Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय ७

श्री भक्तविजय अध्याय ७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
॥ ऐका संतचरित्र ग्रंथसार ॥ हाचि पयोब्धि क्षीरसागर ॥ नाना दृष्टांत हे जलचर ॥ सप्रेम जीवनीं धांवती ॥१॥
आवडीच्या लाटा उसळती ॥ ज्ञानाकाश भेदूं पाहती ॥ भाविक मेघ धांवोनि येती ॥ जीवन पीती कथानक ॥२॥
मग संसारतापेंकरून ॥ संतप्त झाले होते जन ॥ त्यांवरी वर्षती जाऊन ॥ स्वानंदजीर्वन ते वेळीं ॥३॥
श्रीपांडुरंगकृपा चंद्र थोर ॥ तो उदयासी येतां साचार ॥ मग या सागरासी अपार ॥ सप्रेम भरतें आवरे ॥४॥
कीर्तप्रसंगपर्वकाळीं जाण ॥ जो या ग्रंथसागरीं करील स्नान ॥ त्याचा भवरोग दारुण ॥ जाईल जाण निश्चयेंसीं ॥५॥
मागील अध्यायीं कथा पवित्र ॥ संतीं उठविला कबीरपुत्र ॥ पुढें काय वर्तलें चरित्र ॥ श्रोते पवित्र परिसावें ॥६॥
एके दिवशीं कमालतात ॥ रात्रीं चालिला बाजारांत ॥ श्रीरामभजन प्रेमयुक्त ॥ करीतसे तेधवां ॥७॥
वीणा घेऊनियां करीं ॥ मंजुळस्वरें कीर्तन करी ॥ श्रीरामरूप आठवूनि अंतरीं ॥ सप्रेमभरीं गातसे ॥८॥
मोह ममता मानाभिमान ॥ दुराशा टाकून निजमन ॥ सांडोनि अहंता मीतूंपण ॥ श्रीरामचिंतन करीतसे ॥९॥
तों एक वाणीण बाजारांत ॥ दळीत बैसली असे तेथ ॥ तें दृष्टीं देखोनि कबीरभक्त ॥ द्रवलें चित्त तयाचें ॥१०॥
उभा ठाकूनि ते अवसरीं ॥ दीर्घस्वरें रुदन करी ॥ देखोनि हांसता नरनारी ॥ नवल करिती तेधवां ॥११॥
एक पुसती कबीरासी ॥ कां गा येथें रुदन करिसी ॥ कोणें गांजिलें आहे तुजसी ॥ सांग आम्हांसी ये वेळे ॥१२॥
ऐसें बोलती लोक अपार ॥ परी कोणासी नेदी प्रत्युत्तर ॥ म्हणे माझ्या दुःखाचा परिहार ॥ यांचेनि साचार नव्हे कीं ॥१३॥
शिणल्यपासीं सांगतां दुःख ॥ तरी अधिकचि वाटे संताप ॥ दुर्दुरें मित्र केलीया सर्प ॥ सौख्य अणुमात्र नेदीच तो ॥१४॥
मद्यपियासी विवेक नीती ॥ चतुर पंडित न पुसती ॥ रोगियापासोनि औषध न घेती ॥ तार्किक जैसे सर्वथा ॥१५॥
नातरी तृषा लागतां अपार ॥ चातक न पीती नदीचें नीर ॥ कीं चंद्रउदयावीण साचार ॥ चकोर तृप्त होतीचना ॥१६॥
कीं खळ अज्ञान असतां श्रोता ॥ प्रेमउल्हासें न वदेचि वक्ता ॥ कीं पार्‍याचे मोतियां सर्वथा ॥ राजहंस चित्ता न आणिती ॥१७॥
कीं मातंग देखोनि दुरून ॥ द्विज न देती आशीर्वचन ॥ कीं निंदकापासीं एकांत जाण ॥ चतुर सज्ञान न सांगती ॥१८॥
तेवीं मायालोभी अज्ञान नर ॥ कबीरासी पुसती विचार ॥ परी तो नेदीच प्रत्युत्तर ॥ रुदन करी अनुतापें ॥१९॥
नानापरींचे त्रिविध जन ॥ एकमेकांसीं बोलती वचन ॥ कबीरासी वेड लागलें म्हणून ॥ उगाच रडतो बाजारीं ॥२०॥
तंव निपटनिरंजन ते समयीं ॥ अवचित आले तये ठायीं ॥ कबीरासी पुसती लवलाहीं ॥ किमर्थ शोक मांडिला ॥२१॥
नेत्र उघडोनि जंव पाहे ॥ तंव ज्ञानसागर पुढें उभा आहे ॥ मग धैर्य धरूनि लवलाहें ॥ बोलता जाहला ते समयीं ॥२२॥
म्हणे यासी सांगतां साचार ॥ कांहीं करील परिहार ॥ ऐसें म्हणोनि भक्त कबी ॥ बोलतां जाहला ते समयीं ॥२३॥
सद्वैद्यासी व्यथा सांगतां जाण ॥ रोगियांचें उल्हासयुक्त मन ॥ कीं मायेपासीं सासुरवासिण ॥ दुःख सांगतां न वंची ॥२४॥
कां संशय वाटला चित्तासी ॥ तो सच्छिष्य सांगे श्रीगुरूसी ॥ तेवीं कमालतात निपटयासी ॥ सांगता जाहला तेधवां ॥२५॥
कबीर म्हणे सद्गुरुमूर्ती ॥ अनुताप जाहला माझे चित्तीं ॥ कृपावंतें पुसिलें प्रीतीं ॥ तरी सांगतों रीती ते ऐका ॥२६॥
जांतें फिरतां देखिलें जाण ॥ त्यामाजी पीठ होताती कण ॥ तैसी गती मजकारण ॥ भवचक्रांत पडली या ॥२७॥
म्हणोनि भय वाटलें देख ॥ अट्टहासें मांडिला शोक ॥ तुम्हांवांचूनि भवदुःख ॥ कोण निवारील आमुचें ॥२८॥
ऐकोनि निपट बोले त्यासी ॥ व्यर्थ कां उगाचि शोक करिसी ॥ जांतें फिरतां देखोनि तुजसी ॥ अनुताप चित्तासी वाटला ॥२९॥
तरी येचिविषयीं विष्णुभक्ता ॥ संशय निरसीन तुझा आतां ॥ आधार टाकूनि भोंवतें फिरतां ॥ काळचक्रीं पीठ होती ॥३०॥
खुंटियासी कण लागोनि राहिले ॥ ते काळचक्रीं पीठ नाहीं जाहले ॥ तेवीं श्रीरामभजनीं जे विनटले ॥ ते काळें ग्रासिले नाहींत कीं ॥३१॥
तूं तरी सत्त्वधीर वैराग्यशीळ ॥ शांतिक्षमेचा होसी अचळ ॥ आणि स्वप्नींचें भय देखोनि तळमळ ॥ व्यर्थ कासया करितोसी ॥३२॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ कबीर जाहला सावचित्त ॥ प्रेमभावें आलिंगीत ॥ एकमेकांसी तेधवां ॥३३॥
येरयेरांसी नमस्कार ॥ प्रेमें घालिती वैष्णववीर ॥ मग कबीर तेथोनि सत्वर ॥ आश्रमासी पातला ॥३४॥
नानापरींचे प्रबंध कवित ॥ नित्य हरीचे गुण वर्णीत ॥ आनंदभरें प्रेमयुक्त ॥ नित्य करीत कीर्तन ॥३५॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ निजमानसीं विचार करी ॥ म्हणे सद्गुरु न करितां संसारीं ॥ तो प्रेतवत प्राणी म्हणावा ॥३६॥
कांतेविण प्रपंच करणें ॥ मंदिर शून्य बाळकाविणें ॥ कुंकुमाविणें अलंकार लेणें ॥ व्यर्थ जैसें दिसतसे ॥३७॥
फळें न येतां वृक्ष वाढला ॥ कीं पुरुषार्थाविण राव जन्मला ॥ लवण नसतां स्वयंपाक केला ॥ व्यर्थ जैसा अलवण ॥३८॥
आयुष्येंविण तारुण्यशरीर ॥ कीं द्रव्यावांचूनि सावकार ॥ महत्त्वावांचूनि कारभार ॥ व्यर्थ कासया उगाचि ॥३९॥
मेघावांचूनि वर्षाकाळ ॥ कीं जीवनेंविण तळें विशाळ ॥ कीं तीर्थावांचूनि पर्वकाळ ॥ कुग्रामांत पडिलेया ॥४०॥
कणांवांचूनि जैसीं कणसें ॥ धन्यावांचूनि शून्य परिवार दिसे ॥ प्रेमावांचूनि कीर्तन जैसें ॥ गोरियाचें गायन ॥४१॥
मर्यादेविण मित्रपण ॥ कीं भूतदयेविण जैसें ज्ञान ॥ कीं अनुतापेविण संन्यासग्रहण ॥ व्यर्थ कासया करावें ॥४२॥
द्रव्यावांचोनि भोगविलास ॥ कीं नेमावांचूनि व्रत कायेस ॥ शांति नसतां महापुरुष ॥ व्यर्थ कासया म्हणविती ॥४३॥
चंद्रावांचोनि चातकें जाण ॥ दिसती जैसीं शोभाविहीन ॥ तेवीं सदुगुरूवांचोनि नरदेहा येणें ॥ वृथाचि येरझार केली कीं ॥४४॥
तरी रामानंद स्वामी संन्यासी ॥ सद्भावें शरण जावें त्यांसी ॥ विचार करूनि निजमानसीं ॥ निश्चय करूनि राहिला ॥४५॥
अनेक राजे देखोनि नयनीं ॥ विचार करीजनकनंदिनी ॥ मग श्रीरामरूप देखोनी ॥ मनेंकरूनि वरियेला ॥४६॥
श्रीकृष्णध्यान ऐकोनि भीमकात्मजा ॥ वरूं आहे अधोक्षजा ॥ तेवीं रामानंदाचे चरणरजा ॥ धरिली आशा कबीरानें ॥४७॥
मग एकांत पाहूनि एकदिनीं ॥ सत्वर उठिला तयेक्षणीं ॥ रामानंदाचे आश्रमीं जाउनी ॥ चरणीं प्रेमें लागला ॥४८॥
उभा ठाकोनियां दूरी ॥ रामानंदासी विनंति करी ॥ म्हणे स्वामी मजवरी ॥ कृपा करावी समर्था ॥४९॥
ऐसी कबीराची वाणी ॥ ऐकोनि बोटें घातलीं कानीं ॥ गुंफेमाजी जाउनी ॥ एकांत आसनीं बैसले ॥५०॥
कबीर ठाकोनि बाहेरी ॥ काय बोले मधुरोत्तरीं ॥ दीन अनाथ ठाकलों द्वारीं ॥ अभय देऊनि तोषवा ॥५१॥
मग म्हणे कबीरासी ॥ तूं जन्मलासी अविंधवंशीं ॥ उपदेश द्यावया आम्हांसी ॥ अधिकार नाहीं सर्वथा ॥५२॥
भूमी पाहोनि बीज पेरणें ॥ सत्पात्र पाहूनि दान करणें ॥ वर पाहूनि कन्या देणें ॥ सर्वज्ञ जन जाणती ॥५३॥
कबीर बोले ते समयीं ॥ माझा निश्चय तुमचे पायीं ॥ काया वाचा मनें पाहीं ॥ वंचिलें नाहीं सर्वथा ॥५४॥
चंद्राचा हेत चकोरावरी ॥ अनन्य प्रीती नसली जरी ॥ परी अमृतवर्षाव तयावरी ॥ ईश्वर करी निजनिष्ठें ॥५५॥
कमळिणीवरी अनन्यप्रीती ॥ उदय न होतां न करी गभस्ती ॥ परी त्या विकासातें न पावती ॥ अन्य प्रीति लावूनी ॥५६॥
मातीचा द्रोण केला जाणें ॥ कोळियास भाव फळला तेणें ॥ तेवीं मी काया वाचा मनें ॥ स्वामीचे चरण धरियेले ॥५७॥
ऐसें म्हणोनि स्वामीप्रती ॥ पुनः दंडवत घातला प्रीतीं ॥ घरासी गेला सत्वरगतीं ॥ अनन्य प्रीती लावोनी ॥५८॥
एकांतीं बैसूनि एके दिनीं ॥ विचार करित निजमनीं ॥ म्हणे स्वामीच्या मुखेंकरूनी ॥ रामनामध्वनी ऐकावी ॥५९॥
आणि चरणरज लागती जेणेंकरून ॥ ऐसा उपाय रचावा कवण ॥ मग मार्गावरी गार खणोन ॥ केलें शयन ते ठायीं ॥६०॥
मानससरोवरींच्या कमळिणी ॥ निशाकाळीं जाती मिळोनी ॥ म्हणती कधीं उगवेल वासरमणी ॥ उल्हास मनीं होईल ॥६१॥
कीं तृषा लागतां अपार ॥ चातक इच्छिती जलधर ॥ तैशा रीतीं भक्त कबीर ॥ वाट पाहे श्रीगुरूची ॥६२॥
कीं येतां पौर्णिमेचा सुदिन ॥ चकोर इच्छिती चंद्रदर्शन ॥ कीं क्षुधातुर बाळक जाण ॥ वाट पाहे जननीची ॥६३॥
कीं अवर्षण पडतां अपार ॥ प्रजा इच्छिती जलधर ॥ तैसी रामानंदाची भक्तकबीर ॥ वाट पाहे निजप्रीतीं ॥६४॥
तंव मागील रात्र घटिका चार ॥ राहिली असे साचार ॥ रामानंद स्वामी सत्वर ॥ गंगास्नानासी चालिले ॥६५॥
चालत जातां वेगेंसीं ॥ पाय लागला कबीरासी ॥ राम राम म्हणोनि वाचेसी ॥ चरण कोणासी लागल ॥६६॥
वचन ऐकोनि साचार ॥ उभा ठाकला भक्त कबीर ॥ म्हणे स्वामी मजवर ॥ कृपा अपार आजि केली ॥६७॥
सहज भाळीं लागले चरण ॥ राम राम हा मंत्रश्रवण ॥ मजऐसा सभाग्य जाण ॥ त्रिभुवनीं कोणी दिसेना ॥६८॥
अनंत जन्मीं सुकृत केलें ॥ त्याचें फळ आतां पावलें ॥ आजि जन्म मरण माझें टळलें ॥ सद्गुरुचरण लागतां ॥६९॥
प्राक्तन साह्य होतांचि जाण ॥ सिकतेचीं होती दिव्यरत्नें ॥ आडांतील क्षार असतां जीवन ॥ अमृताऐसें तें होय ॥७०॥
रामानंदस्वामीसमोर ॥ सप्रेम नाचे भक्त कबीर ॥ मनीं वाटला आनंद थोर ॥ स्वानंदें निर्भर जाहला ॥७१॥
भुकेलियासी मिळालें मिष्टान्न ॥ कीं झाड सुकतां वर्षता घन ॥ कीं आयुष्यहीनासी अमृतपान ॥ शचीरमणें पाजिलें ॥७२॥
दुर्बळासी सांपडल्या द्रव्यराशी ॥ कीं दिव्यरस लाधला रोगियासी ॥ नातरी सत्संग जोडतां साधकांसी ॥ आनंद मानसीं न समाये ॥७३॥
कीं सासुरवासिणीसी भेटली माय ॥ कीं दुर्बळा जोडली कामधेनु गाय ॥ कीं प्रतापें भद्रीं बैसतां राय ॥ आनंद होय तयासी ॥७४॥
गौतमासी लाधली गोदावरी ती ॥ स्वानंदभरित झाला चित्तीं ॥ कीं भगीरथें आणिली भागीरथी ॥ आनंद चित्तीं वाटला ॥७५॥
कीं वनांत असतां अंजनीसुत ॥ अकस्मात भेटला श्रीरघुनाथ ॥ कीं नारद देखतां सत्यवतीसुत ॥ स्वानंदभरित जाहला ॥७६॥
यापरी कबीराचें मन ॥ पावलें असे समाधान ॥ रामानंदस्वामी हांसोन ॥ विस्मित मनीं जाहलें ॥७७॥
मौन धरूनि ते समयीं ॥ स्नानासी गेले लवलाहीं ॥ म्हणे कबीराऐसा निश्चय पाहीं ॥ कोणाचा नाहीं देखिला ॥७८॥
तरी करूनि याचें छळण ॥ कसवटीस लावूनि पाहावें मन ॥ पोटीं हीणकसी असेल सोनें ॥ तें परीक्षक तावून पाहाती ॥७९॥
कीं ऐरणीवरी ठेवूनि हिरा ॥ घण मारूनि पाहती खरा ॥ कीं सूत गुंडाळूनि मोहरा ॥ टाकिती बरा अग्नींत ॥८०॥
कीं विश्वामित्रें करूनि छळण ॥ हरिश्चंद्राचें पाहिलें मन ॥ कीं श्रियाळापासीं उमारमण ॥ अतीत होऊन पातला ॥८१॥
कीं शरपंजरीं पडिला कर्ण ॥ तेथें दान मागावया गेला कृष्ण ॥ तेवीं बाह्यात्कारें राग धरून ॥ पाहूं मन कबीराचें ॥८२॥
तंव एके दिवशीं बाजारांत ॥ कबीर आनंदें गात नाचत ॥ आनंदाश्रु नेत्री वाहत ॥ सप्रेमभरित तेधवां ॥८३॥
प्रेमें नाचत निजछंद ॥ म्हणे माझा गुरु रामानंद ॥ त्याचें हृदयीं चरणारविंद ॥ धरितां आनंद मानसीं ॥८४॥
ऐसा सप्रेम गातां जाण ॥ रामानंद ऐकती दुरून ॥ पायींच्या खडावा काढून ॥ क्रोधेंकरून काय बोले ॥८५॥
माझा शिष्य उगाचि म्हणसी ॥ कधीं उपदेश दिधला तुजसी ॥ कोण साक्षी ठेविले यासी ॥ ऐसें आम्हांसी सांगावें ॥८६॥
म्हणोनि ते अवसरीं ॥ पादुका हाणिली मस्तकावरी ॥ जैसी माता बाळकावी ॥ बाह्यात्कारें कोपत ॥८७॥
कीं वरिवरी राग धरून ॥ माता कन्येसी दे शिकवण ॥ कीं विद्या यावी म्हणून ॥ करी ताडण कुळगुरु ॥८८॥
कां सकळ रोग व्हावया वाव ॥ बळेंचि पशुसी देती डाव ॥ कां सुवर्णासी देऊनि ताव ॥ परीक्षा घेती सुजाण ॥८९॥
तेवीं कबीराचा पहावया निर्धार ॥ पादुका हाणीतली मस्तकावर ॥ भडभडां वाहतसे रुधिर ॥ परी कबीर थोर संतोषला ॥९०॥
म्हणे ऐका जी चित्त देऊनी ॥ उपदेश दिधला मजलागूनी ॥ तेव्हां साक्षी नव्हतें कोणी ॥ म्हणोनि स्वामींनीं निर्भर्त्सिलें ॥९१॥
आतां देखतां सकळ लोकां ॥ माझे शिरीं दिधली पादुका ॥ ठावें असोंद्या सकळिकां ॥ ऐसें लोकां सांगतसे ॥९२॥
आप पृथ्वी वायु जाण ॥ आकाश तेज नारायण ॥ यांसी साक्षी ठेवून ॥ तुमचे चरण सेविले म्यां ॥९३॥
ऐसें बोलतां कबीर भक्त ॥ संतोषले सद्गुरुनाथ ॥ कबीरपासीं जाऊनि त्वरित ॥ मस्तकीं हात ठेविला ॥९४॥
तुझा निश्चय पाहतां जाण ॥ माझे कसीं उतरलें मन ॥ आतां रामकृष्णमंत्र जपोन ॥ करीं भजन अहर्निशीं ॥९५॥
ऐसें बोलतां सद्गुरुनाथ ॥ कबीर जाहला आनंदभरित ॥ नानापरींछे प्रबंध कवित ॥ गुण वर्णित श्रीरामाचे ॥९६॥
सांडोनि दुराशा लौकिक मान ॥ सांडूनि इंद्रियांचें विषयध्यान ॥ सांडूनियां ज्ञानाभिमान ॥ करी कीर्तन अहर्निशीं ॥९७॥
वाराणसेचे सकळ जन ॥ कबीरासी म्हणती धन्य धन्य ॥ ऐसी प्रतिष्ठा होतांचि जाण ॥ हें दुर्जनांकारण असह्य ॥९८॥
सज्जनाची कीर्ति ऐकोनि कानीं ॥ दुर्जन साशंकित होती मनीं ॥ जेवीं उदया येतां वासरमणी ॥ दिवाभीत मनीं लज्जित ॥९९॥
कीं चंद्रोदय देखोनि दृष्टीं ॥ तस्कर होती परम कष्टी ॥ कीं दात्याची कीर्ति ऐकोनि मोठी ॥ कृपण जळती पोटांत ॥१००॥
कीं पतिव्रतेची कीर्ति ऐकोनी ॥ पोटीं संतापती जैशा जारिणी ॥ कीं वेदांतज्ञान ऐकोनि कानीं ॥ पाखंडी मनांत जळती ॥१॥
तेवीं कबीराची प्रतिष्ठा होतांचि जाण ॥ निंदक पाहूं इच्छिती उणें ॥ मग एकांती मिळोनि अवघे जण ॥ विचार दुर्जन करिताती ॥२॥
म्हणती संतसेवा करितां अद्भुत ॥ थोर वाढला कबीरभक्त ॥ तेणे निजपुत्र वधिला स्वहस्तें ॥ संतीं त्वरित उठविला ॥३॥
त्या दिवसापासून ॥ यास नमिती सकळ जन ॥ आतां कबीरास न कळतां जाण ॥ संट सज्जन आणावे ॥४॥
त्यांच्या नांवें पत्र लिहूनी ॥ वैष्णव आणावे एके दिनीं ॥ असंख्य संत देखोनि नयनीं ॥ कबीर पळून जाईल ॥५॥
एकदांचि येतां अति मेळा ॥ तयास येईल कंटाळा ॥ मग संत शापितील त्याला ॥ शब्द आपणाला लागेना ॥६॥
दैत्यदेवांत लावूनि भांडण ॥ कौतुक पाहे ब्रह्मनंदन ॥ कीं कौरवपांडवांत कळी लावून ॥ शकुनी दुरून विलोकी ॥७॥
तेवीं संत बोलावूनि अपार ॥ अपमानावा भक्त कबीर ॥ ऐसा दुर्जनीं विचार ॥ केला साचार तो कालीं ॥८॥
कबीराच्या नांवें पत्र लिहूनी ॥ हरिद्वारीं पाठविलें त्यांनीं ॥ मथुरा गोकुळ वृंदावनीं ॥ द्वारकापट्टणीं समवेत ॥९॥
एकमासीं एकेच दिवसीं ॥ बोलाविलें वैष्णवांसी ॥ आणिक बैरागी क्षेत्रवासी ॥ मूळें तयांसी पाठविलीं ॥११०॥
एकमेकांसीं विचार करिती ॥ कळों न द्यावें कबीराप्रती ॥ असावध असतां संत येती ॥ मग कोण गती करील तो ॥११॥
एकेच तिथीस जे वेळां ॥ लक्षावधी मिळेल मेळा ॥ मग कोण असे सत्वागळा ॥ अन्न त्यांजला पुरवील ॥१२॥
पदरचें द्रव्य वेंचूनि जाण ॥ बोलाविले वैष्णव जन ॥ अपाय रचिती दुर्जन ॥ कबीराचें उणें पहावया ॥१३॥
दुर्योधनें वेंचून तपासी ॥ दुर्वास पाठविला पांडवांपासीं ॥ तेवीं दुर्बुद्धि धरूनि मानसीं ॥ अगणित संतांसी पाचारिलें ॥१४॥
असो कबीराचें पत्र ऐकोनि कानीं ॥ मस्तकीं वंदिलें संतजनीं ॥ पत्रीं नेम लिहिला जे दिनीं ॥ त्याच तिथीस पातले ॥१५॥
पूर्व पश्चिम दक्षिणेहून ॥ अगणित आले संतजन ॥ कबीरें त्यांसी करूनि नमन ॥ दिधलें आलिंगन निजप्रीतीं ॥१६॥
असंख्य वैष्णवांचा मेळा ॥ नयनीं देखोनि संत तोषला ॥ म्हणे आजिचा सुदिन उगवला ॥ देखिले डोळां वैष्णव ॥१७॥
तंव कुटिल मान तुकाविती ॥ आतां होईल कैसी गती ॥ एकाकडे एक पाहूनि हांसती ॥ टाळिया पिटिती परस्परें ॥१८॥
ऐसें संकट देखोन ॥ अयोध्यावासी जानकीजीवन ॥ म्हणे निजभक्ताचें पडतां उणें ॥ आपणाकारणें न साहे ॥१९॥
कबीर तों निःसंग निराळा ॥ अगणित आला संतमेळा ॥ तरी आपण साह्य होऊनि त्याला ॥ सांभाळ केला पाहिजे ॥१२०॥
क्षेत्रींचे वैष्णव उठाउठीं ॥ उतरले येऊनि गंगातटीं ॥ ऐसें देखोनि जगजेठी ॥ पावला संकटीं कबीरासी ॥२१॥
जितुके आले वैष्णववीर ॥ तितुके आपण जाहला कबीर ॥ अनंतरूपें शारंगधर ॥ धरिता जाहला तेधवां ॥२२॥
कबीराचीं रूपें धरूनि हरी ॥ निजभक्तांची सेवा करी ॥ कौतुक पाहती दुराचारी ॥ अद्भुत परी देखोनी ॥२३॥
एकमेकांचा हात धरूनी ॥ मेळ्यांत पाहती तये क्षणीं ॥ तों अनंत कबीर देखोनि नयनीं ॥ विस्मित मनीं जाहले ॥२४॥
निजभक्तांची करितां सेवा ॥ बहु उल्हास वाटे देवा ॥ अनंत रूपें धरिलीं तेव्हां ॥ अकळ माव तयाची ॥२५॥
कौतुक पाहती नारीनर ॥ जिकडे तिकडे भक्त कबीर ॥ संतसेवेसी होऊनि सादर ॥ समाचार घेतसे ॥२६॥
कोठें करीत चरणक्षालन ॥ कोठें संतांसी घाली स्नान ॥ कोठें देवपूजेसी चंदन ॥ उगाळून देतसे ॥२७॥
कोठें उभा जोडिल्या करीं ॥ कोनाचें चरणसंवाहन करी ॥ कोठे संतांच्या पादुका धरी ॥ लाघवी हरी तेधवां ॥२८॥
कोणापुढें करी गायन ॥ कोणासी घालीतसे भोजन ॥ कोणासी विडे करून ॥ जगज्जीवन देतसे ॥२९॥
कोणासी निजवूनि पलंगावरी ॥ आपण बैसला त्याशेजारीं ॥ कोणासीं प्रत्युत्तर मुरारी ॥ मधुरोत्तरीं बोलत ॥१३०॥
कोणासी भांग घोंटूनी ॥ कुसुंबा पाजी चक्रपाणी ॥ कोणासी गुडगुडी भरूनी ॥ पाणी आणूनि निजप्रीतीं ॥३१॥
कोणासी म्हणे जगदुद्धार ॥ मंदिरा चलावें सत्वर ॥ कोणासी म्हणे वारंवार ॥ कृपा मजवर असों द्या ॥३२॥
कोणासी लावी गोपीचंदन ॥ पुढें दावीतसे दर्पण ॥ कोणासी तुळसीमाळा करून ॥ अंगें श्रीराम घालीतसे ॥३३॥
कोणासी केशर चंदन उटी ॥ चर्चित बैसला जगजेठी ॥ कोणासी कस्तूरी लल्लाटीं ॥ सुरेख भ्रुकुटी रेखीत ॥३४॥
कोणासी वस्त्रें भूषण ॥ अंगीं लेववी जगज्जीवन ॥ कोणासी एकांतीं नेऊन ॥ आत्मज्ञान पुसतसे ॥३५॥
कोणाच्या पादुका घेउनि करीं ॥ भावें धरीत मस्तकावरी ॥ कोणापुढें लाघवी हरी ॥ गायन करी संगीत ॥३६॥
कोणासी घालोनि तृणासन ॥ निद्रा करवी जगज्जीवन ॥ कोणासी तलफ होतां जाण ॥ अफीण आणून देतसे ॥३७॥
कोठें अगणित जेविती पंक्ती ॥ तेथें वाढी जगत्पती ॥ कोणासी पाणी श्रीपती ॥ पाजीत प्रीतीं निजछंदें ॥३८॥
कोठें तुळसीमाळा करूनी ॥ गळां घालीत चक्रपाणी ॥ कोठें पंखा हातीं घेऊनी ॥ शीतळपवनीं रंजवीत ॥३९॥
कोठें निजवूनि संतजन ॥ रगडीत बैसला जगज्जीवन ॥ कोठें पुस्तक वाचितां जाण ॥ करी श्रवण निजप्रीतीं ॥१४०॥
कोणी चालिले स्नानासी ॥ त्यांसवें जात हृषीकेशी ॥ कोणासी म्हणे वैकुंठवासी ॥ कार्य मजसी सांगावें ॥४१॥
कोणासी करवीत उपाहार ॥ जवळ बैसला शारंगधर ॥ कोणासी वारीत चामर ॥ रुक्मिणीवर उभा असे ॥४२॥
जैसा एकचि वासरमणी ॥ सर्वांघटीं अलिप्त बिंबोनी ॥ तैसा व्यापक चक्रपाणी ॥ कबीररूपें नटलासे ॥४३॥
मागें बाळपणीं कृष्णमूर्ती ॥ गौळणीनीं धरिला हातीं ॥ यशोदेसी सांगावया येती ॥ तैं अनंत मूर्ति प्रकटल्या ॥४४॥
कीं कौरवपंक्तीसीं द्रुपदबाळा ॥ वाढितां दुर्जनीं छळिलें तिला ॥ पात्रासी द्रौपदी आपण जाहला ॥ अपमानिलें दुर्योधना ॥४५॥
तेवीं कबीराची देखोनि भक्ती ॥ असंख्यात रूपें धरी श्रीपती ॥ नर नारी कौतुक पाहती ॥ देखोनि करिती आश्चर्य ॥४६॥
वाराणसी क्षेत्रांत ॥ त्रिरात्र राहिल वैष्णवभक्त ॥ तोंपर्यंत वैकुंठनाथ ॥ सेवा करीत निजप्रीतीं ॥४७॥
वस्त्रें भूषणें सकळांसी ॥ निजांगें देत हृषीकेशी ॥ जया चित्ती वासना जैसी ॥ तैसी तयासी होतसे ॥४८॥
मग बोळवूनि वैष्णवजन ॥ अदृश्य जाहले सीतारमण ॥ कबीरापासीं सकळ दुर्जन ॥ येऊन चरणा लागले ॥४९॥
म्हणती तूं वैष्णव भक्त ॥ आम्ही छळणा केली बहुत ॥ परी साह्य होऊनि श्रीरघुनाथ ॥ अद्भुत कीर्ति वाधविली ॥१५०॥
दीपकाचें तेज गहन ॥ पतंग विझवितां न विझे जाण ॥ कीं खद्योताचे द्वेषेंकरून ॥ सूर्यनारायण झांकेना ॥५१॥
कीं लाक्षाजोहरीं पांडवांप्रती ॥ कौरवीं जाळिल्या न जळती ॥ वडवानळें जाळिलें समुद्राप्रती ॥ परी तो कदापि जळेना ॥५२॥
ऐसें म्हणूनियां त्वरित ॥ मागुती घातले दंडवत ॥ विकल्प द्वेष टाकूनि निश्चित ॥ सप्रेम गात गुणनामें ॥५३॥
पुढील अध्यायीं रुक्मिणीवर ॥ जो भक्तभूषण कृपासागर ॥ तो ज्ञानेश्वरूपें अवतार ॥ घेईल साचार मृत्युलोकीं ॥५४॥
तेचि कथा नवरसउत्पत्ती ॥ वाढीन आर्तांचिये ताटीं ॥ सभाग्य प्रेमळ जे क्षुधार्थी ॥ तेचि सेविती निजप्रेमें ॥५५॥
विकल्प मक्षिका उडवूनि दूरी ॥ कथारस सेचिजे भक्तचतुरीं ॥ महीपती तुमचा आचारी ॥ प्रार्थना करी निजप्रेमें ॥५६॥
स्वति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ सप्तमाध्याय रसाळ हा ॥१५७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ श्रीरस्तु ॥७॥
॥ श्रीभक्तविजय सप्तमाध्याय समाप्त ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय ६