१ दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
३ अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते.
४ वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
५ रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.
६. मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसू नका.
७ तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अाराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.
६ लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे.
भाकरी पण चंद्रासारखी वाटते ,
सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची.
७ दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची.
८ झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या 'भु'चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला शांती देते.
अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.