अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण आहे. विशेष म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी हा पराक्रमाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन तसेच शस्त्रपूजन ही केले जाते.
याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचे वध केले होते तर प्रभू रामचंद्रानी याच दिवशी रावणाचा वध केला होता. तर महाभारत काळात अज्ञातवास संपवून पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरुन याच दिवशी काढली होती व त्या झाडाची पूजा केली होती.
हा दिवस विजयाचा दिवस असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. तसेही हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्तास खूप महत्व आहे आणि या दिवशी लोक शुभ कार्याची सुरुवात करतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. तसेच आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे साडेतीन मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असल्याची लोकांची धारणा असते. अशी मान्यता आहे की साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही दिवशी कार्य प्रारंभ झाल्यास त्यात नक्कीच यश मिळतं.
हिंदू धर्मात मुहूर्ताला खूप महत्तव आहे. मुहूर्त म्हणजे उत्तम वेळ, शुभ वेळ ज्यात कोणतेही शुभ कार्य सुरु करता येतात. इतर वेळी कोणतेही कार्य सुरु करताना मुहूर्त पाहावा लागतो तर परंतु हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथींचा समावेश केला ज्यात कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या मुहूर्ताला 'स्वयं सिद्ध मुहूर्त' असे म्हणतात. हिंदू धर्म शास्रात साडे तीन खास मुहूर्त असल्याचे सांगितले जाते.
गुढीपाडवा
अक्षयतृतीया
विजयादशमी (दसरा)
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
या दिवसात लोक नवीन वस्तूंची खरेदी, नवीन व्यवसायाचा प्रारंभ, सोने-चांदी यांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात.