गुजरातमध्ये निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. अशात राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून नवनवीन वक्तव्यं येत असतात. पण गुजरात निवडणुकांमध्ये आता पाकिस्ताननी उडी घेतली आहे.
2002 मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलींबाबत भाजप नेत्याने एक वक्तव्य केलं. यावर पाकिस्तानने चिंता व्यक्त केलीय.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, 2002 साली गुजरातमध्ये जी मुस्लिम विरोधी दंगल घडली त्यात भाजप नेतृत्वाचा थेट सहभाग होता असंच या वक्तव्यावरून दिसून येतं.
पाकिस्तानचं म्हणणं आहे की, 2002 च्या गुजरात दंगलीत 2000 हून अधिक मुस्लिम मारले गेले.
पाकिस्तानने आपल्या निवेदनात पुढं म्हटलंय की, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या वक्तव्याने पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेला आधार मिळालाय.
गुजरात दंगलीमध्ये मुस्लिमांच्या हत्या आणि हिंसाचार वाढवण्यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जबाबदार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
पाकिस्तानच्या या निवेदनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय.
निवेदनात पुढं म्हटलंय की, भारताच्या गृहमंत्र्यांनी हल्लीच म्हटलंय की, गुजरात दंगलीला जे जबाबदार होते त्यांना भाजपने धडा शिकवला असून या कारवाईमुळे गुजरातमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित झाली आहे.
पाकिस्तानने असंही म्हटलंय की, भाजपने मुस्लिमांना लक्ष्य बनवून जो मानवतेविरुद्ध गुन्हा केलाय तो केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी केला असून हे कृत्य अती निंदनीय आहे.
निवेदनात पुढं म्हटलंय की, गुजरातमध्ये घडलेल्या या घटनेला आता 2 दशकं उलटून गेली. मात्र आजही भाजप पुन्हा एकदा आपल्या फुटीरतावादी धोरणांतर्गत याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही खेदाची बाब आहे.
पाकिस्तानचे म्हणणं आहे की, भारतात भाजप सत्तेवर असताना त्यांची अल्पसंख्याकांसोबतची वागणूक विशेषत: मुस्लिमांशी असलेली वागणूक भेदभावपूर्ण, अपमानास्पद, द्वेष आणि हिंसाचाराने भरलेली आहे.
पाकिस्तानने आपल्या निवेदनात असंही म्हटलंय की, यावर्षी जूनमध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 2002 च्या दंगलीतील त्यांच्या भूमिकेविषयी क्लिन चिट देण्यात आलीय.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधातल्या 11 याचिका फेटाळल्या. यातली एक याचिका राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेमध्ये 2002 च्या गुजरात दंगलीची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली होती.
या निवेदनात असंही म्हटलंय की, गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना नरेंद्र मोदींचा खराब मानवाधिकार रेकॉर्ड पाहता 2014 सालापर्यंत त्यांना अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भेटी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. आणि हे सत्य नाकारता येणार नाही.
पाकिस्तानने भारताच्या कायद्यांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यांनी आरोप करताना म्हटलंय की, भारतात भाजप-आरएसएसचा हिंदुत्वाचा अजेंडा चालवला जातोय.
पाकिस्तानने आपल्या निवेदनात, गोध्रा घटना आणि गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करावा असं आवाहन केलंय.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि विशेष करून मानवाधिकार कार्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं, तसेच भारतातील इस्लामोफोबियाच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष द्यावं असं आवाहन पाकिस्तानने केलंय.
पाकिस्तानने आपल्या निवेदनात, भारतातील अल्पसंख्याकांचे विशेषत: मुस्लिमांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षा भारत सरकारने सुनिश्चित करावी असं म्हटलंय.
गुजरात मध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. 5 डिसेंबरला तिथं मतदान पार पडणार असून, 8 डिसेंबरला तिथले निकाल जाहीर केले जातील.
शंकर सिंह वाघेलांनी काय म्हटले होते?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी गोध्रा हत्याकांडाचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, जर गोध्रा मध्ये हिंसाचार झाला नसता तर भाजप सत्तेवर आली नसती.
न्यूजलॉन्ड्रीला दिलेल्या मुलाखतीत शंकर सिंह वाघेला म्हणाले होते की, जर गोध्रामध्ये दंगल झाली नसती, रेल्वेचे डबे पेटवले नसते आणि जर राजधर्म पाळण्यात आला असता तर भाजप सत्तेवर येण्याची शक्यता खूपच कमी होती. गुजरातमध्ये रक्षकच भक्षक बनले होते.
मागच्या काही दिवसांपूर्वी शंकर सिंह वाघेला यांनी बीबीसीशी सुद्धा संवाद साधला होता.
त्यावेळी ते म्हणाले होते की, 2002 च्या दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयींना नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवायचं होतं. पण आडवाणी मध्ये आले.
वाघेला म्हणाले होते की, "एप्रिल 2002 मध्ये गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत वाजपेयींनी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून जवळपास हटवण्याचाच निर्णय घेतला होता, पण यासाठी आडवाणी तयार नव्हते.
"2016 मध्ये आडवणींच्या पत्नी कमलाजी यांचं निधन झालं तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी मी त्यांना म्हटलो की, गोव्यात तुम्ही मोदींना वाचवलं आणि त्यांनी आज तुमची पक्षात काय अवस्था केलीय? आडवाणी काहीच न बोलता फक्त रडले."
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खेडा इथं झालेल्या निवडणूक रॅलीत 2002 च्या दंगलीचा उल्लेख केला होता.
अमित शाह यावेळी म्हणाले होते की, "2002 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर असताना दंगल व्हावी म्हणून प्रयत्न झाला, पण त्यांना असा धडा शिकवला की, 2002 नंतर आज 2022 साल उजाडलं, पण कोणी मान वर करून बघत नाही. दंगल घडवणारे गुजरातच्या बाहेर गेलेत. भाजपने गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केली आहे. भाजपने हे राज्य कर्फ्युमुक्त केलंय. जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा जातीय दंगली वारंवार व्हायच्या."
2002 साली नेमकं काय घडलं होतं?
27 फेब्रुवारी 2002 चा तो दिवस. गोध्रा मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 कोचला आग लागली. आणि यात 59 कारसेवक मारले गेले. या घटनेनंतर गुजरातच्या अनेक भागात भीषण दंगल उसळली.
गोध्रा मध्ये झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर जमावाने ट्रेनच्या एस 6 कोचला आग लावली, यात 59 लोकांचा मृत्यू झाला.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जास्त कारसेवक होते. हे कारसेवक अयोध्येहून अहमदाबादकडे परतत होते. यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल पसरली.
सरकारी आकडेवारीनुसार, 2002 च्या दंगलीत 790 मुस्लिम आणि 254 हिंदू लोक मारले गेले. 223 लोक बेपत्ता झाले होते तर 2500 लोक जखमी होते. याशिवाय शेकडो कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं.
नरेंद्र मोदी, गुजरात दंगल आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल
गुजरात मध्ये 2002 साली जेव्हा दंगल उसळली तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातमध्ये जी दंगल उसळली त्याला सरकारी संरक्षण दिल्याचे आरोप मोदींवर करण्यात आले.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच एसआयटीने त्यांची चौकशी केली होती. पण सरतेशेवटी यावर्षी जूनमध्ये या प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्लिन चिट दिली.
गुजरात दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचाही मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात त्यांच्या विधवा पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र यावर्षीच्या जूनमध्ये त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
2002 साली झालेल्या दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह 59 जणांना एसआयटीने क्लीन चिट दिली होती. एसआयटीच्या या निर्णयाला झाकिया जाफरी यांनी आपल्या याचिकेतून आव्हान दिलं होतं.
त्या दरम्यान अमित शहांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. त्यात ते म्हटले होते की, तत्कालीन गुजरात सरकारवर जे आरोप लावण्यात आलेत ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेत. हे आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरूनही स्पष्ट झालंय.
अमित शाह पुढं असंही म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने 19 वर्षानंतर जो निकाल दिलाय त्यामुळे पंतप्रधान मोदींवरील सर्व आरोप फोल ठरलेत.
अमित शाह असंही म्हटले होते की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींची या प्रकरणात चौकशी झाली पण आम्ही कोणताच विरोध केला नाही. आम्ही न्यायप्रक्रियेच्या सोबत राहिलो. मला पण अटक करण्यात आली पण तरीही आम्ही कोणता विरोध केला नाही."
अमित शाह म्हटले होते की, दंगली घडल्या पण आरोप झाले मुख्यमंत्री मोदी आणि राज्य सरकारवर. या दंगली भडकवण्यात त्यांचा हात असल्याचे आरोप झाले. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं सगळं क्लिअर झालं आहे.
ते पुढे असंही म्हटले होते की, "दंगली घडल्या होत्या हे कोणीच नाकारत नाहीये. पण राज्य सरकारने दंगल घडवून आणली, असे आरोप झाले. त्यातही मुख्यमंत्र्यांचा हात होता असं म्हटलं गेलं."
पण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारंवार शांततेचं आवाहन केलं होतं असं न्यायालयाने म्हटलंय. राज्य सरकारनेही दंगल रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते असं अमित शहा सांगतात.
शाह पुढे सांगतात की, "या दंगलीत जी फायरिंग झाली त्यात फक्त मुस्लिम मारले गेले असेही आरोप झाले. पण सर्वोच्च न्यायालयाने हे आरोपही फेटाळून लावले. असं काहीच घडलं नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय."
अमित शाह सांगतात की, "याकाळात मी पंतप्रधान मोदींचं दुःख जवळून पाहिलंय. न्यायिक प्रक्रिया सुरू असताना सर्वकाही खरं असूनही आम्ही शांत राहणार असं ठरलं... अशी भूमिका एखादा कणखर व्यक्तीचं घेऊ शकतो."
गुजरात दंगलीदरम्यान जी कारवाई केली, ती उशिरा केली यावर अमित शाह म्हणाले की, जिथं गुजरात सरकारच्या कारवाईचा प्रश्न येतो तिथं सरकारने अजिबात वेळ दवडला नव्हता. ज्या दिवशी गुजरात बंदची घोषणा झाली त्याच दिवशी आम्ही लष्कराला पाचारण केलं होतं.
गुजरात दंगली घडली याला फक्त गोध्रा घटना जबाबदार असल्याचं अमित शाह म्हणाले.
ते म्हटले, गोध्रा ट्रेन जाळली हेच दंगलीचं मुख्य कारण होतं. त्यानंतर दंगल वाढली. पण पुढं ज्या दंगली घडल्या त्या राजकीय हेतूने प्रेरित होत्या.
Published By -Smita Joshi