ॥२६॥
येरी बोले हें यथार्थ । तुझे येणें हें किमर्थ । अनसूया बोले व्यर्थ । अनर्थ हा ॥२७॥
सूर्या बोलावीं तूं जरी । तुझा भर्ता मरे तरीं । वाचवीं हें रुचें जरीं । तरी करीं ॥२८॥
तथास्तु ती म्हणे सूर्या । ये बा ऐसें ऐकोनियां । आला सूर्य तो उदया । पडे विप्र ॥२९॥
अनसूया वदे कांहीं । पतीविणें न मीं पाहीं । त्या धर्माच्या लेशें हाही । विप्र वांचो ॥३०॥
सव्याहृती’ बीजत्रय । उच्चारितां मृत्यूंजय । मृताही ये जीव होय । तैसें तेव्हां ॥३१॥
अंतर्बांह्य त्याचा भाव । पालटला जेवीं देव । द्रांबीजानें चिरंजीव । जेवीं होतो ॥३२॥
महानंद सर्वां झाला । अनूसये वर दिह्ला । त्रिमूर्ति ये त्वत्कुक्षीला । देववरें ॥३३॥
देव गेले स्वस्थानासी । अनसूया त्या साध्वीसी । पुसोनी ये स्वगेहासी । अत्रीसह ॥३४॥
अंतर्वत्‍नी वरें झाली । मार्गशीर्षी सायंकाळीं । पूर्णिमेसी प्रसवली । तीन पुत्र ॥३५॥
सोम झाला ब्रह्मांशेंची । दत्तात्रेय विष्णू साची । दुर्वासा तो हरांशेंची साध्वीधर्मे ॥३६॥
माखी न्हाणी पाजी त्यांतें । जो जो जो जो म्हणें ज्यांतें । गातां ठके वेद त्यांतें । साध्वी पाळीं ॥३७॥
सोम गेला चंद्रलोकीं । हिंडे दुर्वासा या लोकीं । पूर्ण दत्तत्रिमूर्ति की । गेहीं राहे ॥३८॥
ध्यानमग्न केव्हां नग्न । उन्मत्तसा की उद्विग्न । दिसे लोकां ब्रह्मलग्न । नानारुपें ॥३९॥
साध्य देव त्या नेणतां । बोलती कां वेदवार्ता । करीसी आश्रम आतां । कोण तूझा ॥४०॥
दत्त बोले पांचवा पां । आश्रम हा असे सोपा । निर्विकल्पें स्वात्मरुपा । जो पाहे त्या ॥४१॥
धैर्य सत्य शमें बुद्धी । धरा छेदा ग्रंथी आधी । समत्वें न द्वैत बाधी । साधी शांती ॥४२॥
गर्वाक्रोश अवमान । द्रोह कामाद्यांचें भान । नसो न सोडा वाग्बाण । सोसा हे ही ॥४३॥
जैसा पट रंगें रंगी । तैसा होयी संगें संगी । साधुसंगें साधू अंगी । वेगीं बाणें ॥४४॥
निंदा सोडा जोडा पाणी । परछिद्रा सोडा पाणी । बोला धर्म्या गोड वाणी । जाणीव घ्या ॥४५॥
अवघ्याचें सारे घ्यावें । हर्ष शोका दवडावें । ह्या आश्रमा तेव्हां पावे । भावें ऐशा ॥४६॥
ऐसें देवीं हें ऐकोनी । दत्ता परात्मा मानुनी । गेले त्या कालापासूनी । मौनी येती ॥४७॥
शिष्य होवूं पाहाती ते । डोहीं बुडी दिल्ही दत्तें । किती गेले होते त्यांतें । पारखी तो ॥४८॥
वर घेवोनी स्वाश्रया । नग्न माया मद्य प्याया । दत्त बैसे देखोनियां । पळाले ते ॥४९॥
धर्मातिक्रम साहस । जिरे ईशा न मूढास । शिवाविना जेवि वीष । जाळी अन्या ॥५०॥
कार्तवीर्य तो टिकला । तोचि सम्राट् मुक्‍त झाला । ऐका त्याच्या चरित्राला । पूर्वापर ॥५१॥
कृतवीर्य सोमवंशी । पुत्रशोक झाला त्यासी । गुरु सांगे सप्‍तमीसी । सूर्या अर्चीं ॥५२॥
अपुत्रत्व मौढय स्त्राव । कैसा होवो पुत्राभाव । व्रत दे सत्पुत्र भाव । भाव ठेवी ॥५३॥
सूर्य रुद्र सप्‍त माता । पूजीं होमीं ह्या देवता । चरु समिद्यवे ताता । आणी तिळें ॥५४॥
जीवत्पतिप्रजा नारीं । अभिषेकीं तीच्या करी । तेथें मंत्र हा उच्चारीं । वारी दोषा ॥५५॥
ग्रहर्क्षेद्र दोष वारी । जीवत्पुत्रा हे हो नारी । कोणी बोलातें न मारी । तारी हरी ॥५६॥
अभिषेक ऐसा होतां । तोषवी ते विप्रकांता । भोज्य दक्षिणा त्यां देतां । लाधे क्षेम ॥५७॥
दीर्घायू हा होवो बाल । त्रिमूर्ती गुह दिक्पाल । रिष्टहर्ते बहुसाल । पालक तें ॥५८॥
ऐसें ऐकोनी हें व्रत । राजा भावें आचरत । मैत्रेयी अनंतव्रत । तेंही सांगे ॥५९॥
एक वर्ष हविष्यान्न । पौर्णिमेसी तत्पूजन । तत्स्त्री शीलधरा दीन । पूर्ण करी ॥६०॥
स्वप्‍नी रुप दावी दत्त । होवोनियां अवधूत । बोले केलें पूर्ण व्रत । सुत घे हा ॥६१॥
माझा भक्‍त लक्षायू हा । चक्रवर्ती दुष्टारि हा । स्मर्तृगामी हो हा पहा । महाराज ॥६२॥
राज्ञी हर्षे झाली जागी । स्वप्‍न सांगे भूपा वेगीं । राजा बोले राही जागीं त्यागी झोंप ॥६३॥
दिक्पालांश गर्भी आला । मृभ्दक्ष्याचा हो डोहाळा । करी राजा संस्कारांला । झाला हर्ष ॥६४॥
उच्चीं पांच ग्रह येत । कोणाचेही नसे अस्त । तेव्हां राज्ञी हो प्रसूत । शांत काळीं ॥६५॥
जोशी सांगे झाला पुत्र । हो श्रीदत्तकृपापात्र । स्मर्तृगामी हा सर्वत्र । शस्त्रधारी ॥६६॥
वारी पापा तापा नाम । याचें घेतां नष्टागम । शेखी पावे परंधाम । नामबळें ॥६७॥
राजा हर्षें करी धर्म । आत्मजाचें जातकर्म । म्हणे माझें झालें शर्म । ऋणमुक्‍ती ॥६८॥
अर्जुंन हें नाम ठेवी । वाढे पुत्र चंद्र जेवीं । योग्य होतां व्रता सेवी । विद्या पढे ॥६९॥
कृतवीर्य दैवें मेला । न घे पुत्र तो राज्याला । सभेमध्यें तो सर्वांला । भला बोले ॥७०॥
व्यापाराचा द्वादशांश । भूमीचाही घे षष्‍ठांश । परी रक्षीना जो त्यांस । खास चोर ॥७१॥
क्रोधें लोभें दंडी दंडया । सोडी झोडी जो अदंडया । यम त्याच्या फोडी हडर्या । मांडया तोडी ॥७२॥
राजा जरी वागे न्यायें । भृत्य लुटती अन्यायें । राजा भोगी त्या अपायें । दुर्गतीतें ॥७३॥
भृत्यविश्‍वासें मी एक । कैसें वारुं एष्य दुःख । हें ऐकतां मुनी येक । ऐक म्हणे ॥७४॥
मूपा आराधीं तूं दत्ता । निववील तो त्वच्चित्ता । त्वद्रूपाला अनेकता । तो दे योगी ॥७५॥
ज्याचें सह्यगिरि स्थान । माहुरीं करी शयन । नित्य भागीरथीस्नान । तुंगापान ॥७६॥
कुरुक्षेत्रीं आचमन । कर्‍हाडांत संध्या ध्यान । कोल्हापुरीं भिक्षाटन । नित्य करीं ॥७७॥
पंढरीसी विलेपन । सारापुरी सुभोजन । स्मरतांची आगमन । शीघ्‍र करी ॥७८॥
दत्तात्रेय अभिधान । अनसूयात्रिनंदन । ज्याच्या योगे देवगण । स्वर्गी सुखी ॥७९॥
जंभदैत्य स्वर्ग जेव्हां । घेयी देवां मारी तेव्हां । गुरु सांगे सर्वां देवां । सेवा दत्ता ॥८०॥
मग देव घेती भेटी । माया दत्ता कंठीं मिठी । घाली स्वयें टाळ्या पिटी । मद्या प्राशी ॥८१॥
मारी देवां पळा म्हणे । नानापरी घाली भेणें । तथापी देव शहाणे न पळती ॥८२॥
ऐसें एक वर्ष गेलें । प्रेमें दत्त देवां बोले । देवीं सर्व निवेदिलें । झालें जें तें ॥८३॥
दत्त बोले स्त्रीउच्छिष्ट । खातां झालों मी हा भ्रष्ट । माझा नसे जरी वीट । घ्या प्रसाद ॥८४॥
शत्रू येथें आणा म्हणे । मग देव जाती क्षणें । दैत्यीं मारितां ते भेणें । आले तेही ॥८५॥
नारी दत्तांकीं देखिली । दैत्यीं भुलोनी घेतिली । दत्त बोले हानी झाली । यांची मारा ॥८६॥
परदाराकर्षणें ते । क्षीण झाले देव त्यातें । क्षणें मारोनी स्वर्गातें । घेते झाले ॥८७॥
माया दत्तरुपीं लीन । झालीं ऐसें हें ऐकोन । त्वरें आला जो अर्जुन । दत्तापाशीं ॥८८॥
तो हाणितां धिक्कारितां । कर्म बीभत्स दावितां । न जायी त्या दे उच्छिष्टा । तें तो खायी ॥८९॥
तेव्हां गेले भुज त्याचे । दत्त बोले संसर्गाचें । फळ हें जा येरु त्याचे । पाय धरी ॥९०॥
दत्त बोले सम्राट्‌ हो तूं । सर्वैश्‍वर्य गति घे तूं । सर्वज्ञ अजिंक्य हो तूं । धर्मी योगी ॥९१॥
सहस्त्रबाहू पाळक । रुपे धरसी अनेक । स्मृर्तृगामी दुर्वारक । नष्टदाता ॥९२॥
दत्ताज्ञें तो राज्यीं आला । अभिषेक देवें केला । तेव्हां बोले तो सर्वांला । ऐका आज्ञा ॥९३॥
एकला मी राज्य करीं । न दें कोणाला चाकरी । हानी होतां जो जो स्मरे । ये मी तेथें ॥९४॥
माझ्याविना जो शस्त्रातें । धरी पाप करी त्यातें । दंडीं ऐशा तदाज्ञेतें । भीते झाले ॥९५॥
राष्ट्र दुर्ग मार्ग सेना । पशु क्षेत्र धान्य धना । राखी रुपें घे तो नाना । ज्ञानाब्धीसा ॥९६॥
भूमि स्वर्गीं खपाताळीं । राजा धुंडे सर्वकाळीं । स्मरतांची त्या जवळी । धांव घेतो ॥९७॥
ऐसा बळी तो ऐकोनी । आला रावण धांवोनी । स्त्रीयां करीं त्या बांधोनीं । दे पोरांतें ॥९८॥
कुबेरें तो सोडविला । सहस्त्रार्जुन नामाला । ऐशा परी तो पावला । झाला भला ॥९९॥
प्रतिदिनीं घे दर्शन । दत्ताचें नित्य स्मरण । दशसहस्त्र हो यज्ञ । त्याणें केले ॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धौ दत्तावतारपूर्वकार्जुनानुग्रहसंज्ञा
प्रथमलहरी समाप्‍ता ॥ ओव्या १०० ॥ अक्षरें २८००॥


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Geeta Jayanti 2021 : आज गीता जयंती, श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्म आणि कर्माची शिकवण दिली होती, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व