Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Father's Day Special: ‘गप्प बसा, एक शब्दही बोलू नका’

Father's Day Special: ‘गप्प बसा, एक शब्दही बोलू नका’
, शुक्रवार, 19 जून 2020 (16:36 IST)
माझ्या आयुष्यातील घडलेल्या घटनांच्या माध्यमातून जे मला शिकायला मिळाले किंवा समाजात इतर ठिकाणी पाहायला मिळाले त्याचेच हे सार आहे. हे कुठल्या  व्यक्तीला उद्देशून लिहिलेले नसून एक पिढी आणि दुसरी पिढी दरम्यान एका कोसळून पडलेल्या पुलाप्रमाणे घडलेल्या घटनेवर आधारित असे आहे. 
 
हे सत्य आहे वार्धक्याने वाकलेल्या अशा खांद्याविषयी. ज्यांच्यावर बसून आपल्या मुलांनी अनेक जत्रा-उत्सव आदींचा मनमुराद आनंद लुटला होता. हे वास्तव आहे, आज कंपवायूने थरथरत असलेल्या हातांनी कधीकाळी आपल्या मुलांना हाताला धरून चालायला शिकवले होते. कधीकाळी मुलांना शांत झोप लागावी म्हणून हेच ओठ अंगाईगीत सुनवीत, आता मात्र त्याच मुलांकडून आपल्या ओठांना ‘गप्प बसा, एक शब्दही बोलू नका’असा धमकीवजा आदेश मिळतो. 
 
जमाना बदलला आहे, जमानबरोबर जीवनही बदललेले आहे. आमच्या वयाच्या लोकांनी आठवावे, कसे नात्यामध्ये आणि बंधनात आम्ही गुरफटलेलो होतो. पितच्या चेहर्‍यात साक्षात ईश्वर पाहात होतो. मातेच्या चरणी स्वर्ग दिसत होता. परंतु आताची पिढी सुशिक्षित झाली आहे. स्वत:ला हुशारदेखील समजते, अगदी प्रॅक्टिकल झाली आहे. मातापित्याला एक शिडीसमान मानते. त्या शिडीचा उपयोग फक्त चढून वर जाण्यापुरताच आहे असा तिचा समज. ती शिडी जुनी झाली की ती इतर वस्तूप्रमाणेच कधी अडगळीत जाईल याचा भरवसा नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात आपण मुलांना योग्य संस्कार देण्यामद्ये कुठे कमी पडलो की काय हे देखील कळाले नाही. परंतु जीवन हे एखाद्या वृक्षासारखे असते. मातापिता हे कुठल्या शिडीच्या पायर्‍या नव्हेत, ते जीवनाच्या वृक्षाचे मूळ आहेत. झाड कितीही मोठे होऊ दे, कितीही हिरवेगार असू दे, परंतु त्याचे मूळ कापले तर ते हिरवेगार राहूच शकत नाही. एक पिता आपल्या मुलाच्या जीवनातील पहिले पाऊल उचलण्यामध्ये मुलाची मदत करू शकतो तर तोच मुलगा आपल्या वृद्ध पितच्या लडखडणार्‍या पावलांना सावरण्याचा प्रयत्न का करू शकत नाही? आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखाची कामना करणारे आणि त्यासाठी कष्ट करणारे मातापिता आज जगात कमी आहेत का? पण ज्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडींना तिलांजली देऊन त्यांना मोठे करणार्‍या या मातापित्यांची आजच्या पिढीकडून किती उपेक्षा होते व त्यामुळे त्यांना किती कष्टमय जीवन जगावे लागते, अधिकतर हेच चित्र आज पाहावास मिळते. परंतु आजची पिढी हे विसरू पाहात आहे की, आज जी स्थिती तुमच्यामुळे झाली आहे तीच परिस्थिती उद्या तुम्ही जेव्हा वृद्ध व्हाल त्यावेळी तुमच्यावरही येणार आहे. म्हणून आताच सावध व्हा, वृद्धापकाळसाठी शक्यतो आधीपासूनच तरतूद करा, मुलांचे पालनपोषण करू शकतो तर स्वत:चे पालनपोषण शेवटर्पत का करू शकणार नाही?
 
प्रभाचंद्र शास्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक, एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या