गणपती बाप्पांची आवड विचारल्यास प्रत्येकाला माहित आहे की प्रसादाच्या रूपात बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. बाप्पांचं मोदक प्रेम यावरुन देखील दिसून येतं की त्यांच्या प्रत्येक फोटो किंवा मूर्तीमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्की दिसून येतं. तर काही मूर्तीमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना बघायला मिळतो.
मोदक प्रिय असल्यामागे गोष्ट अशी आहे की १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीशी परशुरामाने युद्ध पुकारले. या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता. त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं. दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाणे त्रासदायक होत असताना लाडक्या गणरायासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला. हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ होता 'मोदक'. मोदक सहजपणे तोंडात मिसळून जातं, हा पदार्थ खाताना त्रास होत नाही तर पदार्थाची गोडी वेगळीच चव देते. त्यामुळे गणपतीला मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते.
मोदक म्हणजे आनंद...
'मोद' म्हणजे आनंद देणारे. मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होतं. गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे. तसंच मोदक शूद्ध पीट, तूप, मैदा, खवा, गूळ आणि नारळापासून तयार केला जातो. यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे मानलं जातं.
या पदार्थाला अमृततुल्य मानलं जातं. पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला होता. गणपती बाप्पांना जेव्हा माता पार्वतीकडून मोदकांचे गुण माहित पडले तेव्हा त्यांची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली. गणपती बाप्पांनी ते मोदक खाल्ले. मोदक खाल्ल्यावर गणेशाला अपार संतुष्टी मिळाली. तेव्हापासून गणेपतीला मोदक अधिक प्रिय आहेत.