Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम गाथा - अभंग संग्रह १०१ ते १५०

tukaram
, बुधवार, 31 मार्च 2021 (12:16 IST)
१०१
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥
 
१०२
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥
शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥
देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥
तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥
 
१०३
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥
 
१०४
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥
कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥
आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥
तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥
 
१०५
जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥
सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥
तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥
 
१०६
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥
फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥
तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥३॥
 
१०७
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥
कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥
 
१०८
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
 
१०९
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥
शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥
 
११०
थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥१॥
हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥
तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥
 
१११
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥
नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥
 
११२
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥
 
११३
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
 
११४
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
 
११५
घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥१॥
भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥
अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥
 
११६
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥
आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥
 
११७
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥४॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥
 
११८
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
 
११९
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥
त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥
संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥
 
१२०
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
 
१२१
मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
 
१२२
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
 
१२३
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥
 
१२४
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥
उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
 
१२५
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥२॥
वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥३॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥
सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥५॥
 
१२६
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥
नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥
 
जोहार - अभंग ३
 
१२७
मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥
फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥
आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥
तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥
 
१२८
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥
जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥
 
१२९
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥
धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥
वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥
सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥३॥
घराकडे पाहूं नयेसें जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥
आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥
 
॥३॥
 
१३०
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥
उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥
तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥
 
१३१
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥
 
१३२
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
 
१३३
हरि तूं निष्ठ‍ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥
घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥
कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥
 
१३४
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥
तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥
केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥
करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥
तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥
 
१३५
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध ॥१॥
जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥
साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥
तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
 
१३६
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥
 
१३७
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥३॥
 
१३८
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥२॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥
 
काला चेंडुफळी - अभंग १००
 
१३९
झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥
त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥
आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥
हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥
डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥
तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥
 
१४०
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥
मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥
मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥
तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥
सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥
तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥
 
कोडें - अभंग २
 
१४१
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ध्रु.॥
सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥
तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥
 
१४२
नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥
आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥
कमाईस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥
तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥
 
१४३
हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥
काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥
जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥
 
१४४
अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ।
नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥
घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ।
ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥
एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥
एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ।
एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥
एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ।
गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥
एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें ।
जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥
एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।
एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥
तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें ।
मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥
 
१४५
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥
पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥
बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥२॥
तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥३॥
 
१४६
आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥
पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥
खेळ खेळे न पडे डाईं । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाईं । कोणी कोडीं उगवीती ॥२॥
तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥३॥
 
१४७
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥
भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥
 
१४८
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी ।
अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥
म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।
खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥
एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे ।
म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥
हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।
देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥
म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या ।
अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥
एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां ।
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥
आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ।
वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥
करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ।
एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥
नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी ।
म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ।
देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥
म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ।
सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥
आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ।
म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥
धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें ।
मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥
तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें ।
तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥
तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ।
आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥
 
१४९
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥
वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥
उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥
एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥
 
फुगड्या - अभंग २
 
१५०
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥
फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥
मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥
त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥
आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥
तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : 10 खास गोष्टी