Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय २०

कार्तिक माहात्म्य - अध्याय २०
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (13:39 IST)
धर्मदत्त म्हणाला - हे कलहे ! तीर्थ, दान, व्रत यांनीं पापें नाहींशी होतात; परंतु तूं प्रेतदेहांत आहेस म्हणून तो अधिकार तुला नाहीं ॥१॥
तुझी अशी खिन्न स्थिति पाहून माझे मनाला फार दुःख होतें, तुझा उद्धार केल्याशिवाय माझे मनाला समाधान होणार नाही ॥२॥ तुझे पातक फार मोठें आहे. तीन योनि भोगावें लागणारें पातक, व ही अति निंदित पिशाच योनि थोड्याशा पुण्यानें नाहींशी होणार नाहीं ॥३॥
याकरितां मी जन्मापासून आजपर्यंत जें कार्तिकव्रत केलें त्याचें अर्धे पुण्य तुला देतों; त्या योगानें तुला सद्गति प्राप्त होवो ॥४॥
यज्ञ, दान, तीर्थे, व्रतें हीं कोणतीही कार्तिक व्रताच्या पुण्याची बरोबरी केव्हांही करणार नाहीत ॥५॥
नारद म्हणालेः-- याप्रमाणें धर्मदत्तानें बोलून तिच्या अंगावर तुलसी युक्त पाणी शिंपडलें व तिला द्वादशाक्षर मंत्र ऐकविला ॥६॥
इतक्यांत ती प्रेतदेहांतून मुक्त होऊन लक्ष्मीप्रमाणें दिव्य स्वरुपवान् व अग्निज्वालेप्रमाणें तेजस्वी झाली ॥७॥
तेव्हां तिनें हर्षानें त्या ब्राह्मणास दंडवत् नमस्कार घातला व सद्गदितवाणीनें बोलूं लागली ॥८॥
कलहा म्हणालीः-- हे ब्राह्मणश्रेष्ठा ! मी तुझ्या कृपेनें या नरकापासून मुक्त झालें. पापसमुद्रात मी बुडालें होतें, त्यांतून तारण्याला तूंच नौका झालास ॥९॥
नारद म्हणतातः-- असें ती कलहा त्या ब्राह्मणाशी बोलत आहे इतक्यांत आकाशांतून विष्णुरुप धारण करणार्‍या दूतगणांनीं युक्त एक तेजस्वी, विमान आलें आहे असें तिनें पाहिलें ॥१०॥
नंतर त्यांतील पुण्यशील सुशील द्वारपालांनी तिला श्रेष्ठ विमानांत बसविलें व अप्सरा तिची सेवा करुं लागल्या ॥११॥
तें विमान पाहून धर्मदत्ताला विस्मय वाटला व ते विष्णुस्वरुपी दोन दूत पाहून धर्मदत्तानें त्यांना साष्टांग नमस्कार घातला ॥१२॥
ते पुण्यशील व सुशील नांवाचे दूत त्याला उठवून त्याचें अभिनंदन करुन धर्मयुक्त भाषण करुं लागले ॥१३॥
पुण्यशीलसुशील म्हणतातः-- हे द्विजश्रेष्ठा ! तूं विष्णुभक्त, दीनांवर दया करणारा, सर्वज्ञ व विष्णुव्रत करणारा असा उत्तम आहेस ॥१४॥
तूं लहानपणापासून जें कार्तिकव्रत केलेंस त्याचें अर्धे पुण्य दान केल्यानें त्याचे दुप्पट पुण्य तुला प्राप्त झालें ॥१५॥
इचेंही मागील शंभर जन्मांचें पातक नाहीसें झालें व स्नानाचे पुण्यानेंच जें हिचें पूर्वजन्माचें पातक तें गेलें ॥१६॥
हरिजागराच्या पुण्यानें ह्या विमानांत बसली. उत्तम प्रकारची सर्व सुखे व भोगांनीं युक्त हिला वैकुंठास नेतों ॥१७॥
दीपदानाच्या पुण्यानें हिला विष्णूप्रमाणें रुप प्राप्त झालें. तुलसीपूजादिक कार्तिकव्रतें यांचे शुभपुण्यांनी ही विष्णूच्या सन्निध गमन करणारी झाली ॥१८॥
हे कृपानिधे ! तूं हें पुण्य तिला दिलेंस त्याचें हें सर्व फळ हिला मिळालें व तूंही या जन्माच्या शेवटीं आपल्या दोन्ही स्त्रियांसह वैकुंठास येशील ॥१९॥
वैकुंठांत विष्णुस्वरुप प्राप्त होऊन विष्णू जवळ राहशील. हे धर्मदत्ता ! ज्यांनी तुझ्याप्रमाणे विष्णूची भक्तीनें आराधना केली तेच धन्य, कृतकृत्य व त्यांच्याच जन्माचे सार्थक झालें ॥२०॥
विष्णूची चांगली आराधना केली तर तो मनुष्यास काय देणार नाहीं ? सर्व कांहीं देईल ॥२१॥
ज्यानें ध्रुवाला अढळपद दिलें, ज्याच्या नामस्मरणानें मनुष्याला उत्तम गति मिळते ॥२२॥
पूर्वी नामस्मरणानें गजेंद्र नक्रापासून मुक्त होउन विष्णुसन्निध वैकुंठाला गेला व जय नांवाचा द्वारपाळ झाला ॥२३॥
तूं विष्णूची आराधना केली आहेस म्हणून विष्णूचे सन्निध येशील व हजारों वर्षे दोन्ही स्त्रियांसह तेथें राहशील ॥२४॥
तें पुण्य संपल्यावर जेव्हां पृथ्वीवर येशील तेव्हां सूर्यवंशांतील प्रख्यात असा दशरथ नांवाचा राजा होशील ॥२५॥
तेथेंही दोन स्त्रियांनीं युक्त होशील व हिला अर्धे पुण्य दिलेंस, म्हणून ही तिसरी स्त्री होईल ॥२६॥
व तेथेंही श्रीविष्णु देवकार्याकरितां तुझे पुत्र होऊन तुझ्याजवळ राहतील ॥२७॥
तूं जन्मापासून हें विष्णूला संतोषकारक व्रत केलेंस, त्यापेक्षा यज्ञ दानें तीर्थे हीं अधिक नाहींत ॥२८॥
हे ब्राह्मणश्रेष्ठा, तूं हें विष्णूला संतोष करणारे असें व्रत केलेंस म्हणून धन्य आहेस. त्या व्रताच्या अर्ध भागानें ही सफळ होऊन हिला आम्ही मुरारीच्या वैकुंठास घेऊन जातों ॥२९॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये विंशतितमोऽध्यायः ॥२०॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय १९