Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (06:20 IST)
हा बुधबृहस्पतींचा वार आणि पंढरपूरच्या विठोबाचा आणि देवी लक्ष्मीचा वार समजला जातो. बुधवार हा माहेरी राहण्याचा वार आहे व पंढरपूर हे सर्वांचे माहेरघर आहे.म्हणून बुधवार हा विठोबाचा वार समजला जातो.पंढरपुराला गेलेले यात्रेकरू बुधवारी पंढरपूर सोडत नाही. बुधवारी बुधबृहस्पतीकरता दोन ब्राह्मणांना भोजन देतात.
 
पांढरे बुधवार हे देखील बुधवाराचे व्रत आहे. अकरा बुधवारी उपवास करावयाचे असतात. त्याला पांढरे बुधवार असे म्हणतात.या उपवासात फक्त पांढरेच पदार्थ मीठ न घालता खातात.संपूर्ण दिवसभर पांढरे वस्त्रें परिधान करतात.या व्रतास पांढऱ्या रंगाचे महत्व आहे. रात्री उपवास सोडतांना पांढरे पदार्थ खाऊनच उपवास सोडतात. दूधभात किंवा ताकभात खातात. त्यात मीठ किंवा तिखट घालत नाही. अकरा बुधवार पूर्ण झाल्यावर बाराव्या बुधवारी उद्यापन करतात. उद्यापनाला नेहमी प्रमाणेच जेवण करतात.

बुद्धाचे रत्नं पाचू आहे. याला गुरुडपाचही म्हणतात. बुद्धीचे काम करणाऱ्यांनी ह्या रत्नाला धारण करावे. हे हिरव्या रंगाचे रत्न व्यापारी लोकं ही अंगठीत घालून धारण करतात.
 
पांढरे बुधवाराचे व्रत:
मंगळवार, शुक्रवार हे जसे देवीचे वार आहे. तसेच बुधवार हे सुद्धा खास लक्ष्मीचा वार आहे. सकाळी शौचमुखमार्जनी करून वेणी-आंघोळ करावी. पांढरे वस्त्र धारण करावे. 
 
महालक्ष्मीची पूजा करून तिला पांढरी फुले वाहावीत. दुधाचा नैवेद्य दाखवावा. 'ॐ महालक्ष्मे नमः' चा जप करावा. पांढरे उपवासाचे पदार्थ खावे. या उपवासाचे वैशिष्ट्ये असे की जो पदार्थ आपण उपवासाला खातो तोच पदार्थ 11 बुधवार होई पर्यंत प्रत्येक बुधवारी खावा लागतो. सायंकाळी लक्ष्मीची पूजा करून उपवास सोडावा. तिखट, मीठ खाऊ नये. संध्याकाळी उपवास सोडत्या वेळी दूधभात, दहीभात, ताकभात (अळणी) पोटभर खावे. तेच पदार्थ 11 बुधवार होई पर्यंत खायचे असते. तांदूळ नसल्यास गव्हाची पोळी चालेल. असे 11 बुधवार करावे. बाराव्या बुधवारी अडचण आल्यास उद्यापन होई पर्यंत वरील प्रमाणेच बुधवार करावे.
 
उद्यापनाची तयारी-
जेवणातील सर्व पदार्थ पांढऱ्या रंगाचे असावेत.(भात,कढी,पुऱ्या,श्रीखंड(केशर न घातलेले),साखरभात(केशर न घातलेले),केळ्याचे शिकरण, चिरोटे वगैरे. मुख्य पक्वान्न दुधामधली खीर(शेवयाची,गव्हल्याची) करावी. सुवासनीस जेवायला बोलवावे. तिला जेवण्याचा वेळी दक्षिणा द्यावी. पांढरे कापड द्यावे. खोबऱ्याच्या वाटीने तांदळाने ओटी भरावी. संध्याकाळी देवीच्या दर्शनास जाऊन यावे. म्हणजे उद्यापनाची सांगता झाली. 
 
बुधबृहस्पतीचे व्रत -
श्रावण महिन्यात बुधवारी बुधबृहस्पतीचे व्रत काही बायका करतात. पाटावर चंदनाच्या बुध बृहस्पतीच्या आकृती काढतात. त्याला पांढरे फुल वाहतात. दुधाचा नैवेद्य दाखवतात. महिन्याभर ही पूजा केल्यास या व्रताचे उद्यापन म्हणून साधारण बरोबरीच्या वयाचे मामा-भाचे यांस जेवावयास बोलावतात. त्या दिवशी पांढरे पक्वान्न जेवावयास करतात व मामा-भाच्यास पांढरे वस्त्रांचे दान केले जातात.
 
श्रावण्यातल्या एका शनिवारी मुंजा अंघोळीस आणि जेवावयास बोलावतात. नंतर त्याला विडा, दक्षिणा देतात. काही काही स्त्रियां श्रावणात घरात सूर्यनारायणाची पूजा प्रत्येक रविवारी करतात. पाटावर चंदनाचा सूर्य काढून त्याची पूजा करतात. ही पूजा घेणाऱ्या बायकांनी अंघोळीनंतर पूजा होई पर्यंत मौन बाळगायचे असते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विष्णुस्तवराजः