Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय चौदावा

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय चौदावा
, बुधवार, 19 जून 2024 (11:21 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्मराज पुसे हरीस ॥ कांही कथा सांग सुरस ॥ जे ऐकतां काळिकिल्मीष ॥ दहन होती एकदांची ॥१॥
तरी आतां मजला तुम्हावीण ॥ कोण दुसरा करील निवेदन ॥ तूं आमुचा केवळ प्राण ॥ न गमे तुज आम्हासी ॥२॥
हरी सांगे धर्मासी ॥ चित्त देई राया कथेसी ॥ जे एकतां पापराशी ॥ जळती जन्मोजन्मीचें ॥३॥
एकदां दुर्वास ऋषी ॥ आला द्वारकाभुवनासी ॥ ती द्वारका वर्णावी कैसी ॥ केवळ सुवर्णाची असे ॥४॥
सुवर्णभूमी पवळियाच्या भिंती ॥ अवघे सुवर्णमय असती ॥ सोन्यावीण तेथें माती ॥ न दिसे हो सर्वथा ॥५॥
द्वारकावर्णन करावयास ॥ पाहिजे संवत्सर द्वादश ॥ जेथें असे पुराणपुरुष ॥ तेथें न्यून कांही न दिसे ॥६॥
वैकुंठाहून सुंदईर ॥ द्वारका ते परम पवित्र ॥ जीचें स्मरण करितां सत्वर ॥ उध्दार होय पूर्वाजांचा ॥७॥
ऐसी ते द्वारका पुण्यपावन ॥ तेथें दुर्वास आला आपण ॥ गोमतीचे पैलतीरी जाण ॥ उतरला होता जाण पैं ॥८॥
सांगून पाठवी द्वारकेंत ॥ भक्षावया अन्न पाठवा येथ ॥ ऐसें ऐकोन रमानाथ ॥ अन्नसिध्दी करविली ॥९॥
केली पक्वान्नें नानापरी । जे देवास दुर्लभ निर्धारीं ॥ तिन्हीं भाग बरोबरी ॥ त्याची गणती न करवें ॥१०॥
एक्या दुर्वासास अन्न ॥ दहा खंडयांचे पक्वान्न ॥ याशिवाय शिष्याकारण ॥ याप्रमाणें पाहिजे ॥११॥
अन्न सिध्द करुनी श्रीपती ॥ मग भरोनियां पराती ॥ नेते झाले वनाप्रती ॥ समागमें जाती गोपिका ॥१२॥
ऐसें अन्न झालें सिध्द ॥ भरल्या पाटया प्रसिध्द ॥ घेऊनियां गोपिका समस्त ॥ शिरी घेऊनियां चालिल्या ॥१३॥
हरी म्हणे गोपिकांप्रति ॥ हें अन्न न्यावें शीघ्रगती ॥ नेऊन द्यावें ऋषीप्रती ॥ परतिरीं गोमतीच्या ॥१४॥
येरी विनविती जोडुनी कर ॥ कैसें जावें स्वामी पार ॥ अन्न घेऊनि सत्वर ॥ जातों आम्ही आतां ॥१५॥
परी गोमतीस पुत्र अद्भुत ॥ कैसें जावें जी सांगा त्वरित ॥ हरी म्हणे ऐका मात ॥ तुम्हालागीं सांगतों ॥१६॥
ऐसें गोमतीस सांगोन ॥ कीं कृष्णा सोळासहस्त्र गोपी भोगून ॥ ब्रह्मचारी असेल पूर्ण ॥ तरीच आम्हांस मार्ग देई ॥१७॥
ऐसेम बोलतां मार्ग देईल ॥ पाणी उतरोनी जाईल ॥ सुखें परपार पावाल ॥ निश्चय धरा मानसीं ॥१८॥
त्या ह्मणती हें अपूर्व जाण ॥ सोळासहस्त्र कांता भोगून ॥ ब्रह्मचारी म्हणतां पूर्ण ॥ नवल आतां पहावें ॥१९॥
सर्वही शिरीं घेती अन्न ॥ चालिल्या सकळ त्वरें करुन ॥ गोमती तिरा येऊन ॥ प्रार्थना करित्या जाहल्या ॥२०॥
तंव तो पूर भरोनी जातां ॥ येथें काय करावें आतां ॥ मग श्रीकृष्णवचन तत्वतां ॥ सांगत्या झाल्या गोमतिसी ॥२१॥ सकळांही जोडोनीकर ॥ गोमंतीप्रती केला नमस्कार ॥ सोळा सहस्त्र गोपी श्रीधर ॥ भोगुनी ब्रह्मचारी असे ॥२२॥
जरी असेल हे सत्य जाणा ॥ तरी मार्ग देई ह्या जावया वना ॥ ऐसें ऐकतांच वचना ॥ पाणी उतरे तत्क्षणीं ॥२३॥
सत्य मानोनी हरीवचन ॥ मार्ग देती झालीजा ॥ गोमती आनंदोनी मना ॥ मार्ग देतसे तयासी ॥ २४॥
ऐसी करणी हरी करीत ॥ गोपिका झाल्या सप्रेमयुक्त ॥ हरी महिमा जाणोनी अद्भुत ॥ अबला आम्ही काय नेणूं ॥२५॥
गोपिका त्वरें चालती ॥ जेथें दुर्वास महामती ॥ आनंदे नमस्कार घालती ॥ सप्रेमभावें करुनी ॥२६॥
दुर्वास म्हणी तुम्ही कोण ॥ आल्यात अन्ने घेऊन ॥ येरी म्हणती नारायण ॥ त्याच्या स्त्रिया आम्ही आहों ॥२७॥
स्वामीस भोजनालागुनी ॥ पाठविलें षड्रस अन्न ॥ याचा अंगिकार करुन ॥ आज्ञा आम्हांसी देईजे ॥२८॥
मग दुर्वासें अन्न सकळ ॥ भक्षिलें शिष्यासह वर्तमान ॥ तृप्त झाला करुनी भोजन ॥ आशिर्वाद देतसे ॥२९॥
मग दुर्वास तेक्षणीं ॥ बोलिला कृपा करुनी ॥ घरासी येतां परतुनी ॥ भोजनी आम्ही तृप्त जाहलों ॥३०॥
येरी म्हणती प्रताप रुद्र ॥ सत्यवचनीं गुणसमुद्र ॥ महाराजा पुण्यपवित्र ॥ कैसें जावें आतां आम्हीं ॥३१॥
गोमती भरलीसे परिपूर्ण ॥ पूर आला पात्र भरून ॥ आम्ही जावें कैसें जाण ॥ सांगा आतां कृपानिधी ॥३२॥
येरू म्हणे कैशा आल्या ॥ त्या सांगती कृष्ण वचनाला ॥ आनंद न मावे दुर्वासाला ॥ मीही सांगतो तुम्हांसी ॥३३॥
गोमतीजवळी जाऊन ॥ ती सांगावी हे खूण ॥ दुर्वासासाठी अन्न खंडया भक्षुन ॥ निराहार सर्वदां ॥३४॥
ऐसें गोमतीस सांगावें ॥ मार्ग तुम्हांस देईल स्वभावें ॥ ऐकोनी गोपिकाभावें ॥ निघाल्या तेथुनी सर्वही ॥३५॥
मग येवोनी गोमतीतीरीं ॥ हस्त जोडूनी निर्धारी ॥ साठ खंडया अन्न भक्षण निराहारी ॥ दुर्वास असे तरी मार्ग देई ॥३६॥
ऐसें गोमंतीनें ऐकुनियां ॥ गेली तेव्हांच उतरोनियां ॥ मार्ग दिधला जावया ॥ तेच समयीं गोपिकाप्रती ॥३७॥
गोपिका आनंदल्या फार ॥ सत्वर पावल्या द्वारकापुर ॥ हरीस करुनी नमस्कार ॥ श्रीकृष्णासी देखोनियां ॥३८॥
हरीच्या सन्मुख्ह येवोनियां ॥ उभ्या राहिल्या कर जोडूनी ॥ वर्तमान झाला तो सांगोनी ॥ आपुल्या घरोघरीं त्या गेल्या ॥३९॥
ऐकें धर्मा सावधान ॥ कोकिळा व्रताचा महिमान ॥ सांगती त्यास पुण्यपावन ॥ होय जाण सर्वदां ॥४०॥
कोकिळेची पूजा करुन ॥ मग करावें कथा श्रवण ॥ त्या पुण्याचें वर्णन न करवेची सर्वथा ॥४१॥
धर्मास सांगे श्रीहरी ॥ कोकिळाव्रतासी करावें निर्धारी ॥ करील तयासी निर्धारीं ॥ जन्मवरी सौभाग्य प्राप्त होईल ॥४२॥
ऐसा कोकिळेचा महिमा ॥ करेई तयाच्या पुण्याची सीमा ॥ यापरतें व्रत उत्तमा ॥ नाही आणिक दुसरें ॥४३॥
इति श्रीभविष्योत्तरपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्ये ॥ चतुर्दशोऽध्याय: ॥४४॥ ॥ अध्याय ॥१४॥ ओंवी ॥४४॥
॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय १४ वा समाप्त: ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय तेरावा