Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या

lord shiva
, सोमवार, 11 जुलै 2022 (07:53 IST)
ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता ।
पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥
ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा ।
मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥
जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ।
मनोजदमनी मनमोहना । कर्ममोचका विश्र्वभरा ॥ ३ ॥
जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ।
नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ ४ ॥
संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण ।
न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥ ५ ॥
न कळतां प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ ।
औषध नेणतां भक्षित । परी रोग हरे तत्काळ ॥ ६ ॥
जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा ।
चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥ ७ ॥
हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना ।
ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजन महेश्र्वर ॥ ८ ॥
हे वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्र्वरा ।
अर्धनारीनटेश्र्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ९ ॥
धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं ।
तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥ १० ॥
न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्वकर्ता कारण ।
कोठें प्रगटशी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥ ११ ॥
जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ।
सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥ १२ ॥
' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥ १३ ॥
बहुत शास्रवक्ते नर । प्रायश्र्चित्तांचा करितां विचार ।
परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्र्चित्तां आगळें ॥ १४ ॥
नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।
त्यासी सर्व सिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १५ ॥
जय जयाची पचंवदना । महापापद्रुमनिकृंतना ।
मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥ १६ ॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा ।
पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ १७ ॥
नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवाहना अंधकमर्दना ।
दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥ १८ ॥
जय जय किशोर चंद्रशेखरा । उर्वी धरेंद्रनंदिनीवरा ।
त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥ १९ ॥
कोटि भानुतेजा अपरिमिता । विश्र्वव्यापका विश्र्वनाथा ।
समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्तत्रयीमूर्ते ॥ २० ॥
परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा ।
पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ २१ ॥
जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ति । तू वंद्य भोळा चक्रवर्ति ।
शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीति कथिलीस ॥ २२ ॥
जय जय भस्मोद्धूलितांगा । योगध्येया भक्तभवभंगा ।
सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपाशीं ॥ २३ ॥
जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम ।
धिक् गृह पर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥ २४ ॥
जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार ।
ज्यासी शिव शिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥ २५ ॥
जयाची शिवनामीं भक्ति । तयाचीं पापें सर्व जळती ।
आणि चुके पुनरावृत्ति । तो केवळ शिवरुप ॥ २६ ॥
जैसें प्राणियाचें चित्त । विषयीं गुंते अहोरात्र ।
तैसें शिवनामीं लागत । तरी मग बंधन कैचें ॥ २७ ॥
कामगजविदारकपंचानना । क्रोधजलप्रभंजना ।
लोभांधकार चंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥ २८ ॥
मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना ।
लोभ महासागरशोषणा । अगस्त्यमहामुवर्या ॥ २९ ॥
आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा ।
रुडंमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३० ॥
धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥ ३१ ॥
सूत सांगे शौनकांप्रति । जे भस्मरुद्राक्ष धारण करिती ।
त्यांच्या पुण्यासि नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥ ३२ ॥
जे करिती रुद्राक्ष धारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण ।
केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥ ३३ ॥
ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण ।
स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥ ३४ ॥
शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र ।
लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥ ३५ ॥
जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशूसमान ।
मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥ ३६ ॥
शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें ।
ऐसें माहात्म शंकराचें । निगमागम वर्णिती ॥ ३७ ॥
जो जगदात्मा सदाशिव । ज्यासि वंदितीं कमलोद्भव ।
गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥ ३८ ॥
जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ।
शुद्ध चैतन्य जगदादिकद । विश्र्वंभर दयाब्धी ॥ ३९ ॥ जो पंचमुख दशनयन । भार्गववरद भक्तजीवन ।
अघोर भस्मसुरमर्दन । भेदातीत भूतपति ॥ ४० ॥
तो तूं स्वजन भद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां ।
ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडी ॥ ४१ ॥
म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन ।
तरी या संकटांतून काढुनि पूर्ण संरक्षी ॥ ४२ ॥
॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥ 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोम प्रदोष व्रत पूजा विधी, मंत्र आणि कथा