गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जशी जवळ येत आहे, तसे फोन टॅपिंगचे प्रकार आता गोव्यातही सुरू झाले आहे. फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न आता गोव्यातही सुरू झाला असून 10 मार्चनंतर केंद्रीय तपास यंत्रणा या सक्रीय होतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
माझा फोन केंद्रीय तपास यंत्रणा आताही टॅप करत असून महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षाप्रमाणे वागत असल्याची टिका राऊत यांनी केली. राज्यपाल बदलावा ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी स्थापन होत असताना घडलेल्या फोन टॅपिंगच्या प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशन, पुणे बंद गार्डनला गुन्हा दाखल झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेल्या हालचालींमुळे आमचे फोन टॅप झाले. आम्ही कोणाशी बोलतोय, कुणाला भेटत आहे, काय बोलत आहे ही सगळी माहिती पोलीस अधिकारी कोणाला देत होतं हे सगळ्यांना माहित आहे. अशा प्रकारचे पॅटर्न आता अशा राज्यातही राबवले जात आहे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत.
दोन दिवसांपूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले. त्यांनी देखील भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होत आहे. त्यांनी गोव्यात एक पत्रकार परिषद घेत फोन टॅप होत असल्याची माहिती दिली. त्यांना मी माहिती दिली की सुधीर ढवळीकर, विजय सरदेसाई हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहे आणि त्यांचेही फोन टॅपिंगचे प्रकार सुरू आहे. त्यांना मी काळजी घेण्याचा सल्लाही दिला.