Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय ९

श्री भक्तविजय अध्याय ९
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीरमणाय नमः ॥    ॥
धन्य काल सुदिन आजिचा ॥ जे भक्तचरित्र वर्णिती वाचा ॥ श्रवणीं ऐके तो दैवाचा ॥ प्रेमभक्तीचा अधिकारी ॥१॥
ऐका संतकथेचीं अक्षरें ॥ हृदयीं रिघतां कर्णद्वारें ॥ शांति क्षमा अंगीं संचरे ॥ वैराग्यभरें करूनी ॥२॥
कानीं ऐकतांचि हे गोष्टी ॥ भूतदया उपजे पोटीं ॥ विकल्प पळे उठाउठीं ॥ ज्ञानदृष्टीकरूनी ॥३॥
ग्रंथसंग्रह करितां घरीं ॥ त्यांचीं विघ्नें पळती दूरी ॥ सुदर्शन घेऊन श्रीहरी ॥ नानापरी रक्षीतसे ॥४॥
जे भक्तकथा अखंड गात ॥ तयासी भेटेल रुक्मिणीकांत ॥ श्रोतयांचे मनोरथ ॥ पूर्ण होतील तत्काळ ॥५॥
मागील अध्यायीं निरूपण ॥ श्रोतीं ऐकिलें सावधान ॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥ मुक्ता माया अवतरली ॥६॥
परी निंदा करिती सकळ लोक ॥ म्हणती यांचें न पहावें मुख ॥ अवकुळीं जन्मले बाळक ॥ लागला कलंक ब्रह्मकर्मा ॥७॥
दिवसेंदिवस जाहले थोर ॥ दिसों लागले उपवर ॥ मायाबापांसी विचार ॥ पडला साचार तेधवां ॥८॥
कांता म्हणे भ्रतारासी ॥ चिंता वाटे निजमानसीं ॥ व्रतबंधदीक्षा पुत्रांसी ॥ द्यावी विप्रांसी पुसोनी ॥९॥
मग ब्रह्मसभा करूनी एके दिनीं ॥ चैतन्य विनवी कर जोडूनी ॥ स्वामी अपराध क्षमा करूनी ॥ परिसा विनवणी दीनाची ॥१०॥
धर्मशास्त्री विचारूनि नीत ॥ आम्हांस द्यावें प्रायश्चित्त ॥ म्हणोनि साष्टांग दंडवत ॥ विप्रांसी घाली तेधवां ॥११॥
तंव ज्येष्ठ पुत्र निवृत्ति म्हणत ॥ तुमचें दर्शनें आम्ही मुक्त ॥ साही जणांसी प्रायश्चित्त ॥ सांगा त्वरित ये समयीं ॥१२॥
शास्त्रज्ञ पंडित श्रेष्ठ ब्राह्मण ॥ ग्रंथीं पाहती विचारून ॥ देहांत प्रायश्चित्त असे जाण ॥ उपाय आन दिसेना ॥१३॥
मग म्हणती धरामर ॥ करवतीं घालावें शरीर ॥ अथवा गोरांजन अघोर ॥ घ्यावें साचार अनुतापें ॥१४॥
यावांचूनि प्रायश्चित्त आन ॥ बोलिलें नाहीं तुजकारण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ अनुताप मनीं धरियेला ॥१५॥
नमस्कार करून विप्रांसी ॥ तेथूनि निघाला वेगेंसीं ॥ दारा पुत्र कन्या गृहासी ॥ टाकोनियां चालिला ॥१६॥
मागें न पाहें परतोनी ॥ विप्र आश्चर्य करिती मनीं ॥ म्हणती अनुतापतीर्थीं न्हावोनी ॥ दुरितें जाळूनि टाकिलीं ॥१७॥
अनुतापाहूनि प्रायश्चित्त ॥ शास्त्रीं बोलिलें नाहीं निश्चित ॥ सद्गुरुकृपेनें त्वरित ॥ शुचिर्भूत जाहला कीं ॥१८॥
मग विप्रांसी म्हणे निवृत्ती ॥ आमुची सांगा कवण गती ॥ कोणता दंड शास्त्ररीतीं ॥ आम्हांप्रती बोलिला ॥१९॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ विप्र म्हणती त्याकारण ॥ आतां प्रतिष्ठानीं जाऊन ॥ शुद्धिपत्र आणावें ॥२०॥
निवृत्ति म्हणे ब्राह्मणांसी ॥ काय जाऊनि सांगू त्यांसी ॥ वर्ण याती कुळ आम्हांसी ॥ बोलावयासी ठाव नाहीं ॥२१॥
वैश्य क्षत्रिय ना ब्राह्मण ॥ अविनाश जुनाट पुरातन ॥ निजबोध निघोट स्वरूप जाण ॥ असे आमुचें सर्वदा ॥२२॥
न हों आप तेज ना गगन ॥ मही मारुत महत्तत्त्व जाण ॥ विराटस्वरूप नामाभिधान ॥ आम्हांकारणें न म्हणवे ॥२३॥
न हों देव गण यक्ष किन्नर ॥ न हों ऋषि ना निशाचर ॥ न हों सगुण निर्विकार ॥ निराकारही न म्हणवे ॥२४॥
निवृत्ति म्हणे ज्ञानेश्वरा ॥ आमुची ऐसीच परंपरा ॥ पैठणी जाऊनि द्विजवरां ॥ काय आम्हीं सांगावें ॥२५॥
मग ज्ञानदेवें दिधलें उत्तर ॥ विधिविरुउद्ध जो चाले नर ॥ तयासी दूषण साचार ॥ शास्त्रीं विचार बोलिला ॥२६॥
जरी जीवन्मुक्त जाहले ज्ञानी ॥ तरी विहित धर्म न सांडावा त्यांनीं ॥ आणिकांसी दाखवावा आचरूनी ॥ साधुजनीं निजांगें ॥२७॥
अविधी जें का आचरण ॥ तें जाणिजे परम दूषण ॥ ज्याचा स्वधर्म करावा त्यानें ॥ वेदनारायण बोलिला ॥२८॥
ज्ञानदेव म्हणे जी निवृत्ती ॥ ऐसी धर्मशास्त्रीं पद्धती ॥ म्हणोनि सलगी तुम्हांप्रती ॥ प्रत्युत्तर दीधलें ॥२९॥
यापरी सोपान बोले वचन ॥ याती कुल काय प्रमाण ॥ भक्तीविण श्रीहरिचरण ॥ प्राप्त न होती सर्वथा ॥३०॥
दुर्वास वसिष्ठमुनि गौतम ॥ व्यास वाल्मीकि अगस्ति परम ॥ पांडवांचें कुळ उत्तम ॥ कवणें शास्त्रीं म्हणितलें ॥३१॥
उत्तम कुळीं जरी जन्मला ॥ श्रुतिअभ्यास उदंड केला ॥ परी भक्तीविण वायां गेला ॥ शास्त्रीं वंदिला नाहीं तो ॥३२॥
जरी भक्ति अनुसरे भगवंतीं ॥ उत्तम पाहिजे कासया याती ॥ ऐसें ज्ञानदेवाप्रती ॥ सोपानदेव बोलिला ॥३३॥
यापरी संवाद परस्पर ॥ करूनि दिधलें प्रत्युत्तर ॥ ब्राह्मणांसी करूनि नमस्कार ॥ तेथूनि सत्वर निघाले ॥३४॥
जाऊनियां गोदातीरीं ॥ तीर्थयात्रा संपादिली सारी ॥ मग प्रवेशोनि ब्रह्मपुरीं ॥ नमस्कारिलें द्विजवरा ॥३५॥
ब्राह्मणसभा करूनि श्रेष्ठ ॥ होतें तैसें सांगितलें स्पष्ट ॥ ऐकोनि ब्राह्मण म्हणती वरिष्ठ ॥ हे तों भ्रष्ट कळलें कीं ॥३६॥
पत्र वाचितांचि त्वरित ॥ सकळां वृत्त जाहलें श्रुत ॥ म्हणती हे संन्याशाचे सुत ॥ यांसी प्रायश्चित्त चालेना ॥३७॥
शूद्रासी घालितां गंगास्नान ॥ तो काय होईल शुद्ध ब्राह्मण ॥ खापरासी परीस लागतां सुवर्ण ॥ नव्हेचि जाण सर्वथा ॥३८॥
भाजल्या बीजा घालितां जीवन ॥ अंकुरदशेसी न ये जाण ॥ आयुष्यहीनासे औषध देऊन ॥ व्यर्थ कासया पाहावें ॥३९॥
तेवीं तीर्थव्रतें प्रायश्चित्तमेळीं ॥ हे शुद्ध नव्हती कदाकाळीं ॥ ऐसी सकळ विप्रमंडळी ॥ बोलती जाहली तेधवां ॥४०॥
परी एकचि उपाय यांतें ॥ बोलिला असें शास्त्रमतें ॥ तो करितील तरी यांतें ॥ प्रायश्चित्त कासया ॥४१॥
श्रीहरीसी जाऊनि शरण ॥ सर्वांभूतीं करावें भजन ॥ गो खर गजादि श्वान ॥ समसमान वंदावे ॥४२॥
सूकर आणि अंत्यज याती ॥ एक्याचि भावें नमिजेती ॥ ब्रह्मभावना धरूनि चित्तीं ॥ नमन प्रीतीं करावें ॥४३॥
ऐसी ऐकूनियां वाणी ॥ निवृत्ति संतोषले मनीं ॥ ज्ञानदेवसोपानांलागुनी ॥ परमानंद वाटला ॥४४॥
म्हणती जैसें होतें आमुचें चित्तीं ॥ तैसीचि निघाली धर्मनीती ॥ मुक्ताबाईसी वचनोक्ती ॥ मानली प्रीतीं निजमनें ॥४५॥
ऐसीं ऐकूनि नामाभिधानें ॥ आश्चर्य मानिलें सर्व ब्राह्मणें ॥ म्हणती ज्ञानदेव तुम्हांकारणें ॥ किमर्थ आम्हीं वदावें ॥४६॥
श्रुतीचा अभ्यास केला प्रीतीं ॥ किंवा जाहली पुराणव्युत्पत्ती ॥ म्हणूनि ज्ञानदेव तुम्हांप्रती ॥ कैशा रीतीं म्हणावें ॥४७॥
अंगीं करणी नसतां पाहें ॥ उगेंचि थोर म्हणूनि काय ॥ स्तनीं दुग्ध पीता गाय ॥ सिंगाळ काय करावी ॥४८॥
दृष्टीविणें नयन थोर ॥ कीं मान्यतेविण धरिला भार ॥ अंगीं पुरुषार्थ नसतां नर ॥ व्यर्थ कासया वाढला ॥४९॥
भूतदयेविण ब्रह्मज्ञान ॥ कीं प्रेमाविण गायन ॥ कीं लवणावांचूनि रांधिलें अन्न ॥ रुचि न देच सर्वथा ॥५०॥
शौर्य धैर्य नसतां अंगीं ॥ कासया जावें रणरंगीं ॥ निष्काम झाला नसतां जगीं ॥ विरक्त कासया म्हणावें ॥५१॥
परस्परें बोलती वचन ॥ नांवापासी काय कारण ॥ तंव एक म्हणे पखाल घेऊन ॥ महिषीपुत्र येतसे ॥५२॥
त्याचेंही नाम ठेविलें ज्ञाना ॥ ऐसें ऐकूनियां विप्रवचन ॥ ज्ञानदेव म्हणे कर जोडून ॥ माझें वचन अवधारा ॥५३॥
रेडिया आणि आम्हांत कांहीं ॥ भेद पाहातां किंचित नाहीं ॥ आत्मा व्यापक सर्वांदेहीं ॥ भूतमात्रीं सारिखा ॥५४॥
अनंत घट भरिले जीवनीं ॥ तितुक्यांत बिंबला वासरमणी ॥ तैसा व्यापक चक्रपाणी ॥ भूतमात्रीं सारिखा ॥५५॥
अठरा भार वनस्पती देख ॥ एकचि जळ मुळीं व्यापक ॥ तैसाचि तो रमानायक ॥ भूतमात्रीं सारिखा ॥५६॥
कीं एकचि सुवर्ण साचार ॥ परी भिन्न दिसती अलंकार ॥ तैसा व्यापक श्रीधर ॥ भूतमात्रीं सारिखा ॥५७॥
कीं एकाचि तंतूची विणणी ॥ वस्त्रें दिसती भिन्नपणीं ॥ तैसाचि व्यापक चक्रपाणी ॥ भूतमात्रीं सारिखा ॥५८॥
ऐकूनि बोलती ब्राह्मण ॥ वायां करिसी वाचाळपण ॥ महिषासी आसुड घेऊन ॥ क्रोधेंकरून मारिती ॥५९॥
तंव थरथरां कांपें ज्ञानेश्वर ॥ वळ उमटले पाठीवर ॥ ऐसें देखोनि द्विजवर ॥ काय उत्तर बोलती ॥६०॥
रेडिया तुम्हां नाहीं भेद ॥ तरी याचें मुखीं बोलवा वेद ॥ ऐकूनि द्विजवरांचा शब्द ॥ भक्त अभेद काय करी ॥६१॥
महिषापासीं येऊन सत्वर ॥ त्याचें मस्तकीं ठेविला कर ॥ म्हणे ऋग्वेद बोलोनि सत्वर ॥ धरामर तोषवावे ॥६२॥
ऐसें बोलतां त्वरित ॥ नवल वर्तलें अति अद्भुत ॥ न्यासपूर्वक श्रुति बोलत ॥ महिर्ष पुत्र तेधवां ॥६३॥
चारी वेद बोलोनि मुखीं सकळ ब्राह्मण केले सुखी ॥ ऐसें कौतुक मृत्युलोकीं ॥ नाहीं कोणीं देखिलें ॥६४॥
अमृत जातां रोगियापोटीं ॥ व्याधी पळे उठाउठीं ॥ कीं कामधेनूचे कृपादृष्टीं ॥ दारिद्र्य कष्टी करीना ॥६५॥
अंधासी सूर्य प्रसन्न जाहला ॥ तरी काय एक न दिसे त्याला ॥ कीं सरस्वतीनें मुकेयाला ॥ वर दिधला कपेनें ॥६६॥
कीं प्रसन्न होतां गणपती ॥ चौदा विद्या करतलामल होतीं ॥ कीं मृडानीवराचे संगती ॥ योग साधती अष्टांग ॥६७॥
तेवीं ज्ञानदेवाचे वरदहातीं ॥ रेडा निजमुखें वदला श्रुती ॥ सकळ ब्राह्मण आश्चर्य करिती ॥ अनुताप चित्तीं धरूनी ॥६८॥
आम्ही पढलों वेदांत ॥ उपनिषदादि भाग समस्त ॥ परी अंगीं ऐसें सामर्थ्य बहुत ॥ ईश्वरानें नाहीं दिधलें ॥६९॥
देखिलें ऐकिलें नव्हतें कोणीं ॥ तें साक्षात आजि दाविलें नयनीं ॥ सृष्टींत अघटित वर्तली करणी ॥ जेवीं विरिंचीपासूनि घडेना ॥७०॥
हे तिनी देवांचे अवतार पाहीं ॥ आदिमाया ते मुक्ताबाई ॥ यांसी प्रायश्चित्त न चले कांहीं ॥ जेवीं गंगेस नाहीं विटाळ ॥७१॥
आम्ही आणिकांसी सांगूं बहुत ॥ परी आपण नाचरों यथार्थ ॥ धन मान इच्छितां जनांत ॥ जन्म व्यर्थचि दवडिला ॥७२॥
यांसारिखे ब्राह्मण थोर ॥ सृष्टींत न देखों साचार ॥ ऐसें समस्त द्विजवर ॥ म्हणते जाहले तेधवां ॥७३॥
धन्य यांचीं माता पिता ॥ सुकृतें आचरलीं उभयतां ॥ यापरी नवल करूनि चित्ता ॥ विप्र निवांत राहिले ॥७४॥
यावरी ज्ञानदेव बोलत ॥ स्वामी हें तुमचेंचि सामर्थ्य ॥ आम्ही तों अज्ञान यथार्थ ॥ चरणप्रताप तूमचा ॥७५॥
पैठणींचे जन समस्त ॥ सप्रेमभावें वेधले बहुत ॥ म्हणती धन्य वैष्णव भक्त ॥ संसारीं विरक्त सर्वदा ॥७६॥
नित्य करूनि गंगास्नान ॥ वेदांतव्याख्या पुराणश्रवण ॥ रात्रीं होत हरिकीर्तन ॥ करिती श्रवण सकळिक ॥७७॥
चमत्कार देखोनि अद्भुत ॥ मान्य करिती जन समस्त ॥ ऐसें होतां दिवस बहुत ॥ नवल अद्भुत वर्तलें ॥७८॥
निवृत्ति ज्ञानदेव मुक्ताबाई ॥ राहिलीं होतीं जया ठायीं ॥ तेणें पितृश्राद्ध लवलाहीं ॥ एके दिवशीं आरंभिलें ॥७९॥
द्विजांसी देतां आमंत्रण ॥ विप्र म्हणती त्याकारण ॥ यतीश्वराचीं मुलें जाण ॥ तुवां ठेविलीं निजगृहीं ॥८०॥
याकरितां तुझिया घरासी ॥ आम्ही न येऊं भोजनासी ॥ वचनें ऐकूनियां ऐसीं ॥ निजमानसीं चिंतावला ॥८१॥
घरासी येऊनि त्वरेनें ॥ उगाचे बैसला उद्विग्नमनें ॥ मग ज्ञानदेव त्याजकारणें ॥ वर्तमान पूसत ॥८२॥
म्हणे आजि कां चिंताक्रांत ॥ उगेचि बैसलां निवांत ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ विप्र बोलत तेधवां ॥८३॥
म्हणे आजि वडिलांची पुण्यतिथ ॥ विप्र भोजनासी नाहीं येत ॥ म्हणूनि उद्विग्न जाहलें चित्त ॥ उगाचि निवांत बैसलों ॥८४॥
ज्ञानदेव म्हणे विप्रासी ॥ चिंता न करावी निजमानसी ॥ साक्षात पितर भोजनासी ॥ येथे येतील तत्काळ ॥८५॥
तुम्ही स्वस्थ करूनि चित्त ॥ मंदिरीं करा पाक निश्चित ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ आश्चर्य वाटलें तयासी ॥८६॥
मग स्नानसंध्या सारून ॥ शुचिष्मंत जाहला जाण ॥ नानापरींचीं पक्वान्नें करून ॥ पात्रें वाढून सिद्ध केलीं ॥८७॥
ज्ञानदेवें टाकूनि अक्षत ॥ पितर आणिले साक्षात ॥ पादपूजा करूनि त्वरित ॥ मुख्यासनीं बैसविले ॥८८॥
वस्त्रें भूषणें अलंकार ॥ तुलसीपत्रें सुमनहार ॥ द्वादश टिळे यज्ञोपवीत सुंदर ॥ हिरण्यदक्षिणा दीधली ॥८९॥
ऐशा उपचारें करूनि पूजा ॥ धूप दीप अर्पिला ओजा ॥ देखोनि नवल वाटलें द्विजां ॥ आश्चर्य करिती मनांत ॥९०॥
पितृस्वरूपी जनार्दन ॥ ऐसा संकल्प सोडितां जाण ॥ साक्षात पितर जेविती अन्न ॥ प्रीतीकरून तेधवां ॥९१॥
रुचीस पडे तें सेविती ॥ तृप्त जाहली सकळ पंक्ती ॥ करशुद्धी देऊनि तयांप्रती ॥ तांबूल दक्षिणा समर्पिली ॥९२॥
स्वस्थानेवास म्हणतां जाण ॥ अदृश्य झाले पितृगण॥ पैठणींचें सकळ ब्राह्मण ॥ परस्परें बोलती ॥९३॥
म्हणती ज्ञानदेवें नवल केलें ॥ साक्षात पितर जेवविले ॥ मृत्युलोकीं हें कौतुक भलें ॥ देखिलें ऐकिलें नाहीं कीं ॥९४॥
कर्मठपणाचा अभिमान ॥ धरूनि टाकिलें आमंत्रण ॥ तों अंगेंचि येऊनि पितृगण ॥ दक्षिणा घेऊन गेले कीं ॥९५॥
जैसा नीलग्रीवें नैवेद्य खादला ॥ उगाचिगुरव निवांत राहिला ॥ तैसें आजि आपणांला ॥ झालें ऐसें वाटतें ॥९६॥
कीं सूर्यप्रतिमा अंगेंचि येऊनी ॥ वासरमणि गेला घेऊनि ॥ ज्योतिषी आशावंत मनीं ॥ लाळ घोंटीत राहिला ॥९७॥
कीं यज्ञाजवळील दानबळ ॥ घेऊनि गेला क्षेत्रपाळ ॥ भांडारी करी तळमळ ॥ न चले बळ तयाचें ॥९८॥
कीं अंगेंचि येऊन इंद्रादिगण ॥ गेले होमद्रव्य घेऊन ॥ उगाच राहिला कृशान ॥ तैसेंचि झालें आपणांसी ॥९९॥
साक्षात पिशाच येऊन ॥ घेऊनि गेलें जैसें सांडण ॥ पंचाक्षरीं अलाभ मानून ॥ क्षुधातुरचि राहिला ॥१००॥
तेवीं हिरण्यदक्षिणा पक्वान्न ॥ घेऊनि गेले पितृगण ॥ आपण धरिला अभिमान ॥ नाडलों तेणें सर्वस्वें ॥१॥
धन्य हा निवृत्ति ज्ञानेश्वर ॥ धन्य सोपान वैष्णव थो ॥ आदिमायेचा अवतार ॥ मुक्ताबाई साक्षात ॥२॥
हे देवत्रय मूर्तिमंत ॥ यांसी न चले प्रायश्चित्त ॥ कीं जगद्गुरु देहातीत ॥ जीवन्मुक्त असती हे ॥३॥
पत्र लिहून ऐशा रीतीं ॥ दिधलें सोपानाचे हातीं ॥ महिषीपुत्र वदला श्रुति ॥ तैसी रीती हे असे ॥४॥
लोहदंडासी परिस लागतां जाण ॥ तो अक्षयी झाला कनकवर्ण ॥ तैसाच रेडा वेदांतज्ञान ॥ अहोरात्र वदतसे ॥५॥
ध्रुवा दिधलें अढळपद हरीन ॥ कदा न चळे त्याचें आसन ॥ तेवीं महिषीपुत्रास अक्षय ज्ञान ॥ ज्ञानदेवें दिधलें ॥६॥
क्षीरसागरीं बैसविला उपमन्य ॥ तो अखंड करी पयःपान ॥ तेवीं महिषीपुत्रामुखेंकरून ॥ अखंड निगम वदवीतसे ॥७॥
कीं योगी बैसले वज्रासनीं ॥ ते सेवीत अखंड उन्मनी ॥ तेवीं महिषीपुत्र प्रेमेंकरूनी ॥ वेदांतज्ञानीं निमग्न ॥८॥
ऐसें जाणोनि ज्ञानेश्वर ॥ निवृत्तीसी करिती विचार ॥ महिषाचें ज्ञान अनिवार ॥ कर्ममार्ग बुडवील हा ॥९॥
श्रुतीचे गर्भ गुप्त असती ॥ ते स्पष्ट सांगेल लोकांप्रती ॥ उडवील कर्मठांची भ्रांती ॥ मग राहती यज्ञमार्ग ॥११०॥
ऐसें सांगूनि निवृत्तीसी ॥ नमस्कार केला ब्राह्मणांसी ॥ रेडा मागूनि तयांपासी ॥ पुसोनि विप्रांसी निघाले ॥११॥
गांवाबाहेर निघतां जाण ॥ बोळवीत चालिले ब्राह्मण ॥ अश्रुपातें भरले नयन ॥ देती क्षेम प्रीतीनें ॥१२॥
सद्गद होऊनियां चित्तीं ॥ एकमेकांतें उत्तर बोलती ॥ म्हणती ज्ञानेश्वराचे संगतीं ॥ उत्तर काळ क्रमियेला ॥१३॥
एक अर्धकोशपर्यंत ॥ नरनारी आल्या बोळवित ॥ तयांसी ज्ञानेश्वर विनवित ॥ परतोनि जावें मंदिरा ॥१४॥
मागुती करून नमस्कार ॥ मग परतले नारीनर ॥ निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर ॥ आणि बहिण मुक्ताबाई ॥१५॥
मार्गीं चालती स्वानंदभरित ॥ सप्रेम हरेचे गुण वर्णित ॥ नानापरी चातुर्य कवित ॥ नवरसउत्पत्ति करिताती ॥१६॥
महालयक्षेत्रीं येऊनी ॥ वास्तव केलें तये स्थानीं ॥ प्रवरातीर्थीं स्नान करूनी ॥ मोहनीराजासी भेटले ॥१७॥
तेथें गीतेवर प्राकृत टीका ॥ ज्ञानेश्वरी केली देखा ॥ जड मूढ अज्ञानां सकळिकां ॥ मार्ग सोपा दाविला ॥१८॥
आधींच कनक सोज्ज्वळ जाण ॥ त्यावरी केलें रत्नकोंदण ॥ कीं धान्याचें रांधिलें पक्वान्न ॥ रसने रुचि कळावया ॥१९॥
कीं सुवर्णाचें अलंकार केले ॥ ते सुंदराअंगीं जैसे शोभले ॥ कीं सूक्ष्म बीज विस्तारलें ॥ फळीं फुलीं शोभत ॥१२०॥
कीं कल्पतरूची महिमा होती गुप्त ॥ ती कल्पनेनें केली सुशोभित ॥ कीं पूर्ण कळेनें अमृत वर्षत ॥ चकोराप्रती चंद्रमा ॥२१॥
तेवीं गीतेचा अर्थ सखोल गहन ॥ त्यावरी केलें प्राकृत लेखन ॥ सज्ञान प्रेमळ भाविक जन ॥ तयांसी ज्ञानी व्हावया ॥२२॥
तंव सद्गुरुनाथ निवृत्ती ॥ ज्ञानदेवासी म्हणती निजप्रीतीं ॥ आपुले स्वबुद्धीचिये मतीं ॥ अमृतानुभव करावा ॥२३॥
अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ मस्तक ठेविला सद्गुरुचरणीं ॥ मग स्वात्मबुद्धी विचारूनी ॥ अमृतानुभव ग्रंथ केला ॥२४॥
विरिंचीचा अभिमान व्हावया गलित ॥ गोवत्सें निर्मी कृष्णानाथ ॥ तेवीं अहंबुद्धि पाखांडी जल्पत ॥ अनुभवामृत त्यांसाठीं ॥२५॥
मग आदिशक्ती म्हाळसेप्रती ॥ नमस्कारूनि निजप्रीती ॥ स्वदेशा जावया निश्चितीं ॥ तेथूनि सत्वर निघाले ॥२६॥
मार्गीं चालतां चौघें जण ॥ सप्रेम करिती नामस्मरण ॥ रात्रीं नगरांत उतरून ॥ हरिकीर्तन करिताती ॥२७॥
मायाममता मानापमान ॥ सांडोनि देहाचा अभिमान ॥ ब्रह्मादि पिपीलिकादि करून ॥ लेखिती समान समदृष्टी ॥२८॥
मार्गीं चालतां एके दिनीं ॥ उतरले आळंदीचिये वनीं ॥ वेद वदला तो तये स्थानीं ॥ पशु शांत जाहला ॥२९॥
तयासी बैसवूनि समाधी ॥ पावविला सायुज्यपदीं ॥ संत दयाळु कृपानिधी ॥ अभयवरदी सर्वदा ॥१३०॥
मग समाधीचें करूनि पूजन ॥ त्यावरी केलें सिंदूरलेपन ॥ म्हसोबा ऐसें नाभाभिधान ॥ अद्यापि स्थान आहें तें ॥३१॥
अलकापुरीसी जावयासी ॥ तेथोनि निघाले वेगेंसीं ॥ मुक्ताबाई म्हणे निवृत्तीसी ॥ जन्मभूमीसी पाहावें ॥३२॥
आळंदीसी येतां जाणा ॥ आनंद वाटला सकळ जनां ॥ प्रेमभावें वंदिती चरणां ॥ क्षेमालिंगन देताती ॥३३॥
प्रतिष्ठानीं झाला वृत्तांत ॥ तो आधींचि लोकांसी होता श्रुत ॥ सोपानदेवें दाखविलें पत्र ॥ ऐकूनि विस्मित सकळिक ॥३४॥
पत्रीं लिहिलें साचार ॥ हे तिघे देवांचे अवतार ॥ ऐसें ऐकूनि द्विजवर ॥ तटस्थ झाले मानसीं ॥३५॥
पैठणींचें पत्र ऐकोन ॥ मान्य करिती सकळ ब्राह्मण ॥ जेवीं बृहस्पतीचे आज्ञेकरून ॥ इंद्रादिदेव वर्तती ॥३६॥
कीं श्रीव्यासमुखींचें पुराण ॥ प्रमाण मानिती पंडितजन ॥ कीं सच्छिष्य गुरुआज्ञेकरून ॥ अध्यात्मज्ञान अभ्यासी ॥३७॥
कीं समीर जैसा धांवे जिकडे ॥ मेघही तैसा पडे तिकडे ॥ कीं मनासी लागली ज्याची चाडे ॥ इंद्रियें तैसींच राहाटती ॥३८॥
कीं वासरमणि जिकडे जाय ॥ आदित्यवृक्ष तैसाचि होय ॥ कीं ओघाऐसें जीवन पाहे ॥ धांवत जाय जपळत्वें ॥३९॥
समीर जाय ज्या दिशेप्रती ॥ पताका तिकडेचि फडकती ॥ गायनाऐसींचि वाद्यें वाजती ॥ अवसानगती टाकून ॥१४०॥
तेवीं प्रतिष्ठानकरांचे अनुमतें ॥ ब्राह्मण वंदिती तयातें ॥ तीन्ही देव अवतरले सत्य ॥ ऐसें बोलत परस्परें ॥४१॥
सप्रेम करितां हरिकीर्तन ॥ श्रवण करिती सकळ जन ॥ म्हणती हे आम्हांकारण ॥ अवतरले सद्गुरु ॥४२॥
तंव एक विसोबा चाटी म्हणून ॥ बहु कुटिल होता ब्राह्मण ॥ तो या चौघांजणांकारण ॥ रात्रंदिवस निंदीतसे ॥४३॥
म्हणे हे संन्याशाचे पुत्र ॥ त्यांचें न पाहावें वक्त्र ॥ ऐसें म्हणोनि अहोरात्र ॥ निजमानसीं जल्पतसे ॥४४॥
पतंग जेवीं स्वभावरीतीं ॥ विझवूं पाहे दीपकाप्रती ॥ कीं खद्योत म्हणे हा  गभस्ती ॥ नाहीं ऐसाचि करीन ॥४५॥
कीं प्रल्हादासी देखतां नयनीं ॥ हिरण्यकशिपू जल्पे मनीं ॥ कीं धर्माची कीर्ति ऐकूनि कानीं ॥ दुर्योधन मनीं संतापे ॥४६॥
कीं रामप्रतापाची ऐकतां मात ॥ दशकंठ जेवीं संतपात ॥ कीं ग्रंथ देखतां प्राकृत ॥ द्वेषें पंडित निषेधिती ॥४७॥
कीं संपूर्ण देखतां निशापती ॥ तस्कर त्याची हेळणा करिती ॥ कीं सहदेवमतासी हेळसिती ॥ द्वेषेंकरून ज्योतिषी ॥४८॥
त्याचपरी विसोबा चाटी ॥ अखंड पाहे क्रोधदृष्टीं ॥ कुठें पडतां दृष्टादृष्टीं ॥ होतसे कष्टीं हे देखोनी ॥४९॥
म्हणे हे संन्याशाचे बाळक ॥ त्यांचें कदा न पाहावें मुख ॥ दृष्टादृष्टी होतां देख ॥ आपणाऐसें करितील ॥१५०॥
तंव कोणे एके काळीं ॥ सण आला दसरा दिवाळी ॥ निवृत्तिदेव ते वेळीं ॥ मुक्ताबाईस बोलिला ॥५१॥
म्हणे उत्तम मांडे करूनी ॥ भोजन घालीं आम्हांलागुनी ॥ अवश्य म्हणोनि ते क्षणीं ॥ शिधा साहित्य आणिलें ॥५२॥
मांडेरांधणें आणावयासी ॥ जातसे कुलालशाळेसी ॥ मार्गीं जातां दृष्टीसी ॥ विसोबा अवचित देखिला ॥५३॥
भेणेंभेणें ते समयीं ॥ आड लपली मुक्ताबाई ॥ येरू धांवूनि लवलाहीं ॥ तिजकारणें बोलत ॥५४॥
म्हणे कवण्या कार्यासी धांवत ॥ जातीस हें मज सांग त्वरित ॥ मुक्ताबाई ऐकूनि मात ॥ चळचळां कांपत तेधवां ॥५५॥
जैसा वारण देखतां दृष्टीं ॥ कमळिणीस भय उपजे पोटीं ॥ कीं गौतमी देखतां दृष्टीं ॥ कोकिळा कांपे थरथरा ॥५६॥
कीं हरिणी वनांत धुंडितां जीवन ॥ दृष्टीस व्याध देखिला दुरून ॥ कीं गौतमी देखतां पंचानन ॥ भयें कांपत चळचळां ॥५७॥
तेवीं भय पावूनि अपार ॥ तयासी देत प्रत्युत्तर ॥ कुलालशाळेसी सत्वर ॥ जातें खापर आणावया ॥५८॥
मांडे करावया त्वरित ॥ आज्ञा केली निवृत्तिनाथें ॥ ऐसी ऐकूनियां मात ॥ विसोबा हांसत तेधवां ॥५९॥
मुक्ताबाईस करूनि ताडन ॥ कुलालासी सांगे जाऊन ॥ खापर देशेल इजलागून ॥ तरी शिक्षा करीन तुज आतां ॥१६०॥
माझें द्रव्य आहे तुम्हांवर ॥ तें आतांच मागेन सत्वर ॥ वचन ऐकून चिंतातुर ॥ कुलाल जाहला ते समयीं ॥६१॥
कोठें प्रप्तांश नसतां जाण ॥ संसारीं लोकांचें द्रव्य देणें ॥ शरीरीं रोग जाहला दारुण ॥ तरी ईश्वरक्षोभ जाणावा ॥६२॥
गृहस्थाश्रमीं दरिद्र देख ॥ कीं वृद्धपणीं होय पुत्रशोक ॥ पूज्यस्थानीं निंदिती लोक ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥६३॥
अभ्यास केला जन्मभर ॥ समयीं नाठवे प्रत्युत्तर ॥ विकल्प चित्तीं उठती फार ॥ तरी ईश्वरक्षोभ जाणावा ॥६४॥
वैरियां सांपडे आपुलें वर्म ॥ त्याच सारिखे बोलती सकळ जन ॥ चित्तीं संताप वाढतां जाण ॥ तरी ईश्वरक्षोम जाणावा ॥६५॥
अन्नावांचूनि कुटुंबवत्सल ॥ प्रवासीं करी तळमळ ॥ घरीं कांता करी हळहळ ॥ तरी देवक्षोम जाणावा ॥६६॥
वृद्धपणीं गात्रें विकळ ॥ पुत्र न घेती समाचार सकळ ॥ कांता करीतसे तळमळ ॥ तरी ईश्वर क्षोभ जाणावा ॥६७॥
असो बहुत काय व्युत्पत्ती ॥ ज्यांचें कर्म तेचि भोगिती ॥ विसोबाची ऐकूनि वचनोक्ती ॥ कुलाल उगाचि राहिला ॥६८॥
तों मुक्ताबाई येऊनि तेथ ॥ कुलालासी वचन बोलत ॥ मांडे करावया त्वरित ॥ खापर देईं आम्हांसी ॥६९॥
कुलाल म्हणे ते अवसरीं ॥ रांघण नाहीं आमुचें घरीं ॥ आवा भाजलियावरी ॥ घेऊनि जाईं सत्वर ॥१७०॥
ऐसें ऐकोनि निजमाया ॥ आश्रमा आली परतोनियां ॥ चिंताक्रांत होऊनियां ॥ करुणास्वरें रडतसे ॥७१॥
तों स्नान करूनि सत्वर ॥ मठा आले ज्ञानेश्वर ॥ मुक्ताबाईचा करुणास्वर ॥ श्रवणीं अवचित पडियेला ॥७२॥
ज्ञानदेवें धरूनि पोटासीं ॥ करें कुरवाळूनि भगिनीसी ॥ म्हणे किमर्थ कष्टी होसी ॥ सांग मजपासीं सत्वर ॥७३॥
म्हणे मांडेरांधणें आणावयासी ॥ जात होते कुलालगृहासी ॥ तों विसोबा मार्गीं भेटोनि मजसी ॥ ताडन केलें सक्रोध ॥७४॥
त्याचेंचि सांगितलें कुलालासी ॥ कीं खापर न द्यावें मुक्ताबाईसी ॥ मग येऊनि आश्रमासी ॥ शोक करीत बैसलें ॥७५॥
मज आज्ञा केली निवृत्तिनाथें ॥ आजि मांडे करावें स्वहस्तें ॥ म्हणोनि बैसलें चिंताक्रांत ॥ कैसी मात करावी ॥७६॥
तंव विसोबा चाटी बाहेरोन ॥ गवाक्षद्वारें पाहे दुरून ॥ साकल्य ऐकावया वर्तमान ॥ उभा ठाके बाहेरी ॥७७॥
मग ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाईसी ॥ व्यर्थ तूं कां चिंता करिसी ॥ आम्हीं त्याचे स्वभावासी ॥ काय उपाय करावा ॥७८॥
मग योगधारणा करूनी ॥ ज्ञानदेवें पेटविला पंचाग्नि ॥ ज्वाळा निघती मुखांतूनी ॥ आरक्त नयन दिसताती ॥७९॥
जांभूनद तप्त सुवर्ण ॥ तैसी पाठ आरक्तवर्ण ॥ विसोबा बाहेर उभा राहून ॥ कौतुक दृष्टीं पाहात ॥१८०॥
मग मुक्ताबाईसी म्हणे ज्ञानेश्वर ॥ मांडे करावे पाठीवर ॥ तिनें साहित्य आणोनि सत्वर ॥ लाटिले अरुवार तेधवां ॥८१॥
क्षण एक न लागता जाण ॥ मांडे सिद्ध केले तिणें ॥ ज्ञानदेवें जठाराग्न ॥ शांत केला ते काळीं ॥८२॥
स्वानंदताटीं साचार ॥ सप्रेमभक्तीचें वाढिलें क्षीर ॥ शांतिसुख तेचि साखर ॥ गोडी अपार जियेची ॥८३॥
त्यांत स्वानुभवाचे मांडे चुरून ॥ चौघें बैसलीं समागमें जाण ॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥ चौथी बहिण मुक्ताबाई ॥८४॥
श्रीहरि भोक्ता म्हणून ॥ ग्रास घेती अवघे जण ॥ विसोबा बाहेर उभा राहून ॥ कौतुक दृष्टी पाहतसे ॥८५॥
अनुताप धरूनि चित्तीं ॥ म्हणे ह्या केवळ ईश्वरमूर्तीं ॥ म्यां व्यर्थ छळियेलें यांप्रती ॥ विचार चित्तीं न केला ॥८६॥
रत्न हिरे यांची लागली खाणी ॥ ते मज भासले कांचमणी ॥ घेऊनि विकल्पाची गोफणी ॥ चिंतामणि झोंकिला ॥८७॥
कल्पतरूचें देखोनि झाड ॥ हिवर म्हणोनि लाविली कुर्‍हाड ॥ अमूल्य हिरे आंधळ्यापुढें ॥ दगडासारिखे तयासी ॥८८॥
कुपींत घातलें गंगाजीवन ॥ उन्मत्तासी भासलें मद्यपान ॥ कीं जवळी येतां निधान ॥ दिसे कृशान निर्दैवा ॥८९॥
श्रीकृष्ण परब्रह्मअवतार जाणा ॥ दुर्योधन म्हणे आमुचा मेहुणा ॥ तेवीं म्यां विकल्प धरूनि मना ॥ व्यर्थ छळणा केला कीं ॥१९०॥
ऐसा अनुताप धरून ॥ म्हणे आतां यांसी जावें शरण ॥ प्रसाद भक्षून ॥ आपुलें स्वहित करावें ॥९१॥
ऐसें म्हणोनियां त्वरित ॥ धांवत आला आश्रमांत ॥ जेवित बैसले होते तेथ ॥ आला त्वरित त्या ठाया ॥९२॥
ज्ञानदेवें तये क्षणें ॥ ताट ठेविलें लपवोनी ॥ येणें बळेंचि झडप मारुनी ॥ ग्रास उचलूनी घेतला ॥९३॥
मुखांत घालितां सत्वर ॥ काय बोलती ज्ञानेश्वर ॥ तूं कां होसी गा खेचर ॥ सर परता वेगेंसीं ॥९४॥
ऐसी ऐकूनियां वाणी ॥ हाचि उपदेश धरिला मनीं ॥ परापश्यंतीमध्यमेहुनी ॥ वैखरीपरता सरतसे ॥९५॥
चहूंवाचांतीत जें असे ॥ तेथें मिळाला समरसें ॥ अविद्येचें काळवसें ॥ समूळ गेलें तेधवां ॥९६॥
नाद निघाला घंटेंतून ॥ तयेच स्थानीं जाहला लीन ॥ तेवीं स्वरूपी समरस होऊन ॥ अभिन्नपणें राहिला ॥९७॥
मग जोडूनियां दोनी कर ॥ मस्तक ठेविला चरणांवर ॥ ज्ञानदेवें जाणोनी अंतर अभय वर दिधला ॥९८॥
होतां नारदाचें दर्शन ॥ वाल्मीकें टाकिला तामसगुण ॥ तेवीं ज्ञानदेवाचे संगतीकरून ॥ सात्विक लक्षण आलें कीं ॥९९॥
सर परता खेचरा ऐसें ॥ ज्ञानदेवें म्हणितलें तयास ॥ विसोबा खेचर नाम त्यास ॥ तैंपासून म्हणताती ॥२००॥
पुढें कथा अति सुरस ॥ श्रोतीं परिसावी सावकाश ॥ श्रवणीं पडतां सकळ दोष ॥ जाती उदास होऊनी ॥१॥
जैसा उगवतां वासरमणी ॥ तिमिर जाय मावळोनी ॥ तेवीं भक्तविजय पडतां श्रवणीं ॥ अविद्या हारपोनी जातसे ॥२॥
कीं लोहालागीं परिस लागतां जाण ॥ नामरूप पालटे न लागतां क्षण ॥ तेवीं भक्तकथा करितां श्रवण ॥ प्रपंचभान जातसे ॥३॥
त्यांचीं चरित्र अनि र्वाच्य जाण ॥ वदविता श्रीरुक्मिणीरमण ॥ महीपतीस आलें पाईकपण ॥ निमित्तकारण व्हावया ॥४॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ नवमाध्याय रसाळ हा ॥२०५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥९॥    ॥ओंव्या॥    ॥२०५॥
॥ श्रीभक्तविजय नवमाध्याय समाप्त ॥
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय ८