Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय २७

कार्तिक माहात्म्य - अध्याय २७
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:27 IST)
श्रीकृष्ण म्हणालेः-- नंतर प्रेतपति यमाच्या आज्ञेनें धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवीत असतां म्हणाला ॥१॥
प्रेतपति म्हणतोः-- हे धनेश्वरा ! हे महाभयंकर नरक पहा. या नरकांमध्यें पापी लोकांना यमाचे दूत नेऊन पचवितात ॥२॥
हा तापलेल्या वाळूचा तप्तवालुक नांवाचा भयंकर नरक पहा; यांत हे पापी लोक देह भाजत असतां ओरडत आहेत ॥३॥
जे वैश्वदेवाचे अंतीं भुकेलेला अतिथी आला असतां त्याची पूजा करुन अन्नदान करीत नाहींत, ते या तप्तवालुक नरकांत आपले कर्मानें भाजले जातात ॥४॥
जे गुरु, ब्राह्मण, अग्नि, गाई, अभिषिक्त राजे व देव यांना ताडन करितात, ते आपआपल्या कर्मानें या नरकांत भाजले जातात ॥५॥
या नरकाचे दुसरे सहा प्रकार आहेत. नाना प्रकारचे पातक्यांना ते प्राप्त होतात. हा दुसरा अंधतामिस्र नांवाचा मोठा नरक पहा ॥६॥
येथें अंधार असून यांत पापी लोकांना सुईच्या अग्राप्रमाणें भयंकर मुखाच्या किड्यांनी, टोचून देहाला फाडून टाकलें जातें ॥७॥
याचेही सहा प्रकार आहेत; यांत कुत्रे, गिधाड इत्यादिक पक्ष्यांनी दुसर्‍याचा मर्मभेद करणारे पाप्याला पचविलें जातें ॥८॥
तिसरा क्रकच नांवाचा भयंकर नरक पहा; येथें पापी मनुष्याला करवतीनें कापून पीडा देतात ॥९॥
असिपत्र ( तरवारीचें ) वन आदिकरुन ह्याचे सहा प्रकार आहेत; जे दुसर्‍याच्या स्त्री पुत्र यांचा व इष्टमित्रांचा वियोग करवितात ते या नरकांत दुःख भोगताहेत पहा ॥१०॥
कोणाला तरवारीनें तरवारीनें तोडताहेत, कोणी तोडण्याचे भयानें पळताहेत असे हे पापी आरडत ओरडत पळत नरकांत पचताहेत ते पहा ॥११॥
अर्गल नांवाचा हा चौथा नरक पहा ॥१२॥
येथें यमाचे दूत नानाप्रकारच्या पाशांनीं पापी लोकांना बांधतात व अडसरांनीं मारतात. याचेही वधादि भेदानें सहा भेद आहेत ॥१३॥
कूटशाल्मली नांवाचा हा पांचवा नरक पहा, येथें अग्नीप्रमाणें संतप्त अशा कांट्यांनीं युक्त सावरी आहेत ॥१४॥
येथेंही पापीलोकांना सहा प्रकारच्या यातनांनीं दुःख देतात. जे दुसर्‍याची स्त्री हरण करितात, दुसर्‍याचा द्वेष करितात व दुसर्‍याचें द्रव्य घेतात, त्यांना येथें तप्तसावरीला बांधतात ॥१५॥
रक्तपूय नांवाचा हा सहावा घोर नरक पहा. येथें पापी मनुष्याला वर पाय खाली तोंड करुन रक्त, पू, यांमध्यें लोंबत सोडतात ॥१६॥
अभक्ष्य पदार्थ व मद्य मांसादि भक्षण करणारे, दुसर्‍याची निंदा करणारे व दुसर्‍याचें कपटानें छिद्र उघडकीस आणणारे, नीच यांना येथें मारतात, तोडतात, त्यामुळें ते मोठमोठ्यानें भयंकर ओरडतात. विगंध आदि करुन याचेही सहा प्रकार आहेत ॥१७॥
हे धनेश्वरा ! कुंभीपाक नांवाचा हा सातवा भयंकर नरक पहा ॥१८॥
तप्त तेल आदि करुन सहा प्रकारच्या द्रव्यांनीं याचे सहा प्रकार आहेत. ब्रह्महत्यादि महापातकें करणारे लोकांना यमाचे दूत येथें यातना भोगवितात ॥१९॥
हजारों वर्षे यमयातना जेथें भोगतात, ते हे चाळीसांपेक्षां जास्त रौरव नरक आहेत पहा ॥२०॥
न समजून घडलेलें तें शुष्कपातक व मुद्दाम केलेलें तें आर्द्र पातक, अशीं दोन प्रकारांनीं असलेली चौर्‍यांयशीं पातकें पृथक् पृथक् भेदांनीं आहेत ॥२१॥
तीं प्रकीर्ण, अपांक्तेय, मलिनीकरण, जातिभ्रंशकर, उपपातक, अतिपातक, महापातक अशीं सात प्रकारचीं मुख्य पातकें आहेत ॥२२॥
त्या सात पातकांनीं क्रमाप्रमाणे सात नरक भोगावे लागतात ॥२३॥
तुला कार्तिकव्रत करणारांचा सहवास झाला. त्या पुण्यानें तुझे हे नरक चुकले ॥२४॥
श्रीकृष्ण म्हणाले - याप्रमाणें प्रेतपतीनें त्याला सर्व नरक दाखवून यक्ष लोकाला आणिलें ॥२५॥
व तो धनेश्वर तेथें धनयक्ष नांवाचा यक्ष होऊन कुबेराचा सेवक झाला ॥२६॥
त्याच्या नांवानें विश्वामित्रानें अयोध्येंत एक तीर्थ केलें आहे ॥२७॥
कार्तिकमासाचा एवढा महिमा आहे कीं, त्याचे योगानें सर्व भोग व मुक्ति मिळते व त्या व्रताचे दर्शनानें हीं सर्व पापें जाऊन मुक्ति मिळते ॥२८॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय २६