Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 22 April 2025
webdunia

निष्ठा•••

jana bai
, मंगळवार, 30 जून 2020 (13:56 IST)
जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपूरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांना समजले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता, गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
 
कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, "इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का ?"
 
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -"ही काय, हीच की जनी ! चोरटी ! माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करत्येय ! अन वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय."
 
त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. 
 
तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले.
 
त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, "तूच जनी आहेस का ?"
यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, "होय बाबा मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा ?". 
 
तिच्या या उत्तराने अन तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते.
 
मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, "हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून दया. तुमी एव्हढं काम करा अन मग हिथून जावा. "
 
आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, "त्यात काय इतका विचार करायचा ? अगदी सोप्पं काम आहे. "
 
आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणारया शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली.
कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, " अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ' विठ्ठल,विठ्ठल' आवाज येईल ती गोवरी माझी. अन ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची !"
 
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलुन आला अन त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
 
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या अन काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून ' विठ्ठल विठ्ठल' असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही, 'आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे' हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी सारया गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
 
गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, "या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का ? एकदम साधी गोष्ट आहे. मी ह्या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच ह्या गोवऱ्यात सुद्धा असतो !"
कबीर चकित होऊन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
 
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी ह्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आषाढी एकादशी: एकादशीचे व्रत कसे साजरे करावे