Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २०

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २०
मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट
पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व श्रृंगमुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला. त्यावेळी राणी पद्मिणी (मैनाकिनी) आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती. तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही, असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरिला, तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला. त्यासरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले. असो.
 
त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिणी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की, सिंहलद्वीपामध्ये पद्मिणी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहात असता, त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीति उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस मी तसा भ्रष्ट नाही. सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आताच स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल. तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुति करून म्हणाली, महाराज ! चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे; परंतु आता इतके तरी करा की मला उःशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसूने उःशाप दिला की, हे पद्मिणी, तुला सांगतो ऐक. स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. आता माझ्या ठिकाणी तुझा हेतु गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुजशी रममाण होईल. त्याच्यापासुन तुला 'मीननाथ' या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुजपासून दूर जाईल मग तूहि स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारिले की, त्या ठिकाणी एकहि पुरुष नसून सार्‍याच स्त्रिया आहेत. मग त्यांना संतति तरी कशी होते? तेव्हा त्याने सांगितले की, वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे. त्याच्या भुभुःकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते; पण पुरुषगर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ वाढतो.
 
उपरिक्षवसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर, मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारिले. शिवाय तिने अशी शंका विचारिली की, ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल, हे मला कळवावे. ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव. ती ही की, ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्या वेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याहि प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरिक्षवसू आपल्या स्थानाप्रत गेला.
 
त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली. तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळकथा सांगितली. ती अशी की, मी सिंहलद्वीपी राहात असते, पण उपरिक्षवसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले. आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की, तू मला कन्येप्रमाणे आहेस. येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा. मग ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली. ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी.
 
एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादि दरबारातील स्त्रियांस सांगितले की, माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही; ह्यास्तव या स्त्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की, हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे. व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ति तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे. ती सिंहलद्वीपामध्ये असता, तिच्या आईबापांनी आवडीने तिचे 'मैनाकिनी' असे नाव ठेविले होते. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिणी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेहि म्हणत. अशी ही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली; असो.
 
मारुतीने मैनाकिने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की, मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. का की, मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे; तो सर्वांना अजिंक्य आहे, मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेहि सांगून पाहिले. परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकिले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच, मारुतीने मैनाकिनीस सांगितले की, गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमीव. पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली.
 
इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेश्येसमागमे शृंगमुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सारसरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली. तिच्या समागमे पाच सात जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्‍नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिणी राणीस सांगितले की, आपली कीर्ति ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्या वेळी पद्मिणीची फारच स्तुति केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविल्यावर कलिंगा आपल्या बिर्‍हाडी गेली.
 
त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयाला पाठविले. तेव्हा ती आपला साजसरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून गोरक्षनाथहि तिजसमागमे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की, मृदंग वाजवावयास मला दे; तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की, मच्छिंद्रासह राणीस खूशच करीन. त्या वेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की, मी तुला बरोबर घेऊन गेले असते; परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रिच्या रूपाने येतो, यात दोन फायदे आहेत. गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाहि पैसा पुष्कळ मिळेल. हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले. मग उत्तम तर्‍हेने लुगडे नेसून चोळी घालून, वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहुब स्त्रीचा वेष घेतला. नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे, असे ते अप्रतिम रूप होते. ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली. कलिंगा मुख्य नायकीण, पण तिचेहि गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने ताल, सूर बरोबर जमवून मृदंगावर थाप दिली. नंतर नाच सूरू झाला. त्या वेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला.
 
गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले. तेथील नृत्यगायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलावून शाबासकी दिली. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवीत असता, मधून मधून 'चलो मच्छिंदर गोरख आया' असा ध्वनि वारंवार उठवी. तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे. त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले. तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिणीने विचारिले. त्यावरून त्याने तिला गोरक्ष नाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला.
 
मारुतीने पद्मिणीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीहि खरकन उतरून गेली. तेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला. तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याहि श्रवणी तसाच आवाज पडला, मग तिने कलावंतीणीस सांगितले की, आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पाहा. त्यावरून तिने तो वाजविला असताहि तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंतीण वाजवावयास पाठविली. पण तिला 'चलो मच्छिंदर गोरख आया' हे शब्द काढता येईनात; तेव्हा त्या स्त्रीवेषधार्‍याला (गोरक्षाला) मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरूची शपथ घातली. तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की, मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्रीवेष घेतला आहे. ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली. मग रत्‍नखचित अलंकार व पुरुषांची ऊंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने स्त्रीवेष टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्यास सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तेथे तिने मच्छिंद्रनाथास खूणेने इषारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे. प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे ! ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवील. हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेहि उत्तम संगोपन करील.
 
अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला. परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले. तो तिला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव लोक; आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यतः म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिणी जसे वागवील तसे वागण्याचा त्याने बेत केला, नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिणीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला.
 
नंतर गुरूने शिष्यास नवल वर्तमान विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हास सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही, म्हणून सांगितले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथानेहि त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की, तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे, पण काय करू? न घडावे त घडून आले. मला मारुतीने गोवून येथे आणून घातले. पण तुझ्यावाचून मला येथे चैन पडत नाही. अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की, तुमचे शिष्य अनेक आहेत. तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल, त्या योगाने तुमची माया सर्वाठायी वाटली जाईल, पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात,म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर. जशी माशांना उदकावाचून गति नाही, तद्वत माझा सर्व आधार कायय तो तुम्हीच ! असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती. मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले. त्या वेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली. नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली. दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसर्‍या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १९