॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ जयजयाजी कैलासनाथा ॥ जयजयाजी उमाकांता ॥ जयजयाजी वरप्रदाता ॥ मार्तंडराया श्रीगुरु ॥१॥
मार्तंड बोलिले धर्मपुत्रांसी ॥ आम्ही मारिलें मणीमल्लसी ॥ आपण रहावें स्वस्थळासीं ॥ यज्ञयागादि करोन ॥२॥
घालोनियां नमस्कार ॥ सांबासी म्हणती द्विजवर ॥ आपण असावें उर्वीवर ॥ जग पावन करावया ॥३॥
अवश्य म्हणोनि शिव बोले ॥ द्विजास आनंद जाहले ॥ आकस्मात कल्पवृक्षाखाले ॥ उद्भवली लिंगे दोन ॥४॥
निर्विकल्प स्फूर्णकल्पवृक्ष ॥ तळीं मूळ लिंगदर्शन मोक्ष ॥ द्वितीयालिंग मार्तंड पार्थीव प्रत्यक्ष ॥ सुज्ञ जन जाणती ॥५॥
मार्गेश्वर शुक्लपक्ष षष्ठीस ॥ चंद्र शततारा नक्षत्रास ॥ दृष्टिगोचर लिंग ते दिवस ॥ सुरवरऋषी पाहूं आले ॥६॥
देव ऋषी तेथें राहिले ॥ तेव्हां नगर उत्पन्न जाहलें ॥ प्रेमपूर नांव ठेविलें ॥ सकळ मिळोनि ॥७॥
संपूर्ण येती ध्यानास्तव ॥ हरिहरात्मक मूर्तिदेव ॥ पार्थीव मार्तंड भैरव ॥ मणी वरद अश्वासह केलें ॥८॥
मूर्ति स्थापोनि ऋषेश्वर ॥ स्तवन करिती अपार ॥ तव पार्थीव मूर्ति सत्वर ॥ बोलें कोंनिमित्य सतव करितां ॥९॥
ऋषि म्हणती यास्तव स्वामी ॥ स्तवन आरंभ केले आम्ही ॥ जे तरले तुमचे नामी ॥ त्यांचे चुको जन्ममरण ॥१०॥
पुत्रपौत्र ध्यान्यधन ॥ शत वर्षे वांचणे ॥ पशुराज अश्व देणें ॥ सर्वदा भक्तांप्रति ॥११॥
विद्याशूरत्व असावें ॥ मनीं द्वैतभाव नसावे ॥ इच्छिलें तें पूर्ण व्हावें ॥ हेचि वर द्यावे मार्तंडा ॥१२॥
वर मागतां अपूर्व ॥ अवश्य म्हणे मार्तंडभैरव ॥ ऋषी आनंदले सर्व ॥ जयजयकार गर्जती ॥१३॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यातील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१४॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां सुरऋषिस्तुतिवरप्रदानी नाम अष्टादशोऽध्याय: ॥१८॥