ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी या व्रताचे दैवत आहेत.
ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार केले, त्यांना योग्य दिशा दाखविली, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी करुन हा दिवस साजरा केला जातो.
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषिऋण फेडण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत करतात.
या प्रकारे करावे व्रत
या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
आंघोळ झाल्यावर संकल्प घ्यावा- मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे लागणार्या दोषाच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे.
पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवाव्या. सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन करावे आणि षोडशोपचार पूजन करावे.
या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा. बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये. या दिवशी जनावरांच्या मदतीने बनविलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते.
दुसर्या दिवशी सप्तऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.
बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करता येतं.
उद्यापन केल्यावरही व्रत चालू ठेवण्यास हरकत नाही.