शुभ्रमूर्ति सिंहासनीं ॥ धर्मपुत्र देखिले नयनीं ॥ नख चंद्रापरि आरक्त चरणीं ॥ मृत्यु कटकासहिंत असे ॥२॥
मृगचर्माचें स्वस्तिक आसन ॥ व्याघ्रचर्मं परिधान ॥ सुशोभे नाग भूषण ॥ नाभी दीर्घ मदनांतकाची ॥३॥
उदरावळी त्रिवेली ॥ उरापर्यंत केशावळी ॥ कंठनील चंद्रमौळी पंचवदन शोभतो ॥४॥
त्रिशूळ डमरु खड्ग पात्रपान ॥ धनुष्य फरशबाण ॥ मृगशुंग आणि अंकुश जाण ॥ दशायुध कपर्दिकाचे ॥५॥
श्वेत वर्ण पश्चिममुख त्रिनयन ॥ गौर उत्तर हास्य वदन ॥ श्याम उग्र वदन दक्षिण ॥ पूर्वनीळ गंगासहित ॥६॥
आरक्त वदन पांचवे असे ॥ विद्युल्लते परि झळकतसे ॥ वामांगी पार्वती बैसे ॥ अलंकारांसहित ॥७॥
उमासहित कर्पूर गौर ॥ पाहोनि आनंदले धर्म कुमार ॥ घातले दीर्घ नमस्कार ॥ नंदीसवें उठोनि सभेंत गेले ॥८॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥९॥
श्रीमाणिकप्रभुकृत टीकायां शिवमूर्तिवर्णनो नाम षष्टोऽध्याय गोड हा ॥६॥