माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात लिहिले आहे. गजानन महाराज गूढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते. 'गण गण गणात बोते' हा त्यांनी दिलेला मंत्र.
गजानन महाराज प्रकट दिन
वऱ्हाड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातुरकरांचा घरी मुलाच्या ऋतुशांति होती. घरात जेवण्याच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती.
अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. पत्रावळीतील अन्न पदार्थ खाऊ लागले. त्यांचा अंगावर वस्त्र देखील नव्हते. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलम होती. चेहऱ्यावर समाधान, शांती होती. ते कुठल्या तरी तंद्रीत होते.
त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुळकर्णी जात होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले. पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधुपुरुष असावा असे वाटले. कदाचित ह्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला. त्या तरुणाने सर्व पक्वान्ने एकत्र करून खाल्ल्ली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला. हे बघतातच दामोदरपंत कुळकर्णी म्हणाले- "ते पाणी घाण आहे. ते पिऊ नका".
यावर तरुणाने उत्तर दिले "घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंच पक्वांन्ने दोन्ही एकच. सर्व सुष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तो ही परमेश्वर." हे एकतातच बंकटलालांची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहे. ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले. हे साधुपुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय. ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी असे.
चित्र साभार: श्री गजानन विजय ग्रंथ