Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ५१ ते १००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ५१ ते १००
, मंगळवार, 30 मार्च 2021 (16:58 IST)
५१
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥
 
५२
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥
यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
 
५३
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥
तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
 
५४
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥
तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
 
५५
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
 
५६
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥
 
५७
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥
मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥
नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥
तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
 
५८
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥
 
५९
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
 
६०
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥
जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती ॥ झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥
तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥५॥
 
६१
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥
 
६२
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
 
६३
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
 
६४
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
 
६५
माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥
 
६६
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥
तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥
 
६७
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥
देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
 
६८
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
 
६९
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥
भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥
 
७०
ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥
हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥
गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥
तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥
 
७१
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥
 
७२
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥
हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥
तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥
 
७३
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥
रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥
 
७४
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥
 
७५
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥१॥
गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥
परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥२॥
न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥
 
७६
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥
नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥
माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥
तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥
 
७७
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्टुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥३॥
 
७८
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥
 
७९
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥३॥
 
८०
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥
काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥
काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥
तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥
 
८१
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥
अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥
तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥
 
८२
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥
 
८३
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥
 
८४
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥
न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥
 
८५
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥
निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥
 
८६
मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥
आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥
नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥
धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥
 
८७
कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
 
८८
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥
धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥
नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥
 
८९
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
 
९०
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥
कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥
मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥
तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥
वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥
तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥
 
९१
संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥
वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥४॥
तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥५॥
 
९२
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥
मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥
माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥
नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥
बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥
तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥६॥
 
९३
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥
 
९४
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥
खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥
 
९५
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥
भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥
 
९६
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥
 
९७
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥
नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥
वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥४॥
 
९८
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥
तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥५॥
 
९९
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥
जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥
संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥
तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥३॥
 
१००
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥
काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुकाराम गाथा - अभंग संग्रह १ ते ५०