Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय २५

कार्तिक माहात्म्य - अध्याय २५
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:24 IST)
श्रीकृष्ण म्हणालेः- हे प्रिये सत्यभामे, याप्रमाणें नारदाचें भाषण ऐकून पृथुराजाच्या मनाला अद्भुत कथेबद्दल विस्मय व आनंद झाला. नंतर नारदाची उत्तम प्रकारे पूजा करुन त्यांना निरोप दिला ॥१॥
त्या कारणाकरितां माघमास, कार्तिकेमास व एकदशी हीं तीन व्रतें मला फार प्रिय आहेत ॥२॥
वनस्पतींत तुलसी, महिन्यांत कार्तिकमास, तिथींत एकादशी तिथी व क्षेत्रांत द्वारका हीं मला फार प्रिय आहेत ॥३॥
इंद्रियनिग्रह करुन या तिहींचे जो सेवन करील तो मला जसा फार प्रिय होतो, तसा यज्ञादिकांनीं प्रिय होणार नाहीं ॥४॥
या व्रतत्रयाचें सेवन करणाराला माझे कृपेनें पातकासंबंधी भय करण्याचें मुळींच कारण नाहीं ॥५॥
सत्यभामा म्हणतेः-- हे नाथ ! तुम्ही जें दुसर्‍यानें दिलेल्या पुण्यानें कलहा मुक्तिला गेली असें सांगितले, हें मोठें आश्चर्यकारक आहे ॥६॥
असें सामर्थ्य ह्या कार्तिकमासाचें आहे म्हणून तुम्हाला तो प्रिय आहे कीं त्यांतील केवळ स्नानाच्या पुण्यानें पतिद्रोहादि पातकें गेलीं ॥७॥
दुसर्‍यांना केलेलें पुण्य दिलें तर मिळतें, न दिलेलें पुण्य मिळण्याचा कांहीं मार्ग आहे कीं नाहीं तें सांगा ॥८॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- दुसर्‍यांनीं न दिलेलीं पुण्यपाताकें जशीं ज्या कर्मानी प्राप्त होतात तें तुला विस्तारानें सांगतों, श्रवण कर ॥९॥
कृतादि तीन युगांमध्यें कर्म करणाराचे फलभागी क्रमानें देश, गांव व कुल हीं होतात, कलींत मात्र पापपुण्य करणारासच सुखदुःख फल भोगावें लागतें ॥१०॥
संसर्ग न करितां फल कसें प्राप्त होतें त्याची व्यवस्था सांगितली; आतां संसर्गापासून पाप पुण्य दुसर्‍यास कसें प्राप्त होतें तें ऐक ॥११॥
एकत्र मैथुनानें, विवाहादि शरीरसंबंध केल्यानें, एकत्र पात्रांत भोजन केल्यानें, पुण्य पाप जें असेल त्याचें अर्ध फल प्राप्त होतें ॥१२॥
अध्ययन शिकविल्याने, दुसर्‍याचें याज्ञिक केल्यानें व एका पंक्तीला जेवल्यानेंही, पापपुण्याचा चवथा भाग अप्रत्यक्ष पर्यायानें प्राप्त होतो ॥१३॥
एका आसनावर बसल्यानें, एका यानांत बसल्यानें, अंगाला अंग लावल्यामुळे व दुसर्‍याचा उच्छास लागल्यानें त्याच्या पापपुण्याचा सहावा भाग प्राप्त होतो ॥१४॥
स्पर्शास्पर्श केल्यानें, भाषण केल्यानें व दुसर्‍याची स्तुति केल्यानें, त्याच्या पापपुण्याचा दहावा भाग प्राप्त होतो ॥१५॥
एकाद्याची भेट घेणें अथवा त्याच गोष्टी ऐकणें, व त्याचें स्वरुप मनांत आणणें यापासून त्याचे पापपुण्याचा शंभरावा हिस्सा प्राप्त होतो ॥१६॥
जो दुसर्‍याची निंदा, कपट व धिक्कार करतो, तो आपलें पुण्य त्याला देतो व त्याचें पातक आपण घेतो ॥१७॥
जो मनुष्य पुण्य करणाराची सेवा करितो तो त्याची स्त्री, चाकर किंवा शिष्य नसेल व सेवेप्रमाणें त्याला द्रव्य दिलें नसेल तर तोही सेवेच्या योग्यतेप्रमाणें पुण्य करणाराचें पुण्यांशाचा भागी होतो ॥१८॥१९॥
एका पंक्तीला जेवणारांकरितां वाढलेल्या पात्रांचें जो उल्लंघन करील तो त्याला स्वपुण्याचा सहावा हिस्सा देईल ॥२०॥
स्नानसंध्यादिक करीत असतां जो दुसर्‍याला स्पर्श करील किंवा त्याशीं भाषण करील, त्याला आपले कर्माच्या पुण्य़ाचा सहावा हिस्सा देईल ॥२१॥
धर्मकृत्याकरतां जो दुसर्‍याजवळ द्रव्य मागतो व त्या द्रव्यानें जें धर्मकृत्य करितो त्या धर्मकृत्याचें सर्व पुण्य द्रव्य देणाराला मिळतें ॥२२॥
दुसर्‍याचे द्रव्याचें हरण करुन जो पुण्यकर्म करितो त्याला द्रव्य चोरल्याचे पाप लागतें व पुण्यकर्माचें फल द्रव्याचे मालकाला मिळतें ॥२३॥
दुसर्‍यांचे ऋण परत न देतां जो मरतो, त्याचें पुण्य द्रव्याचे मानाप्रमाणें त्या सावकाराला मिळतें ॥२४॥
बुद्धि सांगणारा, अनुमोदन देणारा, साहित्य देणारा, बळ उत्पन्न करणारा हे पापपुण्याचा सहावा हिस्सा घेणारे आहेत ॥२५॥
राजा आपल्या प्रजेच्या पापपुण्याचा सहावा हिस्सा घेतो ॥२६॥
शिष्यापासून गुरु, स्त्रीपासून पति, पुत्रापासून बाप; तसें पतीपासून स्त्री हीं पुण्याचा अर्धा भाग घेतात. मात्र ती स्त्री पतीच्या मर्जीप्रमाणें वागणारी, पतीला संतोष देणारी असावी ॥२७॥
दुसर्‍याकडून दानादिक पुण्यकर्म करविणाराचें पुण्य त्याचे ते करणारे चाकर किंवा पुत्र नसतील तर कर्त्याला सहावा भाग मिळतो ॥२८॥
वृत्ति देणारा, वृत्ति भोगणाराच्या पुण्याचा सहावा भाग घेतो; मात्र तो त्यापासून आपली किंवा दुसर्‍याची सेवा करुन घेणारा नसावा ॥२९॥
याप्रमाणें दुसर्‍यांनी केलेलीं पापपुण्यें, त्यांनी दिलीं नाहींत तरी प्राप्त होतात; कलीमध्यें हा नियम नाहीं. पापपुण्य करणारा ज्याचा तो आपल्या कर्माचें फळ भोगितो ॥३०॥
पूर्वी याविषयीं एक पुण्यकारक गोष्ट घडली ती तुला सांगतों ऐक. जी ऐकली असतां पुण्य व ज्ञान प्राप्त होतें ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये पंचविशोऽध्यायः ॥२५॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय २४