घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते.
देव देवक म्हणजे देवाकडून लग्न समारंभात केले जाणारे संरक्षण. देवाचे ऋण फेडण्यासाठी, देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, देवाचे आवाहन करण्यासाठी हा विधी केला जातो. देव देवक बसवताना वधू आणि तिचे आई वडील पूर्वीकडे तोंड करून बसतात. त्याच प्रमाणे वर आणि त्याचे आई वडील देखील देव देवक बसवताना पूर्वीकडे तोंड करून बसतात.
देव देवक बसवताना एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळून नारळ ठेवले जाते. कुलदेवीचे किंवा कुलदेवाचे स्मरण करून कलश स्थापना करतात. 27 सुपार्यांवर मातृका देवता व आंब्यांची पाने ठेवतात. देवाला आवाहन केले जाते. शुभ कार्य निर्विघ्न व्हावे या साठी देवाला आळवतात.
एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधली जातात. 27 देवतांची स्थापना गहू व तांदूळ पसरून करतात. हे सूप देवापुढे ठेवतात. सूपमध्ये कलश म्हणून सुघड ठेवतात. मातीचे सुघड ठेवण्यामागचे कारण म्हणजे आपले जीवन हे मातीच्या घडासारखे असते. ते व्यवस्थितपणे हाताळले तरच जीवनाचा आनंद भोगता येतो. मातीच्या घड्याला धक्का लागल्यावर तो भंगतो. हे याचे द्योतक आहे.
देव देवक बसल्यावर देवकोत्थापन करे पर्यंत त्या कार्याशी संबंधितांना सोयर, सुतक इत्यादी नियम लागू होत नाही. आणि कार्यात कोणतीही बाधा येत नाही.
देव देवक बसल्यावर वराच्या घरातील थोरले आणि नातेवाईक वर आणि आई वडिलांना आहेर देतात तसेच वधू पक्षाकडे पण नातेवाईक आहेर देतात हा आहेर घरचा आहेर असतो.