Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भंडारकवठ्याची भाकणूक

भंडारकवठ्याची भाकणूक
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी महासिद्धांच्या यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे. भाकणुकीसाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भंडारकवठे येथील शिवयोगी महासिद्ध हे ग्रामदैवत. दरवर्षी माघी पौर्णिमेस येथे यात्रा भरते. यातील भाकणूक म्हणजे औत्सु्क्याची बाब असते. पीक-पाण्याचा अंदाज या भाकणुकीत श्री महासिद्धांचे पुजारी व्यक्त करतात.
 
ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिद्ध यांच्या जीवन चरित्राविषयी आख्यायिका प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे जाबनगौडा पाटील नावाचे गृहस्थ आपली पत्नी कन्नबाई समवेत राहात होते. कालांतराने नातेपुते येथे दुष्काळ पडला आणि हे कुटुंब इंडी तालुक्यातील गोविंदपूर या भीमा नदीच्या काठीयेऊन स्थानिक झाले. संतती नसल्याने या दाम्पत्याला लोकनिंदेला तोंड द्यावे लागले. त्याला कंटाळून त्यांनी  आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री कन्नबाईस स्वप्नात दृष्टांत झाला. दृष्टांताप्रमाणे जाबनगौडा पाटील हे विजापूर जवळील मोमेटगिरीला सिद्धसंप्रदायातील मूळ सत्त्वपुरुष श्री शिवयोगी अमोगसिद्धांच्या दर्शनासाठी आले. दर्शनानंतर त्यांना  वर मिळाला. कालांतराने या दाम्पत्याला अमोगसिद्ध महाराजांच्या कृपाशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली. हेच बाळ श्री शिवयोगी महासिद्ध होय.
 
भंडारकवठे गावाच्या नावाबाबतही अशीच आख्यायिका सांगण्यात येते. पूर्वी याचे नाव कळ्ळकवठे होते. एके दिवशी श्री शिवयोगी महासिद्ध आपल्या हरवलेल्या खिलाराच्या  (खोंड) शोधात आले होते. त्यांनी आपल्या खिलाराविषयी चौकशी केली तेव्हा ग्रामस्थांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खिलार या गावात नसल्याचे सांगितले. सिद्धी प्राप्त झालेल्या श्री शिवयोगी महासिद्धांनी तेथील लोकांचे कपटकारस्थान ओळखले. त्यानंतर त्यांनी श्री गुरू अमोगसिद्धांचे स्मरण करून आपलजवळ असलेल्या भंडार्‍याची उधळण करीत खिलाराच्या नावाने साद घातली. आणि आश्चर्य म्हणजे ही साद ऐकून अज्ञातस्थळी बंदिस्त असलेले खिलार धावून आले. तेव्हापासून कळ्ळकवठेहे गाव श्री शिवयोगी महासिद्धांच्या भंडारने पवित्र झाल्याने 'भंडारकवठे' असे नावारूपाला आले. भंडारकवठेत दरवर्षी माघ पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेत कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकरी भाकणूक ऐकण्यासाठी उपस्थित राहातात. आज मंगळवारी (30 जानेवारी) दुपारी दोन वाजल्यापासून भाकणुकीचा कार्यक्रम होणार असून कुंभाराच्या घरी जाणे, मानकरी विठ्ठल पाटील यांच्या घरातून कापूस आणणे, भीमा नदीतून जल आणणे, शेतातून कडबा आणणे आणि मध्यरात्री डोणजहून (मंगळवेढा) आलेल्या नंदीसोबत विधिपूर्वक होणार्‍या भाकणुकीस विशेष महत्त्व आहे. यामुळे भंडारकवठे हे गाव भाकणुकीसाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणून ओळखले जाते.
 
नंदकुमार वारे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जनावर निवडा आणि जाणून घ्या आपला स्वभाव