अध्याय अडतीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हातीं घेऊनि चार शर ॥ उभा मंगलभगिनीचा कुमर ॥ तंव मागूनि चतुरंग दळभार ॥ अति गर्जरें पातलें ॥१॥
सवें सकळ पृथ्वीचे नृपवर ॥ मध्यें शत्रुघ्न प्रचंड वीर ॥ तों तेणें ऐकिली मात सुंदर ॥ घोडा धरिला म्हणोनि ॥२॥
भू्रसंकेत दावी शत्रुघ्न ॥ अपार लोटलें तेव्हा सैन्य ॥ तंव कर्दळीस श्यामकर्ण ॥ वस्त्रेंकरून बांधिला असे ॥३॥
ऋषींचीं मुंजियें बाळे खेळती ॥ जे वीर आले ते पुसती ॥ वारू कोणी बांधिला म्हणती ॥ लेकुरें बोलती भिऊनियां ॥४॥
कानावरी हात ठेविती ॥ आम्हीं नाहीं धरिला आण वाहती ॥ पैल दिसे धनुष्य हातीं ॥ कलागती करितो तो ॥५॥
तेणें बांधिला श्यामकर्ण ॥ तंव वीर बोलती हांसोन ॥ म्हणती लेकुरें नेणोन ॥ घोडा बांधिला कौतुकें ॥६॥
सोडा रे सोडा श्यामकर्ण ॥ जवळ उरलें आतां अयोध्यापट्टण ॥ वाट पाहतसे रघुनंदन ॥ सत्वर जावें वेगेंसी ॥७॥
घोडा सोडावया धांवले वीर ॥ तंव तो बोले जानकीकुमर ॥ कोण रे तुम्ही तस्कर ॥ घोडा सोडूं पातलां ॥८॥
घोडा धरिला तोचि मी एथ ॥ उभा लक्षित युद्धपंथ ॥ तुमचा कोण आहे रघुनाथ ॥ त्यासी जाऊन सांगा रे ॥९॥
मज म्हणतां तुम्ही बाळ ॥ परी सर्वांचा मी आहें काळ ॥ तुमचीं गर्वांची कवचें सकळ ॥ फोडीन आज समरांगणीं ॥१०॥
तटस्थ पाहती सकळ वीर ॥ म्हणती हा बाळ सुकुमार ॥ लीलाचाप घेऊनि परिकर ॥ धीट गोष्टी बोलतो ॥११॥
यावरी शस्त्र धरिता निश्चिंती ॥ सकळ योद्धे आम्हां हांसती ॥ तरी वारु सोडून त्वरितगती ॥ पुढें चला सत्वर ॥१२॥
घोडा सोडूं धांवले वीर ॥ लहू चाप ओढी सत्वर ॥ शतांचीं शतें सोडूनि शर ॥ तोडिले कर तितुक्यांचे ॥१३॥
जैसीं वटपत्रें तुटोनि पडती ॥ तैसीं मणगटें पडलीं क्षितीं ॥ तों मागुती बहु वीर धांवती ॥ घे घे शब्देंकरूनियां ॥१४॥
खर्गासहित भुजदंड ॥ लहूनें पाडिले उदंड ॥ जैसे शाखारहित तरू प्रचंड ॥ जैसे वीर उभे तेथे ॥१५॥
जाहला एकचि हाहाकार ॥ सेना लोटली तेव्हां समग्र ॥ लक्षांचे लक्ष वीर ॥ धांवते जाहले ते काळीं ॥१६॥
जैसा धारा वर्षे जलधर ॥ तैसे शर सोडी भूमिजाकुमर ॥ शिरांच्या राशी अपार ॥ पाडिल्या तेव्हां पुरुषार्थे ॥१७॥
दुरोनि पाहती वीर सकळ ॥ बारा वर्षांचा दिसे बाळ ॥ परी प्रचंड वीर समोर काळ ॥ उभा ठाकूं न शकेची ॥१८॥
एक म्हणती गुरु समर्थ ॥ याचा असेल हा यथार्थ तरीच एवढे सामर्थ्य ॥ कवणासही नाटोपे ॥१९॥
तंव सोळा पद्में दळभार ॥ एकदांचि लोटले समग्र ॥ परी त्या वीरांचे संधान थोर ॥ खिळिले समग्र बाणांनीं ॥२०॥
मयूरपिच्छें पिंजारती ॥ तैसे वीर सकळ दिसती ॥ मग हांक देऊनि महारथी ॥ शत्रुघ्न पुढें लोटला ॥२१॥
गजकलेवरें पडलीं सदट ॥ चालावया नाहीं वाट ॥ वीर पडिले महासुभट ॥ नामांकित पुरुषार्थी ॥२२॥
सकळ प्रेतें मागे टाकून ॥ पुढें धांवला शत्रुघ्न ॥ बाळ पाहिला विलोकून ॥ तंव रघुनंदन दुसरा ॥२३॥
म्हणे कोणाचा तूं किशोर येथ ॥ दळ पाडिलेंस असंख्यात ॥ आतां शिक्षा लावीन तुज बहुत ॥ पाहें पुरुषार्थ पैं माझा ॥२४॥
लहू म्हणे सिंहदरींत वारण ॥ आला मदभरेंकरून ॥ परी तो क्षेम स्वस्ति वांचून ॥ केवीं जाईल माघारा ॥२५॥
विष्णुवहनाचे कवेंतून ॥ उरग केवीं जाय वांचून ॥ ऐसें ऐकतां शत्रुघ्न ॥ लावी बाण चापासी ॥२६॥
आकर्णवरी ओढी ओढून ॥ लहूवरी सोडिला बाण ॥ सीतापुत्रें न लागतां क्षण ॥ तोडोनियां टाकिला ॥२७॥
आणीक सोडिले पांच बाण ॥ तेही तत्काळ टाकिले तोडून ॥ सवेंचि शत शर शत्रुघ्न ॥ मोकलीत अति रागें ॥२८॥
तेही लहू तोडी सत्वर ॥ मग काय करी सीतापुत्र ॥ बाणजाळ घातलें अपार ॥ झांकिलें अंबर प्रतापें ॥२९॥
सेनेसहित कैकयीनंदन ॥ बाणीं नजर जर्जर केला पूर्ण ॥ जें जें शस्त्र प्रेरी शत्रुघ्न ॥ तें तें सवेंच लहू छेदी ॥३०॥
मग निर्वाण बाण जो शत्रुघ्नाते ॥ दिधला होता रघुनाथें ॥ परम संकट देखोनि तेथें ॥ तृणीरांतून ओढिला ॥३१॥
वीज निघे मेघाबाहेर ॥ तैसा झळक तसे दिव्य शर ॥ तो धनुष्यीं योजून सत्वर ॥ लहूवरी सोडिला ॥३२॥
दृष्टीं देखतां सीताकुमर ॥ म्हणे बाण आला दुर्धर ॥ याचें निवारण समग्र ॥ कुश एक जाणतसे ॥३३॥
फळें आणावया कुश गेला ॥ माझा पाठिराखा दुरावला ॥ बाणापुढें यावेळां ॥ न वांचेंचि सर्वथा ॥३४॥
परम धैर्यवंत सीतानंदन ॥ वेगीं सोडिला दिव्यबाण ॥ तेणें शत्रुघ्नाचा निर्वाणबाण ॥ अर्ध खंडिला अंतराळीं ॥३५॥
अर्ध शर जे का उरला ॥ तो लहूचे हृदयीं भेदला ॥ मूर्च्छना येऊनि पडिला ॥ बाळ तेव्हां धरणीवरी ॥३६॥
भडाभडा चालिले रुधिर ॥ आरक्त नेत्र जाहले वक्र ॥ श्वासोच्छास कोंडले समग्र ॥ शेंडी रुधिरें थबथबली ॥३७॥
लहूपासोनि वांचले वीर ॥ त्याणीं सिंहनाद केला थोर ॥ पडिला पडिला किशोर ॥ म्हणोनि समग्र धांवले ॥३८॥
दुरोनि पाहती ते वेळे ॥ एक म्हणती मीस घेतले ॥ मग शत्रुघ्न रथाखालें ॥ उतरूनि जवळी पातला ॥३९॥
शत्रुघ्न जवळी बैसोन ॥ पाहे बाळ विलोकून ॥ धन्य जननी प्रसवली रत्न ॥ म्हणोनि उचलूनि घेतला ॥४०॥
श्यामसुंदर आकर्ण नयन ॥ आजानुबाहु सुहास्यवदन ॥ शत्रुघ्नें उदक आणून ॥ मुखींचें अशुद्ध धूतलें ॥४१॥
आश्चर्य करिती अवघे वीर ॥ म्हणती दुजा अवतरला रघुवीर ॥ आतां याची माता अपार ॥ शोक करील यालागीं ॥४२॥
स्नेहाचा पूर अत्यंत ॥ शत्रुघ्नाचे हृदयीं दाटत ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ बाळक दृष्टीं विलोकितां ॥४३॥
रामचंद्रासी दाखवूं म्हणून ॥ रथी घातला त्वरेंकरून ॥ घेऊनियां श्यामकर्ण ॥ शत्रुघ्न त्वरेनें चालिला ॥४४॥
लागला वाद्यांचा एकचि नाद ॥ मनीं न सामाये आनंद ॥ महासिद्धि साधूनि सिद्ध ॥ घवघवीत परते जैसा ॥४५॥
इकडे लेकुरें धांवोनी ॥ जानकीस सांगती जाउनी ॥ माते तुझा लहू मारूनी ॥ नेला घालोनि रथावरी ॥४६॥
ऐकतां सर्व वर्तमान ॥ जानकी पडिली मूर्च्छा येऊन ॥ जैसें लोभियांचें धन गेलें हारपोन ॥ तैसे प्राण सर्व एकवटती ॥४७॥
जैसी काष्ठाची बाहुली ॥ तैसी निचेष्टित सीता पडली ॥ पुढती आक्रंदत उठिली ॥ वक्षःस्थळ बडवित ॥४८॥
मी अनाथ दुर्बळ ॥ परदेशी भणंग केवळ ॥ माझें धरूनियां बाळ ॥ कोणी निर्दय नेले पैं ॥४९॥
माझी दुर्बळाची दोन बाळें ॥ त्यांत एक धरूनि नेलें ॥ पूर्वकर्म फळास आलें ॥ अहाहा जाहले ओखटें ॥५०॥
अध्याय अडतीसावा - श्लोक ५१ ते १००
बाळ माझे अत्यंत कोमळ ॥ घायें जाहलें असेल विकळ ॥ मुखचंद्र त्याचा अतिनिर्मळ ॥ नयन विशाळ सुरेख ॥५१॥
तेथें लागोनियां बाण ॥ फुटले असतील नयन ॥ सुहास्यवदन छिन्नभिन्न ॥ जाहले असेल बाळाचें ॥५२॥
माझी बाळें अत्यंत दीन ॥ होतीं कंदमुळें भक्षून ॥ तयासीं बळ कैचें संपूर्ण ॥ झुंजावया कोणासीं ॥५३॥
बाळावरी शस्त्र उचलिती ॥ ते क्षत्रिय नव्हेत दुर्मती ॥ कैसी कोणाचेही चित्ती ॥ दया उपजली नाहीं तेथें ॥५४॥
माझें दरिद्रियाचें किंचित धन ॥ कोणें निर्दयें नेलें चोरून ॥ मज अंधाची काठी हिरून ॥ कोणी वनी भिरकाविली ॥५५॥
कोणीं पक्ष माझा छेदिला ॥ कोणी नेत्र माझा फोडिला ॥ माझा कल्पवृक्ष उपडिला ॥ कोण्या पापियें येऊनि ॥५६॥
वाल्मीक तात ये वेळां ॥ तोही गेला असे पाताळा ॥ मजवरी अनर्थ जाहला ॥ कोणा सांगूं जाऊनियां ॥५७॥
कुश वनास गेला तत्वतां ॥ कोण धांवणें करील आतां ॥ माझा लहू बाळ मागुता ॥ कोण मज भेटवील ॥५८॥
तों कुश परतला वनींहून ॥ मार्गीं होती अपशकुन ॥ जड जाहले चालतां चरण ॥ तैसाच धांवून येतसे ॥५९॥
कोपीन मौंजी कटीं शोभत ॥ मस्तकीं शिखा वातें उडत ॥ माता जाहली असेल क्षुधित ॥ म्हणोन धांवत वेगेंसी ॥६०॥
पर्णकुटींत प्रवेशला ॥ म्हणे माते बंधु कोठें गेला ॥ आजि सामोरा मज नाहीं आला ॥ कोठें गुंतला खेळावया ॥६१॥
मग त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले आक्रोशें हांक फोडूनी ॥ बारे आजि परचक्र ॥ येऊनी ॥ नेला धरून बंधु तुझा ॥६२॥
तूं त्याचा पाठिराखा पूर्ण ॥ तुझें करीत घडीघडी स्मरण ॥ सोडिला असेल तेणें प्राण ॥ तूं लवकरी धांव आतां ॥६३॥
कुशें घेतले धनुष्य बाण ॥ जानकीसी केले साष्टांग नमन ॥ जय सद्गुरु वाल्मीक म्हणून ॥ केली गर्जना ते काळीं ॥६४॥
कुरुनाममंत्रें ते वेळी ॥ सर्वांगी विभूति चर्चिली ॥ उभा राहून बाळ बळी ॥ जानकीप्रति बोलत ॥६५॥
अंबे इंद्र चंद्र कुबेर ॥ अथवा ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ जरी मी असेन तुझा कुमर ॥ तरी बाणेंकरूनि फोडीन ते ॥६६॥
समरांगणीं सर्व वीर ॥ आटोनियां रथ कुंजर ॥ बंधु सोडवीन सत्वर ॥ शिक्षा करीन वैरियां ॥६७॥
आजि दखवीन बळाची प्रौढी ॥ तरीच जन्मलो तुझे पोटी ॥ म्हणून चालिला जगजेठी ॥ नमून माता सत्वर ॥६८॥
कुंजरांचा मार्ग काढीत पूर्ण ॥ जेवीं आवेशें धांवे पंचानन ॥ कीं सर्प शोधावया सुपर्ण ॥ क्रोधें जैसा धांवत ॥६९॥
असो दूर देखोनियां भार ॥ प्रचंड हांक दिधली थोर ॥ उभेरे उभे तस्कर ॥ चोरून नेतां वस्तु माझी ॥७०॥
तस्करासी शिक्षा हेचि पूर्ण ॥ हस्तचरण खंडोन ॥ कर्ण नासिका छेदोन ॥ शिक्षा लावीन येथेंचि ॥७१॥
खळबळला सेनासमुद्र ॥ अवघे माघारें पाहती वीर ॥ तों राजस घनश्याम सुंदर ॥ दिसे राघव दुसरा ॥७२॥
द्वादश वर्षांचा किशोर ॥ देखोनि चळचळां कांपती वीर ॥ एक म्हणती सकळ संहार ॥ करील आतां उरलियांचा ॥७३॥
तों कुशें कोदंड चढवून ॥ सोडिले तेव्हां दिव्य बाण ॥ किंवा वर्षत पर्जन्य ॥ सायकांचा ते काळीं ॥७४॥
तों सेनापति दळ घेऊन ॥ मुरडला तेव्हां वर्षंत बाण ॥ म्हणे बाळा तुज न लागतां क्षण ॥ धरून नेईन अयोध्ये ॥७५॥
मग निर्वाणीचें दहा बाण ॥ कुशावरी प्रेरिले दारुण ॥ येरें एकचि शर सोडून ॥ दहाही छेदिले ते काळीं ॥७६॥
जैसे मूढाचे बोल अपार ॥ एकेंचि शब्दें चतुर ॥ कीं स्पर्शतां जान्हवीचें नीर ॥ पापें सर्वत्र संहारती ॥७७॥
तैसे कुशें शर छेदून ॥ तत्काळ सोडिले नव बाण ॥ चारी वारू आणि स्यंदन ॥ सेनापतीचा तोडिला ॥७८॥
आणिक तीन बाण सोडिले ॥ चाप हातींचे छेदिले ॥ कवच आंगींचे उडविले ॥ विरथ केलें ते काळीं ॥७९॥
पुढें चरणचाली चालत ॥ कुशावरी आला अकस्मात ॥ जैसा कां सुकर उन्मत्त ॥ मृगेंद्रावरी चौताळे ॥८०॥
तों कुशें सोडूनि दोन बाण ॥ दोनी हस्त टाकिले छेदून ॥ सवेंच दिव्य शर सोडून ॥ शिर तयाचें उडविलें ॥८१॥
सेनापति पडतांच ते वेळां ॥ एकचि हाहाकार जाहला ॥ तों तयाचा बंधु सरसावला ॥ नागेंद्र नाम जयासी ॥८२॥
विद्युत्प्राय वीस बाण ॥ नागेंद्रं सोडिले चापीं योजून ॥ त्या शरतेजें प्रकाशलें गगन ॥ मग सीतानंदन काय करी ॥८३॥
एकेंचि शरें ते वेळे ॥ वीसही बाण पिष्ट केले ॥ जैसीं एकाचि नामें सकळें ॥ महापातकें भस्म होती ॥८४॥
मग सोडोनि अर्धचंद्र शर ॥ उडविले नागेंद्राचे शिर ॥ सोडित बहु बाणांचा पूर ॥ न ये समोर कोणीही ॥८५॥
तों समीरासी मागें टाकून ॥ पुढें धांवला कैकयीनंदन ॥ चपळेहून सतेज बाण ॥ वर्षता जाहला ते काळीं ॥८६॥
तंव तो राघवी वीर चतुर ॥ एवं पिष्टवत् करी शर ॥ सवेंचि बाण अपार ॥ वर्षत मेघासारिखा ॥८७॥
उरलें शत्रुघ्नाचें दळ ॥ शिरें छेदोनि पाडी सकळ ॥ जैसें अपार जलदजाळ ॥ प्रभंजन विभाडी ॥८८॥
मग आठवोनि वाल्मीकाचे चरण ॥ काढिला सद्रुरुदत्त बाण ॥ सोडिला जेवीं पंचानन ॥ वारणावरी चपेटे ॥८९॥
वज्र पडे शैलशिखरी ॥ तैसा शत्रुघ्नाचे हृदयावरी ॥ बाण खडतरला ते अवसरीं ॥ पडला धरणीं शत्रुघ्न ॥९०॥
मग भोंवतें पाहे कुश वीर ॥ तंव एकही नये समोर ॥ जैसा दिनकराप्रति अंधकार ॥ मुख परतोनि न दाखवी ॥९१॥
षोडश पद्में दळभार ॥ आणीक देशोदेशींचे नृपवर ॥ तितुकेही संहारिले समग्र ॥ जैसें तृण अग्निसंगें ॥९२॥
मग कुश चापासी घाली गवसणी ॥ जैसा याज्ञिक आच्छादी अग्नी ॥ कीं मेघांमाजी सौदामिनी ॥ गुप्त जैसी राहिली ॥९३॥
जैसीं उद्वसग्रामींचीं मंदिरें ॥ तेवीं रथ शून्य दिसती एकसरें ॥ लहूवाकारणें कुशेंद्रें ॥ तितुकेंही शोधिले ते काळी ॥९४॥
व्हावया वस्तुसाक्षात्कार ॥ साधक शोधिती तत्वें समग्र ॥ तैसे रथ शोधित कुशेंद्र ॥ बंधुरत्नाकारणें ॥९५॥
तों शत्रुघ्नाचा मुख्य रथ ॥ त्यावरी लहु होता मूर्च्छागत ॥ तों कुशें उचलूनियां त्वरित ॥ हृदयकमळीं आलिंगिला ॥९६॥
तों लहूनें उघडिले नयन ॥ विलोकी निजबंधूचें वदन ॥ तत्काळ उभा ठाकला उठोन ॥ म्हणे शत्रुघ्न पळून गेला कोठें ॥९७॥
देह चारी शोधोनि विविध ॥ संत अंतरीं धरिती बोध ॥ तैसाच कुश होऊनि सद्रद ॥ बंधूस हृदयीं धरियेला ॥९८॥
मग कुश वचन बोलत ॥ बारें तूं श्रमलासी बहुत ॥ येरू म्हणे कष्ट समस्त ॥ हरले तुज देखतां ॥९९॥
म्हणे श्यामकर्ण घेऊन ॥ चला आश्रमा करूं गमन ॥ मग कुश बोलिला वचन ॥ कदा येथून जाऊं नये ॥१००॥
अध्याय अडतीसावा - श्लोक १०१ ते १५०
आतां युद्धास येतील बहुत ॥ ते समरीं जिंकून समस्त ॥ मग वारू घेऊनि त्वरित ॥ जाऊं जननीच्या दर्शना ॥१॥
लहू म्हणे घालोनि पैज ॥ घ्यावें अयोध्येचें राज्य ॥ धरून आणावा रघुराज ॥ वाल्मीकचरणाजवळी पैं ॥२॥
असो वृक्षीं बांधोन श्यामकर्ण ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ अयोध्यापंथ लक्षीत पूर्ण ॥ दोघेजण उभे असती ॥३॥
घायाळ सैन्य उरले किंचित ॥ तें अयोध्येसी गेले धांवत ॥ राघवासी सकळ मात ॥ श्रुत केली तेधवां ॥४॥
दळभारासहित पूर्ण ॥ रणीं आटिला वीर शत्रुघ्न ॥ विप्रबाळक दोघेजण ॥ द्वादश वर्षांचे असती पैं ॥५॥
यज्ञमंडपीं रघुनंदन ॥ बंधूचा समाचार ऐकोन ॥ टाकोनि हातींचे अवदान ॥ भूमीवरी उलंडला ॥६॥
नेत्रीं ढळढळां वाहे नीर ॥ गजबजिले भरत सौमित्र ॥ बिभीषण हनुमंत मित्रपुत्र ॥ हडबडिले तेधवां ॥७॥
म्हणती यज्ञासी जाहलें विघ्न ॥ पडला महावीर शत्रुघ्न ॥ असो सौमित्राप्रति राजीवनयन ॥ काय बोलिला तेधवां ॥८॥
म्हणे शत्रुघ्नाऐसा वीरराणा ॥ ऋषिकिशोरें आटिला रणा ॥ तरी सवें घेऊनि अपार सेना ॥ धांवण्या धावे बंधूच्या ॥९॥
श्रीरामचरणाब्ज नमून ॥ वायुवेगें निघाला लक्ष्मण ॥ सवें चतुरंग सैन्य ॥ अपार तेव्हां निघालें ॥११०॥
चवदा गांवें रुंद थोर ॥ मार्गी ॥ चालिला सेनासागर ॥ वायुवेगें ऊर्मिलावर ॥ रणमंडळासीं पातला ॥११॥
तो सेनापति काळजीत ॥ सौमित्रासी पावला त्वरित ॥ तंव दोघे देखिले अकस्मात ॥ शशी आदित्य ज्यापरी ॥१२॥
श्यामसुंदर दोघेजण ॥ द्वादश वर्षांच्या मूर्ती लहान ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ धीट दोघे विलोकिती ॥१३॥
पहावया बंधूचें मानस ॥ बोलता जाहला वीर कुश ॥ म्हणे सेना पातली विशेष ॥ प्रताप विशेष दिसतसे ॥१४॥
सेनापति क्रोधयमान ॥ चपळ येतसे त्याचा स्यंदन ॥ आतां हा युद्ध करील दारुण ॥ आम्हांसी पुन्हां नाटोपे ॥१५॥
मग बोलिला लहू वीर ॥ तूं पाठिराखा आलासी सत्वर ॥ आतां मज बळ अपार येथोनियां चढियेले ॥१६॥
जैसी साह्य होतां सरस्वती ॥ सकळ कठिनार्थ उमजती ॥ तेवीं आजि निर्वीर करीन क्षिती ॥ तुझ्या बळेंकरूनियां ॥१७॥
तुजसी युद्धीं राहे समोर ॥ ऐसा असेल कोण वीर ॥ जरी स्वयें आला रामचंद्र ॥ तरी तूं त्यासी नाटोपसी ॥१८॥
तोंवरी गर्जे जलार्णव ॥ जों देखिला नाहीं कलशोद्धव ॥ तूं पंचानन हे सर्व ॥ जंबूक तुजवरी पातले ॥१९॥
जरी तम जिंकील सूर्यासी ॥ कीं भूतें गिळितील काळासी ॥ तरी समरांगणी युद्धासी ॥ तुजसी हें पुरतील ॥१२०॥
जरी आकाश बुडेल मृगजळीं ॥ वारा कोंडिजे भूगोळीं ॥ तरीच तुजसी समदळीं ॥ भिडो शकतील बंधुराया ॥२१॥
परी एकें संशयें गोंविलें ॥ जें माझे धनुष्य भंगिलें ॥ असंख्यात युद्ध जाहले ॥ उपवनाजवळी प्रथमचि ॥२२॥
मग सैन्य दळभार ॥ धरा धरा म्हणती किशोर ॥ आतां जातील हे कोठवर ॥ पाहूं नयनीं आम्हीच कीं ॥२३॥
वीर दोघे उभे ठाकूनी ॥ दळभार विलोकिती नयनीं ॥ सैन्य जैसं तृणप्राय करूनी ॥ उभे ठाकती तैसेच ते ॥२४॥
कुश म्हणे ऐसिया समयासी ॥ कोण चाप देईल आम्हांसी ॥ तरी आतां प्रार्थूं सूर्यासी ॥ धनुष्यप्राप्तीकारणें ॥२५॥
मग ते राघवी वीर दोघेजण ॥ एकनिष्ठें मांडिती सूर्यस्तवन ॥ ऊर्ध्व वदनें करून ॥ सूर्यमंडळ विलोकिती ॥२६॥
जयजय तमनाशका सहस्रकिरणा ॥ अंबरचूडामणे सूर्यनारायणा ॥ जीवमिलिंदबंधमोचना ॥ हृदयदळप्रकाशका ॥२७॥
एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख अश्व वेग बहुत ॥ निमिषार्धामाजी अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥२८॥
आदिपुरुष तूं निर्विकार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हीं स्वरूपें तुझींच साचार ॥ सर्वप्रकाशका आदित्या ॥२९॥
सकळ रोग दुःख भयहारका ॥ विश्वदीपना विश्वपाळका ॥ त्रिभुवननेत्रप्रकाशका ॥ काळात्मका काळरूपा ॥१३०॥
परिसोनि बाळकांची स्तुती ॥ तत्काळ प्रसन्न जाहला गभस्ती ॥ अक्षय्य धनुष्य क्षितीं ॥ ऊर्ध्वपंथें टाकिले ॥३१॥
सूर्यास साष्टांग नमून ॥ घेतले तेव्हां धनुष्यबाण ॥ म्हणती वाल्मीक गुरु धन्य पूर्ण ॥ सूर्यआराधन दिधलें जेणें ॥३२॥
आम्हांसी सद्गुरुराया अखंड ॥ क्षणें जिंकू हे ब्रह्मांड ॥ लहू म्हणे आजि कोड ॥ पुरवीन यांचे संग्रामीं ॥३३॥
सूर्यदत्त कोदंड घेऊन सत्वर ॥ सरसावला तेव्हां लहू वीर ॥ तों सौमित्राचें दळ समग्र ॥ चतुरंग भार लोटला ॥३४॥
अचुक दोघांचे संधान ॥ वायां न जाय टाकिला बाण ॥ पदाती अश्व रथ वारण ॥ तोडोनि पाडिती एकसरें ॥३५॥
कोणी धनुष्याची ओढी ओढित ॥ तों भुज तोडिती अकस्मात ॥ मणगटें असिलतेसहित ॥तोडोनि पाडिती क्षितीवरी ॥३६॥
शिरांच्या लाखोल्या घालोनी ॥ भूलिंगें पूजिली दोघांजणीं ॥ अशुद्धनदी लोटली वनीं ॥ जाती वाहून कलेवरें ॥३७॥
वीर संहारिले अपार ॥ काळजितास म्हणे सौमित्र ॥ हे दोघे असतां एकत्र ॥ कल्पांतीही नाटोपती ॥३८॥
तरी बहुत कटक घेऊन ॥ ज्येष्ठासी धरी तूं वेष्टून ॥ धाकट्याभोंवते आवरण ॥ मी घालूनि धरितसे ॥३९॥
मग दोन भाग कटक केले ॥ दोघे दोहींकडे फोडिले ॥ चोवीस वेढे घातले ॥ सभोंवते सैन्याचे तेधवां ॥१४०॥
सौमित्रें वेढिला लहू वीर ॥ जैसा तृणें झांकिला वैश्वानर ॥ कीं अजांनी कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं खगेश्वर सर्पांनी ॥४१॥
परी तो लहू प्रतिज्ञावीर ॥ चापासी लावून सोडी शर ॥ फिरत फिरत चक्राकार ॥ सोडी पूर बाणांचा ॥४२॥
धन्य वाल्मीकाचे दिव्य मंत्र ॥ एका बाणाचे कोटी शर ॥ होऊनि शिरें पाडी समग्र ॥ नवल वीर राघवी ॥४३॥
रघुपतीचा मित्र विशेष ॥ रुधीनामा धांवला राक्षस ॥ तो महाबलिष्ठ गगनास ॥ उडोनि गेला तेधवां ॥४४॥
खालीं अकस्मात उतरूनी ॥ लहूचें चाप सत्वर हिरूनी ॥ अंतरिक्ष गेला उडोनी ॥ फळ घेऊन पक्षी जैसा ॥४५॥
हातींचे हिरून नेले चाप ॥ लहू पाहे तटस्थरूप ॥ तस्करापाठीं लागतां सर्प ॥ खंडी जैसा चरणातें ॥४६॥
व्याळ मूषक धरूं जातां ॥ वणव्यांत सांपडे अवचितां ॥ कीं रिसामागें धांवतां ॥ बोरांटी आंगी अडकली ॥४७॥
निधान साधावया गेला ॥ तों विवशीं पडली येऊन गळां ॥ तैसें लहूस जाहलें ते वेळा ॥ धनुष्य नेतां रुधीने ॥४८॥
असो सीतासुत परम चतुर ॥ जैसा निराळी उडे खगेश्वर ॥ तैसा उडोनियां सत्वर ॥ रुधी राक्षस धरियेला ॥४९॥
हातींचे धनुष्य हिरून घेतलें ॥ असुर झोटी धरिला तये वेळे ॥ गरगरां फिरवूनियां बळे ॥ पृथ्वीवरी आपटिला ॥१५०॥
अध्याय अडतीसावा - श्लोक १५१ ते १९९
मृत्तिकाघटाचीं शकलें ॥ तेंवि असुरअवयव चूर जाहले ॥ रुधीनें प्राण सोडिले ॥ सकळांदेखतां ते काळीं ॥५१॥
मागुतीं कटकांत उतरोन ॥ युद्ध करी सीतानंदन ॥ चोवीस वेढे संहाररून ॥ टाकिलें सैन्याचे ते क्षणी ॥५२॥
महाझुंजार येऊन ॥ हातींचीं शस्त्रें टाकून ॥ धरिती लहूचे चरण ॥ आमचे प्राण रक्षीं कां ॥५३॥
एक पळती रण सांडून ॥ एक दांतीं धरिती तृण ॥ मग सिंहानादें लक्ष्मण ॥ गर्जोनि पुढें धांविन्नला ॥५४॥
जैसा पांच विजा अतितीक्ष्ण ॥ तैसें सौमित्रें पांच बाण ॥ लहूवरी सोडिले पूर्ण ॥ महाक्रोधंकरूनियां ॥५५॥
रघुवीराचा लहू वीर ॥ तत्काळ सोडी दिव्य शर ॥ पांच बाण केले चूर ॥ लोहपिष्टन्यायेंसी ॥५६॥
लहू सौमित्राप्रति बोलत ॥ त्वां पूर्वी मारिला इंद्रजित ॥ ते तुझी विद्या समस्त ॥ आजि दावीं मजलागीं ॥५७॥
चतुर्दश वर्षें निराहार ॥ काननीं श्रमलासीं तूं फार ॥ आज समरांगणीं साचार ॥ सावकाश निद्रा करीं ॥५८॥
सौमित्र म्हणे तूं कोणाचा कोण ॥ तंव तो लहू बोले हांसोन ॥ तुज पुसावया काय कारण ॥ आला बाण सांभाळीं ॥५९॥
लहू निधडा प्रचंड वीर ॥ सोडी एक सबळ शर ॥ रथासहित सौमित्र ॥ आकाशपंथें उडविला ॥१६०॥
गरगरां गगनी भोंवे रथ ॥ भूमीवरी पडे अकस्मात ॥ मग दुजे रथी सुमित्रासुत ॥ आरूढला लवलाहे ॥६१॥
जैसा कां वर्षे घन ॥ तैसा बाण सोडी लक्ष्मण ॥ लहू त्याचिया त्रिगुण ॥ शर सोडीत सतेज ॥६२॥
ऊर्मिलापतीचे बाण ॥ तटतटां टाकी तोडून ॥ मग मंत्र जपोनि लक्ष्मण ॥ शर सोडोनि देतसे ॥६३॥
त्या शरापासून एकदा ॥ निघाल्या कोट्यवधि गदा ॥ विमानीं सकळ सुरवृंदा ॥ आश्चर्य तेव्हां वाटले ॥६४॥
तो लहू जपे गुरुमंत्र ॥ चक्रें सोडिली तेव्हां अपार ॥ गदा छेदोनि समग्र ॥ चक्रें सवेंचि गुप्त जाहली ॥६५॥
तों सौमित्रें सोडिले पर्वत ॥ सवेचि लहू वज्र प्रेरित ॥ फोडिले अचळ समस्त ॥ वज्र जात स्वस्थाना ॥६६॥
मंगळाचा भाचा लहू वीर ॥ सूर्यवंशमंडणाचा कुमर ॥ शरमुखीं द्वादश दिनकर ॥ स्थापोनियां सोडिले ॥६७॥
निघतां द्वादश आदित्य मेळ ॥ प्रतापें लोपला विरिंचिगोळ ॥ ऐसें देखतां फणिपाळ ॥ राहुअस्त्र सोडित ॥६८॥
सूर्य आणि राहुअस्त्र ॥ दोनी जाहलीं एकत्र ॥ सवेंच गुप्त जाहली क्षणमात्र ॥ नलगतां ते काळीं ॥६९॥
कामास्त्र सोडी अहिनायक ॥ लहूवीरे प्रेरिलें कामांतक ॥ कामास्त्र दग्ध जाहलें तात्कालिक ॥ नामें पातक हरे ज्यापरी ॥१७०॥
सौमित्रें सोडिलें तारकास्त्र ॥ लहू प्रेरी षण्मुखास्त्र ॥ विघ्नास्त्र सोडी सौमित्र ॥ हेरंबास्त्र लहू टाकी ॥७१॥
सौमित्र सोडी सरितापति ॥ लहू त्यावरी प्रेरी अगस्ति ॥ मग त्यावरी ऊर्मिलापति ॥ पावकास्त्र प्रेरितसे ॥७२॥
लहूनें मेघास्त्र प्रेरून ॥ विझविला प्रचंड अग्न ॥ जैसें प्रकटतां आत्मज्ञान ॥ जाय वितळोन प्रेममोह ॥७३॥
वातास्त्र प्रेरी ऊर्मिलानाथ ॥ लहू आड घाली पर्वत ॥ असो साठ अक्षौहिणी गणित ॥ रामसेना पाडिली ॥७४॥
आश्चर्य करी लक्ष्मण ॥ म्हणे याचा पार न कळे पूर्ण ॥ हातासीं कदा न ये श्यामकर्ण ॥ आतां यज्ञ कायसा ॥७५॥
हे असती कोणाचे कोण ॥ हे कदा न कळे वर्तमान ॥ मज वाटे शिव आणि रमारमण ॥ बाळवेषें प्रकटले ॥७६॥
आणिकांची नव्हे शक्ति ॥ हे त्रिभुवनासी नाटोपती ॥ असो लहू म्हणे सौमित्राप्रति ॥ कां रे उगाचि निवांत ॥७७॥
तुझे सरले असतील बाण ॥ तरी जाईं अयोध्येसी परतोन ॥ तुझा कैवारी रघुनंदन ॥ घेऊनि येई सत्वर ॥७८॥
सौमित्र नेदी प्रत्युत्तर ॥ विलोकी बाळांचा मुखचंद्र ॥ मागुती क्रोध उचंबळतां अपार ॥ सोडिले शर सौमित्रें ॥७९॥
भोगींद्रअवतार ॥ लक्ष्मण ॥ हें भूमिजासुतें जाणोन ॥ प्रेरिला नादास्त्र बाण ॥ नवल पूर्ण वर्तले ॥१८०॥
असंभाव्य नाद मंजुळ ॥ ध्वनीनें भरला ब्रह्मांडगोळ ॥ धनुष्य टाकूनि फणिपाळ ॥ नादब्रह्मीं मिसळला ॥८१॥
जे कनकबीज भक्षिती ॥ त्यांचे आंगीं संचरें भ्रांति ॥ ऊर्मिलापतीची गति ॥ तैसीच जाहली तेधवां ॥८२॥
नादास्त्र बाण हृदयीं भरला ॥ जैसा विखार बिळीं प्रवेशला ॥ त्यावरी नादरंगें व्यापिला ॥ भूतळी पडिला मूर्च्छित ॥८३॥
इकडे सैन्याचे चोवीस आवर्त ॥ कुशाभोंवते घातले अद्भुत ॥ ते संहारून समस्त ॥ काळजित मारिला ॥८४॥
विभांडोनि दोनी दळें ॥ दोनी बंधू एकवटले ॥ रण अपार तेथें पडिलें ॥ कुंजर मोकळे धांवती ॥८५॥
नाहीं रथस्वामी सारथी ॥ रिते रथ तुरंग ओढिती ॥ सैरावैरा चौताळती ॥ सव्य अपसव्य रणांगणीं ॥८६॥
असो अयोध्येंत कोदंडपाणी ॥ सांगें गुज भरताचे कर्णीं ॥ म्हणे आणिक सेना घेऊनी ॥ साह्य जाईं सौमित्रासी ॥८७॥
दारुण योद्धा तो लक्ष्मण ॥ त्याप्रति सांगें इतुकें वचन ॥ कीं बाळक दोघेजण ॥ जितेच धरून आणावे ॥८८॥
ते जिवें न मारावे सर्वथा ॥ आकांत करील त्यांची माता ॥ तरी बाण आंगीं न खुपतां ॥ मोहनास्त्र घालोनि धरावे ॥८९॥
त्यांचीं माता -पिता कोण ॥ धनुर्वेद गुरु संपूर्ण ॥ कां हिंडतां वनोपवन ॥ वर्तमान सर्व पुसावें ॥१९०॥
त्यांच्या स्वरूपाची आकृति ॥ कोणासारिखे दोघे दिसती ॥ धरूनि आणा त्वरितगती ॥ रथावरी घालोनियां ॥९१॥
सौमित्राचा क्रोध दारुण ॥ घेईल बाळकांचा प्राण ॥ अन्याय केला तरी पूर्ण । कृपा करावी बाळकांवरी ॥९२॥
ज्याचें हृदय परम कोमळ ॥ ते दृष्टीं देखतांचि बाळ ॥ स्नेहें द्रवेल तत्काळ ॥ अग्नि संगें घृत जैसें ॥९३॥
बाळकाविणें शून्य मंदिर ॥ आमुचें पडलें कीं साचार ॥ गुणसरिता ॥ सीता सुंदर ॥ विवेक न करिता त्यागिली ॥९४॥
ऐसें बोलतां रघुनाथ ॥ कंठ जाहला सद्रदित ॥ नयनीं सुटले अश्रुपात ॥ प्रिया हृदयांत आठवली ॥९५॥
ऐसें राजीवनेत्र बोलत ॥ तों घायाळ आले धांवत ॥ म्हणती सौमित्र आणि काळजित ॥ सेनेसहित आटिले ॥९६॥
ऐसें ऐकतां राजीवनेत्र ॥ परम चिंतातुर जाहले वानर ॥ श्रीराम म्हणे सर्वेश्वर ॥ अत्यंत कोपला आम्हांवरी ॥९७॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर॥ पुढें वीरश्री माजेल अपार ॥ ते श्रवण करोत श्रोते चतुर ॥ व्युत्पन्न आणि प्रेमळ ॥९८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ अष्टत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥१९९॥
अध्याय ॥३८॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥